राज्यातील रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूंची संख्या ही चिंतेची बाब असून अनेक तरुण रस्ते अपघातात आपला जीव गमावत आहेत. सरकारने राज्यातील वाढते अपघात रोखावे यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याची माहिती कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी पर्रा पंचायत सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
आमदार लोबो पुढे म्हणाले, की वाहतूक पोलिसांनी केवळ वाहने थांबवून चालणार नाहीत, तर हेल्मेट न घालणे आणि दुचाकी भरधाव न चालविणे यासाठी चौक्यांवर तपासणीही ठेवावी. वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियम मोडणाऱ्यांचे फोटो क्लिक करून त्यांच्या घरी चलन पाठवण्याचे तंत्रज्ञान वापरावे.
जीवघेण्या अपघातात तरुणांचा मृत्यू होत आहे ही चिंतेची बाब आहे, ट्रॅफिक सेल, महानगरपालिका, पंचायत व शासनाने फलक व गतिरोधक तपासावेत व सोशल मीडियावर याबाबत जनजागृती करावी.
सर्व प्रमुख जिल्हा रस्ते आणि सर्व धोकादायक ठिकाणांची तपासणी व दुरुस्ती करावी. हा मुद्दा मी मुख्यमंत्री आणि सर्व आमदारांच्या भेटीत मांडणार आहे. आई-वडिलांना घरातील आपली मुले कामानिमित्त किंवा शाळा कॉलेज या ठिकाणी गेल्यानंतर ती पुन्हा घरी येईपर्यंत त्यांचा जीव धास्तावलेला असतो.
सध्या रस्ता अपघातात दिवसाकाठी एक - दोन युवकांचा मृत्यू होत असल्याच्या बातम्या येऊन थडकत आहेत. त्यामुळे हे अपघात का व कसे होतात याचा बारकाईने अभ्यास करणे आवश्यक आहे. फक्त चलन देऊन भागणार नाही, तर सरकारने याकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन ठिकठिकाणी गतिरोधकांवर पांढरे पट्टे ओढणे, दिशादर्शक फलक उभारणे, वळणावळणांवर धोक्याचे फलक लावणे आवश्यक आहे, असेही लोबो यांनी सांगितले.
‘ट्रकचालकांचे परवाने तपासा’
समुद्रकिनारी भागाकडे अपघातांचे जास्त प्रमाण आहे. हेल्मेट घातले म्हणजे अपघात कमी होतात असे नाही, तर वाहनचालकाने आपले वाहन भरधाव न चालविणेही आवश्यक आहे. बाहेरून येणारे मालवाहू ट्रक यांचे परवाने तपासून पाहणे गरजेचे आहे.
कारण ते आपली वाहने भरधाव चालवतात. त्यांच्याजवळ परवानेही नसतात. त्यांना अडवून त्यांच्याकडे परवाने आहेत की नाही याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, असे आमदार लोबो यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.