

फोंडा: अखेर मोले पंचायतीतर्फे शुक्रवारी पळसकट्टा येथील पार्सेकर फुड्स प्रकल्पाच्या जागेची रीतसर पाहणी करण्यात आली. विशेष म्हणजे या तपासणीवेळी दोन तक्रारदारांना प्रकल्पाच्या आवाराबाहेर ठेवण्यात आले होते. त्यामुळे काही काळ गरमागरम चर्चा झाली.
या पाहणीत मोलेचे सरपंच विठोबा मळेकर, स्थानिक पंच वर्षा झोरे, पंच कपिल नाईक, उपसरपंच प्रणाली वेरेकर, पंच जनी दामेकर, सचिव विजय नाईक व गटविकास कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते. कुळे पोलीसही तैनात होते.
सकाळी ११ ते दुपारी २.३० पर्यंत संपूर्ण प्रकल्पाचे मोजमाप करण्यात आले. यावेळी सचिव विजय नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार तपासणीदरम्यान या जागेवर एकूण २५ बांधकामे असल्याचे आढळून आले. त्यापैकी १६ संलग्न बांधकामे, एक विहीर व एक पाण्याची टाकी असल्याचे स्पष्ट झाले.
या पाहणीत आढळलेल्या तथ्यांच्या आधारे पंचायत सचिव आता सविस्तर अहवाल तयार करणार आहेत. त्यानंतर नियमांनुसार आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून स्थानिक ग्रामस्थ या प्रकल्पाविरोधात आक्रमक झाले असून प्रदूषण व अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावरून आंदोलन करत आहेत. आजच्या पाहणीनंतर या प्रकरणाला कोणते वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आंदोलन सुरूच ठेवणार
गेल्या पंधरा दिवसांपासून आम्ही आंदोलन करत असून आज पार्सेकर फुड्सची तपासणी करण्यात आली. आमचे जीवन या प्रकल्पामुळे उद्ध्वस्त झाले आहे. जोपर्यंत हा प्रकल्प येथून बंद होत नाही, तोपर्यंत पार्सेकरविरोधातील आंदोलन सुरूच राहील, असे ग्रामस्थ प्रितेश प्रियोळकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.