

पिसुर्ले: पर्ये मतदारसंघात येणाऱ्या होंडा पंचायत क्षेत्रातील भुईपाल कॉलनी येथे राहणाऱ्या एका सर्वसामान्य कुटुंबातील मयुरी लक्ष्मीकांत नाईक हिने अथक परिश्रम घेऊन राज्य सरकारने आयोजित केलेल्या गोवा लोकसेवा आयोगाच्या मामलेदारपदाच्या भरतीत पहिल्या टप्प्यात यश प्राप्त करून मामलेदार बनण्याचा मान मिळवला आहे. त्यामुळे त्यांच्यावर सर्व थरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. पर्ये मतदारसंघाच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी तिच्याशी संवाद साधून खास शब्दात अभिनंदन करून शाब्बासकी दिली आहे.
भुईपाल कॉलनी येथे राहणाऱ्या मयुरी लक्ष्मीकांत नाईक ही एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी असून तिचे प्राथमिक शिक्षण मराठीतून वेळगे - डिचोली येथे झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण वाळपई येथील अवर लेडी माध्यमिक विद्यालयात झाले. त्यानंतर तिने पर्ये - सत्तरी येथील श्री भूमिका उच्च माध्यमिक विद्यालयातून कला शाखेची बारावी उत्तीर्ण पदवी प्राप्त केली.
मात्र घरची परिस्थिती बेताची असतानासुद्धा तिने मागे न हटता साळगावकर कायदा महाविद्यालयातून बीए एलएलबी परीक्षा उत्तीर्ण करून कायद्याची पदवी प्राप्त करून वकील बनण्याचा मान मिळवला. त्यानंतर तिने काही दिवस एका वकिलांच्या हाताखाली काम केले.
सुरवातीच्या काळापासून अभ्यासात हुशार असलेल्या मयुरी हिला आपण आयुष्यात काही तरी वेगळे करून दाखवण्याची जिद्द व चिकाटी होती. त्यामुळे तिने आपले ध्येय निश्चित करून गोवा लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. यासाठी तिने कुठल्याही प्रकारचे खास प्रशिक्षण घेतले नाही. आपल्याकडे असलेल्या ज्ञानाच्या आधारे तिने मामलेदारपदाच्या परीक्षेचा सराव करून पहिल्या टप्प्यात ही परीक्षा उत्तीर्ण झाली. या पुढेही तिने उच्च दर्जाचे शिक्षण घेण्याची तयारी ठेवली असून यूपीएससीसारख्या परिक्षेचा पल्ला गाठायचा असल्याचे तिने सांगितले.
दिशा निश्चित करून वाटचाल करा.
मयुरी नाईक हिने सुशिक्षित तरुण तरुणींना प्रेरणादायी संदेश देताना सांगितले, की ‘आपले ध्येय निश्चित करून पुढे गेले पाहिजे, आपल्या दैनंदिन जीवनात वावरताना पुढील दिशा निश्चित करून आपली शैक्षणिक वाटचाल करावी’.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.