पणजी : सध्या गोव्याच्या राजकारणात प्रचंड वेगाने घडामोडी घडताना दिसत आहेत. ज्या पक्षांनी आणि नेत्यांनी तृणमूल काँग्रेससोबत नातं जोडलं, तेवढ्याच वेगाने ते संबंध तोडत असल्याचं समोर आलं आहे. माजी आमदार लवू मामलेदार आणि आलेक्स रेजिनाल्ड यांनी तृणमूलला रामराम ठोकल्यानंतर आता मगोपही आपली युती तोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे येत्या काळात गोव्याच्या राजकारणात पुन्हा एक नवं वळण येण्याची शक्यता आहे. (MGP TMC Alliance Latest News Updates)
भाजपची गोवा विधानसभेसाठी (Goa Assembly Elections) उमेदवारांची यादी आज जाहीर होणार आहे. मात्र ही यादी जाहीर होण्यापूर्वी भाजप नेत्यांची दिल्लीवारी वाढल्याचं चित्र आहे. त्यातच दिल्लीत झालेल्या बैठकीत मगोपला युती केल्यास जागा सोडण्याबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे तृणमूलकडून मागितलेल्या जागा न मिळाल्याने नाराज झालेला मगोप पुन्हा भाजपसोबत जाण्याची शक्यता आहे. यासाठी भाजपचे (BJP) गोवा प्रभारी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई कामाला आल्याचीही चर्चा आहे.
दरम्यान मगोप-तृणमूल युतीमुळे भाजपला मतविभाजनाचा धोका होता. यापूर्वी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी मगोप-भाजप युतीसाठी प्रयत्न केले होते. मात्र फडणवीसांची शिष्टाईच अखेर फळाला आली आहे. मगोप आणि भाजप युती झाल्यास इतर पक्षांसमोर मात्र तगडं आव्हान उभं ठाकणार आहे. असं असलं तरीही मगोप-भाजप युती झाल्यास भाजपमधून मगोपमध्ये गेलेले प्रवीण झांट्ये आणि मगोपतून भाजपमध्ये गेलेले प्रवीण आर्लेकर यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत. इतकंच नाही तर काँग्रेसमधून (Congress) भाजपमध्ये दाखल झालेल्या रवी नाईकांची सुदिन ढवळीकरांविरोधात निवडणूक लढवण्याची इच्छाही अपुरीच राहणार आहे. अद्याप तृणमूल किंवा मगोपच्या कोणत्याही नेत्यांनी युती तुटण्याचे संकेत मात्र दिलेले नाहीत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.