Bhutani Infra Project Sancoale
पणजी: सांकवाळ येथे भूतानी इन्फ्रा नावाने ओळखल्या जाणाऱ्या मे. परमेश कन्ट्रक्शन कंपनीच्या प्रकल्पाला स्थानिक पंचायतीने दिलेल्या बांधकाम परवान्याबाबत तक्रार पंचायत संचालनालयातून गहाळ झाली आहे. माहिती हक्क कार्यकर्ते नारायण नाईक यांनी मार्चमध्ये केलेल्या या तक्रारीची माहिती समाज माध्यमांवर दिल्यानंतर आता ‘त्या’ तक्रारीची शोधाशोध पंचायत संचालनालयात सुरु झाली आहे.
दरम्यान या साऱ्या प्रकरणात पंचायत खात्याकडून कोणती चूक झाली आहे का, याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतली आहे.
मुरगाव नगर नियोजन प्राधिकरणाने (Mormugao Planning And Development Authority) काही अटींसह विकास परवाना जारी केला होता. त्या अटींची पूर्तता केल्याचे कोणतेही पुरावे तसेच बांधकाम परवान्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे न घेताच बांधकाम परवाना जारी केल्याचा आरोप नाईक यांनी केला आहे. त्यांनी पंचायत सचिवांकडून तशी माहिती माहिती अधिकारात मिळवल्यानंतर पंचायत संचालनालय तसेच सरकारकडेही तक्रारी केल्या होत्या. त्यापैकी एक तक्रार पंचायत संचालनालयाकडून मुरगावच्या गट विकास कार्यालयाकडे चौकशीसाठी पाठवण्यात आली होती. गट विकास कार्यालयाकडून चौकशीनंतर अहवालही पंचायत संचालनालयाला सादर करण्यात आला होता.
आता नाईक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर हा विषय ताजा झाला आहे. नाईक यांच्या तक्रारीवर पुढे काय केले, याचा न्यायालयात जाब द्यावा लागणार असल्याने ती मूळ तक्रार कुठे गेली याची शोधाशोध करण्यात येत होती. सोमवारी ती तक्रार शोधणे हे एकमेव काम पंचायत संचालनालयाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आले होते. तरीही तक्रार मिळालेली नाही. दरम्यान, नाईक यांनी याच स्वरूपाची आणखी एक तक्रार सचिव (पंचायत) संजीव गोयल यांच्या ईमेलवर पाठवली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.