असेही अभ्यासवर्ग भाजपचे!

ज्यांनी बहिष्कार टाकला, ते सुटले अशीच काहीशी प्रतिक्रिया उपस्थितांची राहिली तर आश्‍चर्य वाटायला नको
Goa MLA
Goa MLASandip Desai
Published on
Updated on

असेही अभ्यासवर्ग भाजपचे

भाजपच्या एका ज्येष्ठ सदस्याने रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने काही वर्षांपूर्वी मुंबईत आयोजित केलेल्या आमदारांच्या कार्यशाळेची हकिकत सांगितली, ती गमतीदार आहे. गोव्यातील भाजप आमदारांसाठी 2016 मध्ये मुंबईत प्रबोधिनीने अभ्यासवर्ग आयोजित केला होता. तेथे एका ज्येष्ठ सदस्याचे ‘जनसंघ ते भाजपा : 50 वर्षांचा प्रवास’ या विषयावर दीर्घ भाषण झाले. बोलणारा वयोवृद्ध होता आणि आपल्याला योग्य पद न मिळाल्यामुळे वैफल्यग्रस्तही बनला होता. त्याने जो कंटाळवाणा सूर लावला त्यामुळे नवे काही शिकण्याऐवजी आमदार जाम कंटाळून गेले. त्यांच्यामध्ये विष्णू वाघांपासून मायकल लोबोंपर्यंत अनेक हरहुन्नरी आमदार होते. त्यातील अनेकांना हा अभ्यास चालू असता झोप आली किंवा मुख्य कार्यक्रम संपून जीवाची मुंबई करण्याची त्यांना घाई झाली होती. या प्रकरणापासून तरी धडा घेऊन विधिमंडळ सचिवालयाला काही रोचक मार्गदर्शन घडवून आणता आले असते. दुर्दैवाने वैधानिक अभ्यास म्हणजे तो कंटाळवाणाच असायला हवा, असा कयास सभापतींनीही करून घेतला असावा. त्यामुळे ज्यांनी बहिष्कार टाकला, ते सुटले अशीच काहीशी प्रतिक्रिया उपस्थितांची राहिली तर आश्‍चर्य वाटायला नको... ∙∙∙

(MLA's workshop in Goa)

Goa MLA
विजय यांच्या या ‘संडे डायलॉग’ना आता भाजपकडून काही उत्तर असेल का?

मी जिंकलो असतो तर!

यशाने हुरळून जाऊ नये व पराभवाने खचून जाता कामा नये असे म्हणतात ते खरे. कुंकळ्ळीचे माजी आमदार क्लाफास डायस यांना आपल्या पराभवाचे शल्य अजूनही आहे. आपण जिंकलो असतो, तर मंत्री झालो असतो. आपल्याला भाजपाची कट्टर मते मिळाली नाही म्हणून आपण पराभूत झाल्याचे क्लाफास डायस सगळ्यांना सांगत सुटले आहेत. दुःख आपण हरल्याचे नाही, कुंकळ्ळी मतदारसंघ मंत्र्याला मुकला व विकास खुंटला असे डायसबाब सांगतात. डायसबाब आधी आपण काय चुकले व कुठे चुकले हे तपासा व नंतर बोला. ∙∙∙

कॅसिनोसमोर वाहन पार्किंग!

कॅसिनो आस्थापनांच्या बाहेर दररोज बेशिस्तपणे वाहने उभी केल्याने पणजीत वाहतूक कोंडी होते, तसेच अनेक अपघातही त्या ठिकाणी होत आहेत. तरीदेखील पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. दुसरीकडे सर्वसामान्य माणसाने चुकूनसुद्धा वाहन पार्किंग नसलेल्या ठिकाणी उभे केल्यास पोलिस त्यांना दमदाटी करून दंड ठोठावतात, परंतु कॅसिनोच्या बाहेर चाललेल्या कारभाराकडे पोलिसांनी काणाडोळा केल्याची चर्चा सध्या सुरू आहे. ∙∙∙

खासगी बसेस कधी परतणार?

कोविडमधील लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार बराच काळ बंद राहिला, त्यात खासगी बसेसचाही समावेश होता नंतर यथावकाश अन्य व्यवहार पूर्ववत सुरू झाले. आता तर शाळा-महाविद्यालयेही सुरू झाली, पण अनेक मार्गावरील खासगी बसेस बंदच आहेत. खासगी बसेसचे एकूण मार्ग पाहिले, तर त्यांचे निम्म्याहून अधिक मार्ग बंदच आहेत. त्या संघटनेचे नेते ताम्हणकर. ते साहेब सध्या टॅक्सीवाल्यांच्या प्रश्नावरून आक्रमक झालेले आहेत, पण बंद बसेस व त्यामुळे होत असलेल्या लोकांच्या हालअपेष्टांबाबत काही बोलत नाहीत. ∙∙∙

Goa MLA
जमिनी हडप करण्याची 92 प्रकरणे उघडकीस

फळदेसाईंच्या मनात काय चाललेय?

कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई हे भाजपला जवळ असल्याची चर्चा सुरवातीपासूनच कुंभारजुवे मतदारसंघात सुरू आहे. त्यात फळदेसाई हे भाजपच्या स्थापना दिवसाच्या सोहळ्यास हजर राहिल्यानंतर चर्चेला आणखी वाव मिळाला होता. आता सरकारकडून विधिमंडळ कार्यशाळेत सहभागी न होण्याचा काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला असतानासुद्धा ते स्वतःहून त्यात सहभागी झाले. पक्षाने सहभागी न होण्याचा निर्णय त्यांना माहितच नव्हता. त्यांनी म्हणे आपल्या सहकारी आमदारांना फोन लावून विचारले आणि नंतर ते घाईगडबडीने तेथून निघून गेले, परंतु हा प्रकार घडल्याने फळदेसाई आणि भाजपला जोडल्या जाणाऱ्या अफवा आणखी पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ∙∙∙

बदल स्वीकारा अन्यथा संपाल

गोव्यात टॅक्सींना डिजिटल मीटर या मुद्यावरून सरकार ‘ओला’, ‘उबर’ प्रणाली अवलंबिण्याच्या निर्णयाप्रत आले आहे व त्याला टॅक्सीवाले विरोध करू लागल्याने पुन्हा हा संघर्ष पेटण्याचे संकेत मिळू लागले आहेत. काही मंडळी याप्रश्नी टॅक्सीवाल्यांना चिथावत असल्याच्याही तक्रारी आहेत. खरे तर या प्रश्नावर टॅक्सीवाल्यांनी डोक्यात राग घालून न घेता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कारण शेवटी गोवा हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन क्षेत्र आहे व पर्यटकांच्या टॅक्सीबाबतच्या तक्रारी पाहता सरकारला गप्प बसता येणार नाही. यास्तव त्यांनी डिजिटल मीटर वा नव्या प्रणाली स्वीकारल्या नाहीत, तर तेच स्पर्धेतून बाजूला फेकले जातील. याबाबत त्यांना मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा आहे तेच त्यांची दिशाभूल करत आहेत हेच खरे. ∙∙∙

कमळ सोडले, अपवित्र बनले?

सध्या राज्यातील राजकीय वातावरण पूर्णतः ढवळून निघाले असून मंत्री विश्वजीत राणे व विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्यातील ‘वाद’ हा सध्या खूपच खासगी पातळीवर पोचल्याचे नेटकरी बोलत आहेत. सोमवारी विरोधी पक्षनेत्यांनी पुन्हा एकदा मंत्री राणेंवर निशाणा साधला. मंत्री राणे हे स्वतःला देव समजत असून आम्ही विरोधात असल्याने ते आमच्या व्यवसायांना टार्गेट करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे नेटकऱ्‍यांसाठी हा एक नवीन चर्चेचा विषय मिळाला. सध्या लोबो हे काँग्रेसमध्ये गेल्यानेच, ते अपवित्र बनले असून त्याचाच हा विरोधी पक्षनेत्यांना फटका असल्याचे नेटकऱ्यांचे मत आहे. म्हणून लोबोबाब यांनी ‘कमळा’ची साथ सोडायला नको होती, असा सल्लाही आता काहीजण सोशल मीडियावरून देताना दिसतात. ∙∙∙

विरोधकांची झाडाझडती

विरोधी नेते मायकल लोबो यांच्या अंजुणा येथील ‘पिकासो बाय द सी’ या लोकप्रिय हॉटेलला सध्या सरकारने नाकीनऊ आणले आहे. दिलायला लोबो यांना आपण पहिल्यांदा या हॉटेलची सरकारने छळवणूक चालवली आहे, त्याबद्दल डोळ्यात अश्रू आणलेले पाहिले. एका बाजूला टीसीपी खात्याने लोबो यांच्या कथित बेकायदा जमीन व्यवहाराबद्दल जोरदार मोहीम उघडली आहे; तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या हॉटेलांचीही झाडाझडती सुरू झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाने या त्यांच्या हॉटेलवर धाड घातली व काही अनागोंदींची दखल घेतली आहे. सूत्रांच्या मते, अधिकाऱ्यांना ज्या काही तफावती दिसून आल्या त्यामध्ये किचन ज्या शेडमध्ये आहे तेथून पावसाचे पाणी टपकत होते. बेळगावहून आलेली भाजी गोणपाटात तशीच ठेवली होती. काही भाज्या जमिनीवर ठेवलेल्या अवस्थेत होत्या. खानपानगृहांमध्ये स्वयंपाकघर स्वच्छ आणि नेटके असायला हवे, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. परंतु एवढी कठोर झाडाझडती घेतली तर गोव्यातील एक तरी हॉटेल शाबूत राहील काय? ∙∙∙

जे आले, तेही कंटाळले नसतील ना?

गोव्याच्या विधिमंडळ विभागाने आमदारांसाठी जो ‘अभ्यासवर्ग’ घेतला, त्याबद्दल भाजपमध्येही फारशी उत्सुकता नाही. 50 टक्क्यांपेक्षा अधिक आमदार या कार्यक्रमावर बहिष्कार टाकतात ते काहीसे स्वाभाविकच झाले, असाच सूर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांमध्येही आहे. विधानसभेचे अध्यक्ष रमेश तवडकर यांच्याकडून ती काहीशी चूक किंवा बेफिकिरी झाली, अशा निष्कर्षापर्यंत अनेकजण आले आहेत. याचे कारण सध्याच्या 25-30 वर्षांच्या तरुण आमदारांना विधिमंडळ कामकाज, नियम व कायदे यासंदर्भात ज्याप्रमाणे मार्गदर्शन व्हायला पाहिजे त्यासाठी केवळ सरकारी बाजूचे नाही; तर विरोधी पक्षामधीलही लोकांना पाचारण करणे आवश्‍यक होते. दुसरी गोष्ट म्हणजे राम नाईक यांचा अनुभव दांडगा असला तरी ते वयोवृद्ध आहेत. या कामात रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीपेक्षा स्वत: विधिमंडळ सचिवालयाला आपल्या योजनेनुसार या कार्यक्रमाची आखणी करता आली असती. गोव्याचे प्रश्‍न नेमकेपणाने मांडण्यासाठी विरोधी बाकांवरच्या नेत्यांना आमंत्रित करणे आवश्‍यक होते. दिगंबर कामत यांच्यासारखे नेते सहा-सातवेळा जिंकून आले आहेत... ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com