

मडगाव: मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या निर्देशांनुसार, नगरपालिका हद्दीत असलेल्या भटक्या कुत्र्यांचे, गुरांचे तसेच अन्य प्राण्यांचे सर्वेक्षण मडगाव पालिकेने हाती घेतले आहे. प्राण्यांशी संबंधित काम करणाऱ्या एनजीओ तसेच नागरिकांनी याबाबतची माहिती द्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.
गोव्यातील भटक्या प्राण्यांची अचूक संख्या आणि त्यांचे ठिकाण निश्चित करण्यासाठी सुरू केलेल्या राज्यव्यापी प्राणी मॅपिंग मोहिमेंतर्गत मडगाव पालिकेने नागरिक, प्राणीप्रेमी, फीडर्स आणि स्वयंसेवकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
पाळीव प्राण्यांबाबत पालिकेचे आवाहन
२५ सप्टेंबरपूर्वी मडगावातील सर्व २५ प्रभागांमधील प्राणी फीडर्स, ज्यांच्याकडे पाळीव प्राणी आहेत, तसेच स्वयंसेवकांनी संबंधित प्रभाग नगरसेवक किंवा नियुक्त पालिका प्रतिनिधींशी संपर्क साधावा. आपल्या परिसरातील भटक्या कुत्र्यांची व गुरांची संख्या, त्यांचे ठिकाण तसेच उपलब्ध असल्यास आरोग्य व लसीकरणासंबंधी माहिती सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
२ ऑक्टोबरपर्यंत अहवाल तयार : सध्या राज्यात अंदाजे भटक्या प्राण्यांची संख्या १.५ लाखांपर्यंत असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, या सर्वेक्षणातून मिळणारा डेटा २ ऑक्टोबरपर्यंत पशुसंवर्धन खात्याला सादर केला जाणार असून, त्याच्या आधारे निर्बीजीकरण, लसीकरण आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबवल्या जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
इजा पोहचणार नाही
पालिकेने स्पष्ट केले आहे की, ही मोहीम केवळ प्राण्यांची गणना व मॅपिंग करण्यासाठी असून, सर्वेक्षणादरम्यान कोणत्याही प्राण्याला इजा पोहोचवली जाणार नाही किंवा त्यांना कायमस्वरूपी हटविले जाणार नाही. गोव्यातील भटक्या कुत्र्यांच्या संख्येबाबत केंद्र व राज्य सरकारकडून सादर केलेल्या आकडेवारीत मोठी तफावत असल्याने, उच्च न्यायालयाने अचूक माहिती प्राप्त व्हावी यासाठी हे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत.
१ ते १५ ऑक्टोबर प्रत्यक्ष जनगणना
यानंतर १ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत शहरी आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांकडून प्रभागनिहाय प्रत्यक्ष जनगणना केली जाईल. या सर्वेक्षणात भटके कुत्रे, रस्ते व महामार्गालगत आढळणारी भटकी गुरे तसेच पाळीव कुत्र्यांची नोंद केली जाणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.