Goa Garbage Issue: बाणावली परिसरात पश्र्चिम बगल रस्त्याच्या बाजूला नगरपालिकेने टाकलेल्या कचऱ्यावरून शॅडो कौन्सिलने मडगाव नगरपालिका व मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना धारेवर धरले आहे. आज मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी जोरदार टीका केली.
त्या जागेवर कचरा टाकणे व नंतर तो उचलणे याला जो खर्च झाला आहे तो नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांकडून वसूल करावा, असे कुतिन्हो यांनी सांगितले.
मडगावचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी आमदाराच्या तालावर नाचतात म्हणून ही स्थिती उद्भवल्याचे कुतिन्हो यांनी म्हटले आहे.
त्याचबरोबर शॅडो कौन्सिलने बाणावली नागरिकांचे अभिनंदन केले व त्यांनी दाखवलेल्या धैर्याचे कौतुक केले. कचऱ्यासंदर्भात मडगावचे व मडगावकरांचे नुकसान झाले आहे, असे कुतिन्हो यांनी सांगितले.
नगरपालिकेने घन कचऱ्यासंदर्भातील 2020 सालची कायद्यातील कलमे अवलंबली असली, तरी त्यातील काहीच कलमांची अंमलबजावणी केली जात आहे व बाकीची कलमे केवळ हवेतच असल्याचे कुतिन्हो यांनी सांगितले.
यावेळी ॲड. स्नेहल ओंसकर, आर्किटेक्ट कार्लोस ग्रासियस, इफ्तियाझ सय्यद, लोयला रॉड्रिग्ज, मारिया दो कार्मो परेरा, माथिल केरोल. अझीझ शाह आदी उपस्थित होते.
आमदारांमुळे बेकायदेशीर बांधकामे
कुतिन्हो यांनी आमदार कामत यांच्यावर खरपूस टीका केली. मडगावमध्ये जी बेकायदेशीर अतिक्रमणे व बांधकामे होत आहेत, ती केवळ आमदारांच्या आशीर्वादाने होत असल्याचे त्यांनी सांगितले. नगरपालिकेला कचऱ्यासंदर्भात जे नुकसान झाले आहे ते वसूल करून घेण्यासाठी शॅडो कौन्सिल योग्य अधिकारिणीकडे संपर्क साधेल, असेही कुतिन्होने सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.