Navratri 2022 : गोव्याच्या ‘महिला सिंघम’ सुनीता सावंत!

गुंडांचा कर्दनकाळ; ‘उड्डाण’च्या प्रेरणेने खाकीत एकामागोमाग अनेक उड्डाणे
Police Superintendent Sunita Sawant
Police Superintendent Sunita Sawant Dainik Gomantak
Published on
Updated on

Navratri 2022 : पोलिस खात्यात धडाडीच्या व धाडसी महिला पोलिस अधिकारी म्हणून नेहमी नाव पुढे येते ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांचे. पोलिस खात्यात उपनिरीक्षक व निरीक्षकपदी असताना केलेल्या तपासकामामुळे त्यांना मुख्यमंत्री व राष्ट्रपती पोलिस पदक देऊनही गौरविण्यात आले आहे. तपासकामात हातखंडा असलेल्या या अधिकारी आज पोलिस खात्यात इतर महिला पोलिसांना आदर्श ठरत आहेत.

साखळी येथील देऊळवाडा-विठ्ठलापूर येथे जन्मलेल्या सुनीता सावंत यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण साखळीत झाले. लहानपणापासूनच कुटुंबातून तिला शिस्तीचे धडे मिळत गेले. बारावीनंतर त्‍यांनी बीएस्सीमध्ये (केमिस्ट्री) पदवी घेतली. त्‍यानंतर काही महिने साखळीत एका शाळेत विद्यार्जन केले. महाविद्यालयात शिकत असताना टीव्हीवर ‘उड्डाण’ ही मालिका दाखविली जात होती, ती त्या पाहायच्या. त्या महिला आयपीएस पोलिस अधिकाऱ्यांची शिस्त व काम करण्याच्या पद्धतीने प्रभावित होऊन त्‍यांना खाकी वर्दीचे आकर्षण वाटू लागले होते. (Police Superintendent Sunita Sawant Lady Singham of Goa)

अन्‌ संधीचे केले सोने

सुनीता डॉक्‍टर व्‍हाव्‍यात असे त्‍यांच्‍या आई-वडिलांचे स्‍वप्‍न होते. मात्र ते स्वप्न पूर्ण करता न आल्याने पोलिस क्षेत्रात नाव कमावून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे सुनीता यांनी ठरवले. बीएस्सी पदवी पूर्ण केल्यावर शिक्षिकेचे काम करत असतानाच 1990 साली पोलिस उपनिरीक्षकपदासाठी नोकरभरतीची जाहिरात आली. ही संधी कोणत्याही परिस्थितीत सोडायची नाही या जिद्दीनेच त्यांनी लेखी व शारीरिक चाचणी परीक्षा उत्तीर्ण केली.

धाडसी स्‍वभावामुळे आव्‍हाने पेलली

पोलिस खात्यात त्याकाळी अधिक तर महिला नोकरी पत्करत नव्हत्या. त्यामुळे सुनीता यांनाही कुटुंबीयांकडून विरोध झाला. वडिलांचा तर ठाम विरोधच होता, मात्र आईचे प्रोत्साहन मिळाले. अखेर वडिलांची मान्यता मिळाल्यानंतर 1990 साली पोलिस खात्यात उपनिरीक्षक म्हणून त्‍या रुजू झाल्या. त्यानंतर त्यांनी या क्षेत्रात मागे वळून पाहिलेच नाही. त्यांच्या धाडसी स्वभावामुळे पोलिस खात्यातील त्या ‘महिला सिंघम’ ठरल्या. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारी तपासकामात तरबेज ठरल्या.

गुंडगिरी काढली मोडून

पोलिस निरीक्षकपदी बढती मिळाल्यानंतर गुंडांचा दबदबा असलेल्या पोलिस स्थानकाचा ताबा त्‍यांच्‍याकडे देण्यात आला. एरवी पोलिस स्थानकाचा ताबा पुरुष पोलिसांकडे दिला जायचा. मात्र सुनीता सावंत यांची धाडसीवृत्ती पाहून त्‍यांना ‘हार्ड पोस्‍टिंग’ देण्यात आली. ते धनुष्य त्यांनी लीलया पेलले व काही महिन्यांतच सांताक्रुझ, कालापूर, मेरशी व चिंबल येथील गुंडांना वठणीवर आणले. रात्रीच्या वेळी पोलिस वाहनांतून त्यांनी गस्त सुरू केल्यावर रात्रीच्या गुंडगिरीला आळा बसला. गुंडांना वारंवार पोलिस स्थानकात हजेरी लावण्याचे बंधन घालून त्‍यांनी ही गुंडगिरीच मोडून काढली.

