खरी कुजबुज: लोबो खरे तेच बोलले!

Khari Kujbuj Political Satire: अपात्रता याचिकेवर निर्णय देण्यास दोन वर्षे लागल्याने सभापती रमेश तवडकर यांच्यावर आरोप होणे साहजिकच होते. मात्र त्यांनी स्वतः याचे खापर वकिलांवर फोडले आहे. त्यांच्या मंडळानुसार ते सुनावणी घेण्यास तयार होते मात्र बाजू मांडण्यासाठी युक्तिवाद करण्यास वेळ मागून घेतली जायची.
Khari Kujbuj Political Satire: अपात्रता याचिकेवर निर्णय देण्यास दोन वर्षे लागल्याने सभापती रमेश तवडकर यांच्यावर आरोप होणे साहजिकच होते. मात्र त्यांनी स्वतः याचे खापर वकिलांवर फोडले आहे. त्यांच्या मंडळानुसार ते सुनावणी घेण्यास तयार होते मात्र बाजू मांडण्यासाठी युक्तिवाद करण्यास वेळ मागून घेतली जायची.
Khari KujbujDainik Gomantak
Published on
Updated on

लोबो खरे तेच बोलले!

सरपंच-उपसरपंच व पंचायत सदस्य हे मोठ्या बिल्डरांच्या फाईलींवरच लक्ष ठेवून असतात, अशी जी टिप्पणी आमदार मायकल लोबो यांनी केली आहे. त्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटू लागलेल्या असून मायकलबाब सत्य तेच बोलले आहेत, असे म्हटले जात आहे. या प्रतिक्रिया केवळ सर्वसमान्यांकडून तसेच माजी पंचायत सदस्य व इतरांकडून व्यक्त होत आहेत. विद्यमान पंचायत सदस्यच केवळ नव्हे तर आमदार वा जिल्हा पंचायत सदस्यही त्याबाबत काही बोलताना दिसत नाहीत. बिल्डरांच्या फाईलींची तळी केवळ पंचायत मंडळच नव्हे तर अन्य लोकप्रतिनिधीही उचलून धरतात, असे सर्रास बोलले जाते. कारण त्यांत त्या सगळ्यांचेच म्हणे भले होते. असे सांगतात की बिल्डर लोक पंचायतीत वा नगरपालिकेत एकाच वेळी फाईलींचा गठ्ठा सादर करतात व त्यांना अधिक विलंब न लावता मंजुरी मिळते. तर सर्वसामान्यांच्या फाईली तशाच पडून राहतात व नंतर गहाळही होतात. वीज वा पाणीपुरवठा खात्यांत सुध्दा हाच अनुभव येतो त्यांच्या जोडण्या लगेच मंजूर होतात, कारण त्यावर वजन असते. तर सामान्यांच्या फाईली मंजुरीविना पडून असतात. खरे तर मायकलबाब वा अन्य आमदारांनी हे मुद्दे विधानसभेत उपस्थित करायला हवेत, पण तसे होताना दिसत नाही. ∙∙∙

सभापती उवाच

अपात्रता याचिकेवर निर्णय देण्यास दोन वर्षे लागल्याने सभापती रमेश तवडकर यांच्यावर आरोप होणे साहजिकच होते. मात्र त्यांनी स्वतः याचे खापर वकिलांवर फोडले आहे. त्यांच्या मंडळानुसार ते सुनावणी घेण्यास तयार होते मात्र बाजू मांडण्यासाठी युक्तिवाद करण्यास वेळ मागून घेतली जायची. असे असले तरी सभापतींनी सर्व याचिका एकाच वेळी विचारात का घेतल्या नाहीत हा लाख मोलाचा प्रश्न मात्र बाकी उरतो. त्याचे उत्तर कोणाकडे आहे काय? ∙∙∙

कोकणी लिपीचा वाद पेटणार?

