लोटली येथे झालेल्या कन्हैयाकुमार मंडल खून प्रकरणात मायणा-कुडतरी पोलिसांनी अटक केलेल्या कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील कलमानी गावातील ट्रकचालक वासुदेव मदार (56) याला मडगावच्या जिल्हा न्यायालयाने जामिनावर सोडण्याचा आदेश दिला.
मायणा-कुडतरी पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रानुसार हे प्रकरण खुनाचे असून रस्त्यावर पडलेल्या एका व्यक्तीच्या अंगावरून ट्रक नेल्याचा या संशयितावर आरोप आहे. मुसळधार पाऊस पडत होता आणि रस्त्यावर एक व्यक्ती पडलेली आहे हे आपल्याला दिसले नाही, असे स्पष्टीकरण संशयिताने न्यायालयात दिले आहे. त्याचबरोबर धारदार शस्त्राने गळा कापल्याच्या खुणा सापडल्याचे शवचिकित्सा अहवालात स्पष्ट करण्यात आलेले आहे.
एकंदर परिस्थिती पाहून अतिरिक्त सत्र न्यायाधीश सई प्रभुदेसाई यांच्या न्यायालयाने या संशयिताला काही अटी घालून जामिनावर सोडण्याचा आदेश दिला. आरोपपत्र सादर करेपर्यंत प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला या प्रकरणातील चौकशी अधिकाऱ्यापुढे हजर राहावे, परवानगीविना देशाबाहेर जाता कामा नये आदी अटी घातलेल्या आहेत.
लोटली लिंक रोडवर मृतावस्थेत सापडलेल्या कन्हैयाकुमार मंडल याच्या खुनाला आज 40 दिवस उलटले तरी मायणा-कुडतरी पाेलिसांना अद्याप खरा खुनी सापडलेला नाही. 24 जून रोजी लोटली लिंक रोडवर रात्रीच्यावेळी कन्हैयाकुमारचा खून करण्यात आला हाेता.
दुसऱ्या दिवशी पाेलिसांना त्याचा मृतदेह सापडला. त्याच्या मृतदेहावरून वाहन गेल्याचे दिसून आल्यानंतर पोलिसांनी सुरवातीला अपघाती मृत्यू म्हणून हे प्रकरण नाेंद केले होते. मात्र, नंतर मृतदेहाच्या अंगावर धारदार शस्त्राने भोसकल्याच्या खुणा सापडल्याने या प्रकरणात खुनाचा गुन्हा नोंद केला हाेता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.