Police Superintendent Sunita Sawant
Gomantak Exclusive: गोवा राज्यावरील अंमली पदार्थांचा विळखा सुटेल का?

पतीची मिळाली मौलिक साथ

विवाहानंतर सुनीता सावंत यांच्यावरील जबाबदारी वाढली. मात्र त्यांनी पोलिस खात्यातील आपल्‍या कामावर त्याचा परिणाम होऊ दिला नाही. कुटुंबाची जबाबदारी मात्र व्यावसायिक असलेल्या पतीने पेलल्‍याने त्यांची यशस्वी वाटचाल पुढे सुरू राहण्यास मदत झाली. आजही त्या कुटुंब सांभाळतानाच आपल्या कामात तेवढ्याच तत्‍परतेने झोकून देतात. अनेकदा घरातील सणांना त्यांना मुकावे लागते. मुलांनाही वेळ देण्यास मिळत नसल्याची खंत त्यांना आहे. मात्र पोलिसांची ड्यूटी 24 तास असल्याने त्याला पर्याय नसल्याचे गृहित धरूनच त्या आजपर्यंत काम करत आहेत. म्‍हणूनच आजही त्‍यांना त्यांच्या कामामुळे पोलिस अधिकारी म्हणून ओळखले जाते. समाजातील विविध लोकांशीही त्‍यांचे जवळचे संबंध आहेत. त्यांनी जिल्हा, सुरक्षा तसेच क्राईम ब्रँचमध्येही काम केले आहे.

खाण घोटाळ्‍याचाही केला तपास

लैंगिक अत्याचारप्रकरणी तरुण तेजपाल प्रकरणाचा तपास तसेच राज्यातील कोट्यवधींचा खाण घोटाळाप्रकरणी एसआयटी स्थापन करून सुनीता सावंत यांच्‍याकडे तपास देण्यात आला होता. दिलेली जबाबदारी त्यांनी कधीही नाकारली नाही. नेहमी कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची तसेच जबाबदारी स्वीकारून ती पार पाडण्याच्या त्यांच्या स्वभाव व वृत्तीमुळे त्या एक यशस्वी पोलिस अधिकारी बनल्या आहेत.

अनेक प्रकरणांचा लावला छडा

सुनीता सावंत यांनी पोलिस खात्यात केलेल्या तपासाची प्रकरणे अनेक आहेत. क्राईम ब्रँचमध्ये पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक असताना त्यांनी अनेक प्रकरणांचा छडा लावला आहे. त्यात महिलांना गाडीमध्ये लिफ्ट देऊन त्यांचा गळा आवळून ठार मारणे तसेच मृतदेह जाळून त्याची विल्हेवाट लावणाऱ्या टोळीचा शोध घेण्याचे काम त्यांच्याकडे सोपविण्यात आले होते. पाच प्रकरणांचा (सीरियल किलिंग) छडा लावताना त्यांनी टोळीचा पर्दाफाश केला. फोंड्यात उपअधीक्षक असताना एका तरुणाचा डोके ठेचून खून करण्‍यात आला होता. त्याच्या खिशात सापडलेल्या रेल्वे तिकिटाच्या मदतीने त्‍यांनी आरोपीला हुडकून काढले. कोणत्याही प्रकरणाचा तपास लावताना शोध घेण्याची चिकाटी व खडतर मेहनत ही त्यांच्या यशाची गुरुकिल्ली ठरली आहे.

पोलिस सेवेतील कामगिरी

1990 : गोवा पोलिस सेवेत रुजू

2001 : निरीक्षकपदी बढती

2009 : मुख्यमंत्री पोलिस पदक

2014 : उपअधीक्षकपदी बढती

2014 : डीजीपी इनसिग्निया

2016 - राष्ट्रपती पोलिस पदक

2022 - अधीक्षकपदी बढती (गोपोसे)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com