पणजी: उद्योगासाठी दिलेली जमीन झुआरी ॲग्रो केमिकल्स लि. कंपनीने गृहनिर्माण संकुल तसेच भूखंड करून बिगर गोमंतकीयांना लाखापेक्षा अधिक चौ. मी. किमतीने विकले आहेत. हा सुमारे ५० हजार कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप करत आमदार विजय सरदेसाई यांनी सरकारला धारेवर धरले.
मात्र, या प्रकरणाची चौकशी करू. झुआरीची सनद तसेच विक्रीखत बेकायदा असल्यास ते रद्द करतो, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तर तासावेळी दिले.
झुआरी ॲग्रो केमिकल्स लि., झुआरी इंडस्ट्रिज लि. आणि संलग्न उद्योगांची सविस्तर माहिती द्यावी तसेच कंपनीच्या जमिनीसंदर्भात सनदेसाठी किती अर्ज आले? गेल्या ५ वर्षांत या जमिनीची म्युटेशन्स, पार्टिशन केले असल्यास त्याचीही माहिती आमदार विजय सरदेसाई यांनी मागितली होती. यावेळी परप्रांतीय जमीन खरेदीदारांची यादीच आमदार सरदेसाई यांनी सादर केली.
राज्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी गोव्यात उद्योग आल्यास स्थानिकांना रोजगार मिळेल, या उद्देशाने सांकवाळ कोमुनिदादची ५४० हेक्टर जमीन २५ पैसे प्रति चौ. मी. या दराने झुआरी ॲग्रो केमिकल्स लि. कंपनीला दिली होती.
या कंपनीने त्यांचा व्यवसाय कमी झाल्याने तेथील काही भूखंड विक्रीस काढले आहेत. सुमारे ३ लाख चौ. मी. जमीन निवासी संकुल उभारण्यासाठी सनद घेतल्या आहेत.
झुआरी ॲग्रो केमिकल्स कंपनीला दिलेल्या जमिनीसंदर्भात ॲडव्होकेट जनरलांचे मत घेतले होते. त्यानंतर सरकारने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल के. एम. नटराजन यांचा सल्ला घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याकडे मत मागितले आहे. मात्र, ते अद्याप मिळालेले नाही, असे उत्तर महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी दिले.
झुआरी कंपनी २ हजार फ्लॅटस् बांधणार असून त्यांची किंमत प्रति ५५ हजार चौ. मी. रुपये आहे. हा सुमारे ५९२ कोटींचा घोटाळा आहे. झुआरी कंपनीने काही भूखंडही विक्रीस काढले असून १.१९ लाख रुपये प्रति चौ. मी. दराने विकले आहेत, असे सरदेसाई म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.