देशात भाषेच्या आधारावर राज्यांची निर्मिती अर्थात भाषावार प्रांतरचना झाली. भाषावाद संपुष्टात यावा म्हणून कोकणीसह अनेक भाषांना राजमान्यता देण्यात आली. एवढे झाले तरी देशाच्या स्वातंत्र्याच्या ७८ वर्षानंतर हा भाषावाद संपुष्टात आलेला नाही, ही आपल्या लोकशाहीची शोकांतिका म्हणावी लागेल. गोव्यात काही काळ मराठी व कोकणी असा भाषावाद गाजला. सध्या हा वाद शीतपेटीत पडला आणि आता कोकणीत लिपीवाद सुरू झाला आहे. रोमी व कानडी लिपीला न्याय मिळावा व नागरी लिपी बरोबर स्थान मिळावे, म्हणून नवीन वाद सुरू झाला आहे. हा वाद एवढा वाढला आहे की, लिपी समर्थक एकमेकाला ‘बंदर’ म्हणायला मागे राहिलेले नाहीत. आता रोमीवाले म्हणू लागलेत, आम्ही इंग्रजी माध्यमाच्या शाळांना मान्यता मिळवून दिली, आता रोमीलाही योग्य सन्मान मिळवून देणारच. आता बघुया, हा वाद कितीपर्यंत ताणला जातो. ∙∙∙

दिवाळी बोनसची खेळी

गोवा विद्यापीठ दिवसेंदिवस सर्व क्षेत्रांमध्ये अपयशाच्या दिशेने जात असल्याचे दिसते. विद्यापीठाचा दर्जा घसरत असून आता क आणि ड गटातील कर्माचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्यात विलंब झाला. दिवाळी होऊन आज लक्ष्मी पूजन होणार असले तरी बानस आलेला नाही. हा बोनस फक्त गट क आणि ड कर्मचाऱ्यांसाठी लागू असल्याने वरिष्ठ अधिकारी शांत आहेत. हा बोनस प्राध्यापक आणि इतर कर्मचारी वर्गासाठी लागू असता तर परिणाम वेगळा असता अशी कुजबूज ऐकू येते. विलंबासाठी उच्च शिक्षण संचालनालयावर खापर फोडत मंजुरी न दिल्याचे सांगून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप केले गेले. त्यात उच्च शिक्षण संचालनालयाने मंजुरी दिल्याचे सांगून चेंडू पुन्हा विद्यापीठाच्या कोर्टात टाकला. अनेक प्रकरणातील हा आणखी एक मानाचा तुरा विद्यापीठाच्या शिरपेचात खोवला गेला.’ ∙∙∙

गावकर अडचणीत

‘दूधसागर’ दर्शन घडवणाऱ्या जीप ऑपरेटर्सच्या संघटनेमुळे सावर्डे मतदारसंघाचे आमदार गणेश गावकर भलतेच अडचणीत आले आहेत. गोवा पर्यटन विकास महामंडळाचे ते अध्यक्षही आहेत. या महामंडळाचा काउंटर हटवावा, अशी स्थानिक जीप मालकांची मागणी आहे. यावरून तेथील भाजपमध्ये फूट पडली आहे. भाजपची मंडळ समिती संघटनेसोबत आहे तर सरपंच व इतर मंडळी आमदारांसोबत आहेत. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी या समस्येबाबत चर्चा करूनही अद्यापही प्रश्न सुटलेला नाही. आता जीप मालक संघटनेने (आज) शनिवारपासून साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे गावकर यांच्या समोरील समस्या वाढणार एवढे नक्की. ∙∙∙

‘कॅश फॉर जॉब्स’चे कनेक्शन सासष्टीपर्यंत!

‘पापाचा घडा कितीही मोठा असो, तो एक ना एक दिवस भरतो अन् फुटतोच’, असे एक ब्रह्मवाक्य आहे. गोव्यात सरकारी नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांना लुटणाऱ्यांचा पर्दाफाश झाला. पुरुषच स्कॅम करतात, असा जो समज होता तो ‘जॉब स्कॅम’ ने खोटा ठरविला.पूजा नाईकपासून एका महिला शिक्षिकेचा यात हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘कॅश फॉर जॉब्स’ चे नेटवर्क मोठे असल्याचा अंदाज आहे. याची पाळेमुळे पणजीपासून काणकोण पर्यंत पोहाचल्याचे संकेत मिळत होते. ‘कॅश फॉर जॉब्स’ चे कनेक्शन सासष्टीपर्यंत पोचल्याचे काही सरकारी अधिकारी सांगतात. नोकरीसाठी मिळणाऱ्या ‘लक्ष्मी’चे सासष्टीतील लक्ष्मीच्या खास कक्षात देवाण घेवाण होते, अशी चर्चा सासष्टीत सुरू आहे. आता मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असल्याने अनेक लहान मोठे मासे गळाला लागतात, की गळ घेऊन गायब होतात हे पाहावे लागेल! ∙∙∙

भाजपाचे नेतृत्व कोणाकडे?

