
पणजी: नरकासुर दहनाच्या रात्री जे व्यासपीठावर होते तेच खरे नरकासुर असे म्हणत वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी विरोधी आमदारांवर बाण सोडला. शिवाय नरकासुर दहनाची प्रथा राज्यातून नष्ट झाली पाहिजे, असेही मत त्यांनी पुन्हा नोंदविले.
दीपावलीच्या पूर्वसंध्येला म्हणजे नरकासुर दहनाच्या रात्री फातोर्डा येथे आयोजित कार्यक्रमात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, काँग्रेस आमदार एल्टन डिकॉस्टा, गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई आणि ‘आरजी’चे अध्यक्ष मनोज परब (Manoj Parb) यांनी हजेरी लावत एकीचे दर्शन घडवले. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी सत्ताधारी ३३ आमदारांना नरकासुराची उपमा दिली होती.
यावरून राज्यातील राजकारण तापले असतानाच, नरकासुर दहनाच्या रात्री जे व्यासपीठावर होते, ज्यांनी धांगडधिंगाणा घातला तेच खरे नरकासुर असल्याची टीका ढवळीकर यांनी केली. ३३ आमदारांना नरकासुर म्हणणाऱ्यांनी प्रथम स्वत: काय केले हे पाहणे गरजेचे आहे. गेली २५ वर्षे आपण नरकासुर दहनाच्या प्रथेस सातत्याने विरोध करत आहे. मुळात ही प्रथाच चुकीची असून, ती बंद झाली पाहिजे, असेही ढवळीकर यांनी नमूद केले.
विरोधी आमदारांच्या युतीबाबत पत्रकारांनी मंत्री सुदीन ढवळीकर (Sudhin Dhavalikar) यांना विचारले असता, विरोधी आमदारांना तत्त्वे नाहीत. त्यातील अनेकजण अनेक पक्ष फिरून आलेले आहेत. त्यामुळे ते कदापि एकत्र राहू शकत नाहीत, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांच्या एकीची खिल्ली उडवली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.