
मडगाव: येथील पालिका अख्यत्यारिकेतील व्यावसायिकांना आता व्यावसायिक व साईन बोर्ड शुल्क वाढ अपरिहार्य ठरली आहे. आज शुक्रवारी पालिका बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले.
या विषयावरील मागील बैठकीत झालेल्या इतिवृत्ताचा वरील विषय आला असता विरोधी गटाच्या नगरसेवकांनी त्याला विरोध केला, मात्र हा विरोध डावलून पालिकेने आपला निर्णय घेतला.
विरोधी नगरसेवकांनी आवाजी मतदानाची मागणीही केली. मात्र मागच्या बैठकीत एकाही नगरसेवकांनी त्याला विरोध केला नव्हता. आम्ही कायद्यानुसार दरवाढ केली असून आता काहीजण आपला राजकीय अजेंडा राबविण्यासाठी विरोध करत आहे असे सांगून, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही हा निर्णय घेतल्याचे सांगितले.
नगरसेवक घनश्याम शिरोडकर यांनी या इतिवृत्तात वरील विषयाला आपण दुसरा अनुमोदक असल्याचा उल्लेख आहे ते चुकीचे आहे असे सांगितले. नगराध्यक्ष शिरोडकर यांनी ही बाब अमान्य करताना आपणच त्यावेळी दुसरा अनुमोदक होतो, असे सांगितले.
स्थनिकांचा त्याला विरोध असतानाही पालिकेने करवाढ करत हम करेसो कायदा या उत्कीनुसार निर्णय घेतला. सरकारच्या अध्यादेशानुसार पालिकेचे सत्ताधारी वागले असा आरोप करताना करदात्याची ही लूट असल्याचे शॅडो काउंसिलचे सावियो कुतिन्हो म्हणाले. नगराध्यक्षांनी इतिवृत्ताला मान्यता देण्यास कायद्याने कुठलीही तरतूद नसल्याचे बैठकीत सांगून आपल्या अकलेचे तारे तोडले. नगसेवक घनश्याम शिरोडकर यांनी आपण करवाढीसंबंधी अनुमोदन दिले नव्हते असे सांगूनही नगराध्यक्षांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. आपल्या स्वार्थासाठी हे भाजपचे पालिका मंडळ लोकांना लुटत असल्याचा आरोप त्यांनी केला.
मडगाव पालिका इमारतीचे सुशोभीकरण सरकार करणार असल्याचा विषयही बैठकीत चर्चेला आला. त्याविषयी ठराव संमत करण्यात आला.
मडगावात बहुउद्देशीय कार पार्किंग प्रकल्पाचा विषय चर्चेला आला, एकंदर हा १०.५ कोटींचा प्रकल्प असून, गोवा पायाभूत साधन सुविधा महामंडळातर्फे काम होणार आहे, त्याला संमती देण्यात आली.
पे पार्किंगसाठी पाच जागा निवडण्यात आल्या आहेत, यावर चर्चा झाली. नगरसेवकांनी त्याचे स्वागत केले.
दुचाकी चालकांसाठी प्रतितास ५ रुपये तर चारचाकी वाहनांसाठी हा दर १० रुपये ठेवावा असे सांगताना, या ठिकाणी रेंट अ बाईक व रेंट अ कारचालकांना आपली वाहने ठेवण्यासाठी देऊ नये असे मत नगरसेवकांनी व्यक्त केले.
मडगावच्या जुन्या बसस्थानकांवरील ७० गाड्यांचे पुनर्विकास होईल.
तसेच एसटी लोक आपले उत्पादन विक्रीसाठी येथील दक्षिण गोवा जिल्हा पोलिस मुख्यालयासमोर बसतात त्यांच्यासाठी तिठा बांधण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
पालिकेच्या वाहनांसाठी आत्ता एकच रंग वापरण्याचा निर्णयही घेण्यात आला.
सोनसोडो कचऱ्यासंबंधी बेलिंगच्या कामासाठी आउट सोर्स वापरण्याचा निर्णय घेण्यात आला.
बायोगेसी फिकेशन प्रकल्पाचा विषय आला असता, त्यावर नगरसेवकांनी आम्हाला त्याचे सादरीकरण करण्यास सांगितले. त्यावर चर्चा झाली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.