
पणजी: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाण्यासाठी आवश्यक तो परवाना नसल्याने राज्य वाहतूक प्राधिकरणाने (एसटीए) नोटीस जारी करून ‘रेंट ए कॅब’ वाहनांना प्रवेशबंदी केली होती. त्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आज अंतरिम स्थगिती दिली.
त्यामुळे ‘रेंट ए कॅब’ मालकांना मोठा दिलासा मिळाला असून विमानतळावर सुरू असलेला काऊंटरही पूर्ववत सुरू झाला आहे. या नोटिशीला आव्हान दिलेल्या याचिकांवरील सुनावणी आता न्यायालयीन सुट्टीनंतर होईल.
उत्तर गोवा रेंट ए कॅब असोसिएशन तसेच ‘मे. गोंयकार’ या दोन याचिका आज उच्च न्यायालयासमोर सुनावणीस आल्या. केंद्र सरकारच्या या ‘रेंट ए कॅब’ योजनेखालील मार्गदर्शक तत्वामध्ये विमानतळ किंवा रेल्वेस्थानकावर जाण्यास कोणतीही बंदी नाही.
त्यामुळे राज्य वाहतूक प्राधिकरणाने २० फेब्रुवारी २०२५ रोजी विमानतळावर जाण्यास प्रवेशबंदीची जारी केलेली नोटीस बेकायदेशीर आहे. राज्य वाहतूक प्राधिकरणाच्या सदस्य सचिवांनी या एसओपी व मार्गदर्शक तत्वांना बगल दिली आहे. याचिकादारानी या योजनेनुसार आवश्यक असलेल्या सर्व अटी व प्रक्रिया करून हा व्यवसाय सुरू केला आहे, अशी बाजू या याचिकेवरील सुनावणीवेळी ज्येष्ठ वकील सुरेंद्र देसाई यांनी मांडली.
पर्यटक ग्राहक वाहनासाठी ऑनलाईन बुकिंग करतात. त्यांना ज्या ठिकाणी भाडेपट्टीवर वाहन पाहिजे त्या ठिकाणी ते उपलब्ध करून दिले जाते.
युक्तिवादानंतर सरकारतर्फे या याचिकांना विरोध करण्यात आला. ‘रेंट ए कॅब’ हा भाडेपट्टीवर देण्याचा व्यवसाय त्यांच्या कार्यालयांतून करायला हवा, मात्र तो मोपा विमानतळावरून केला जातो. त्यासाठी वेगळा परवाना एसटीएकडून घेण्याची गरज आहे, अशी बाजू मांडण्यात आली. दरम्यान, याचिकादार व सरकारची बाजू ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने एसटीएच्या नोटिशीला अंतरिम स्थगिती दिली.
‘मे. गोंयकार’ने ‘जीएमआर’ कंपनीशी करार करून मोपा विमानतळावर काऊंटर सुरू केला आहे. तसेच ‘रेंट ए कॅब’ वाहनांसाठी खासगी पार्किंग व्यवस्थेकरिता शुल्कही जमा केले आहे. काऊंटरवर बुकिंग केलेल्या पर्यटक ग्राहकांना वाहनांच्या चाव्या दिल्या जातात. असे असतानाही एसटीएने नोटीस जारी करून हा काऊंटर बंद करण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे ही नोटीस रद्द करण्यात यावी, जेणेकरून काऊंटर पुन्हा सुरू करणे शक्य होईल, अशी बाजू ॲड. सुबोध कंटक यांनी मांडली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.