पणजी: सोमवारपासून श्रावणाला (Shrawan) सुरवात होणार आहे. त्यामुळे पुढील महिनाभर मांसाहाराला फाटा असेल, या पार्श्वभूमीवर पणजी (Panjim) शहरासह राज्यातील नागरिकांनी चिकन, मटण आणि नुस्त्यावर ताव मारला. परिणामी, चिकन, मटण आणि मासळी बाजारात माेठ्या उलाढालीची शक्यता आहे. शनिवारपासूनच मार्केटमध्ये मोठी गर्दी उसळल्याचे पहावयास मिळाले. (Meat sales may increase in Goa)
शनिवारी पणजी मार्केटमध्ये खवय्यांची चिकन, मटण आणि माशांच्या खरेदीसाठी गर्दी झाली होती. खरेदी वाढणार याची कल्पना असल्याने दुकानदारांनीही अधिक कोंबड्या आणि बकरी आयात केली आहेत. नेहमीच्या तुलनेत 30 टक्क्यांनी व्यापारात वृध्दी होईल, असे चिकन विक्रेता शब्बीर शेख यांनी सांगितले.
मार्केटमध्ये चिकनचे दर नेहमीप्रमाणेच स्थिर आहेत. जिवंत कोंबडा प्रती किलो 150 रुपये, कापलेली कोंबडी प्रती किलो 220 ते 250 तसेच सोललेले चिकन 320 रुपये प्रती किलो विकले जात होते. तर बकऱ्याच्या मटणाचे दर मात्र वाढविण्यात आले आहेत.
कालपर्यंत मटण 800 रुपये प्रतिकिलो विकले जात होते, ते शनिवारी प्रती किलो 900 रुपये इतके होते. कर्नाटकातून बकऱ्यांची आयात करण्यात व्यत्यय येत असल्याने दर वाढल्याचे अमिदअहमद बेपारी यांनी सांगितले. खवय्यांनी दुकांनासमोर गर्दी केल्याने दुपारपर्यंत अनेक दुकानातील चिकन आटोपले होते. संध्याकाळी पुन्हा कोंबड्या मागविण्यासाठी व्यापाऱ्यांची धडपड सुरू होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.