गोवा प्रदेश भाजप अध्यक्षपदाची धुरा कोणाकडे हा सध्या गोव्यात चर्चेत असलेला महत्वाचा मुद्दा आहे.भाजपाची निवडणूक प्रक्रिया सुरु झालेली आहे पण अध्यक्षपद कोणाकडे जाणार हे मात्र अजून ठरत नाही. त्यासाठी जरी निवडणूक होणार असली तरी सरतेशेवटी नेतृत्वाला हवा तो व परवडणाराच अध्यक्षपदी येईल हे नक्की असे संघटनेत बोलले जात आहे. पण त्याचबरोबर हेही खरे आहे की केंद्रीय नेतृत्वाला पसंत पडेल अशीच व्यक्ती त्या पदावर येईल. राज्य मंत्रिमंडळांतील पुनर्र्चनेचा घोळ गेले अनेक महिने सुरु आहे. त्यावेळी आपणाला मंत्रीपद मिळेल म्हणून अनेकजण आपले देव पाण्यात बुडवून बसलेले आहेत पण त्यांना महाराष्ट्रांतील निवडणुकीपर्यंत वाट पहा असे सांगण्यात आलेले असल्याने त्या सर्वांना तेथील निवडणूक लवकर झालेली हवी आहे. आता तीच गत संघटनात्मक निवडणुकीची झाली नाही म्हणजे मिळवले. तसे होऊ व नवी सबब पुढे येऊं नये नये म्हणून अध्यक्षपदावर लक्ष ठेवून असलेले फातोर्डाचे दामू नाईक व मांद्रेचे दयानंद सोपटे म्हणे मनांतल्या मनांत देवाची आळवणी करत आहेत. खरे -खोटे काय ते तेच जाणोत. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire: अपात्रता याचिकेवर निर्णय देण्यास दोन वर्षे लागल्याने सभापती रमेश तवडकर यांच्यावर आरोप होणे साहजिकच होते. मात्र त्यांनी स्वतः याचे खापर वकिलांवर फोडले आहे. त्यांच्या मंडळानुसार ते सुनावणी घेण्यास तयार होते मात्र बाजू मांडण्यासाठी युक्तिवाद करण्यास वेळ मागून घेतली जायची.
खरी कुजबुज: ...आणि रवींच्या बॅनरवर अवतरले ‘कमळ’!

पर्यटक गोव्यात असुरक्षित

पर्यटक हे ‘अतिथी देवो भव’ असे म्हटले जाते. राज्यात येणाऱ्या पर्यटकांमुळे येथील पर्यटन व्यवसायाला चालना मिळते. राज्यातील खाण व्यवसाय बंद झाल्यानंतर पर्यटन व्यवसायातूनच महसूल मिळण्याचे मुख्य साधन आहे. त्यासाठी सरकारी यंत्रणा पर्यटकांना मारहाण व लुटमार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करत असले हे प्रकार थांबलेले नाहीत. राज्यामधील पर्यटन व्यावसायिकांची किनारपट्टी परिसरात दबंगगिरी सुरू आहे. एखादी घटना घडली तेथील टॅक्सी चालक एकजूट होऊन पर्यटकांनाच त्यांची चूक नसताना दमदाटी करतात. पोलिसांत तक्रार देण्यास पर्यटक जात नाही कारण गोव्यातून परतल्यावर खटल्यासाठी कोण हेलपाटे मारील, असा प्रश्‍न असतो. दलालांविरुद्ध (टाऊट्स) कारवाई केली जात आहे तसेच टॅक्सी चालकांकडून होणारी मारहाण तसेच मसाज पार्लरमध्ये होणारी लुटमार याविरुद्ध पोलिस गुन्हा नोंदवत आहेत. तरीही हे प्रकार थांबलेले नाहीत. राज्यात या गुन्हेगाराना भय राहिलेले नाही कारण ते काही राजकारण्यांशी किंवा पोलिसांशी जवळीक असलेले असतात. सरकार कठोर कारवाईचे आश्‍वासन देते, मात्र त्यानंतर ‘येरे माझ्या मागल्या’प्रमाणे हे प्रकार सुरूच राहतात. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com