

खांडोळा: माशेल येथील गोवा बागायतदार बाजार संकुल आणि कदंबा बसस्थानकासमोरील जंक्शनवरील मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक, पादचारी तसेच शालेय विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. पावसामुळे या रस्त्याची अधिकच दुरवस्था झाली असून, दिवसेंदिवस अपघातांचा धोका वाढत आहे. अनेक दिवस उलटूनही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
या मार्गावरून दररोज शेकडो दुचाकी, चारचाकी, बस तसेच मालवाहू वाहने ये-जा करतात. याशिवाय गोवा बागायतदार बाजार संकुलात येणारे व्यापारी, ग्राहक आणि कदंबा बसस्थानकाचा वापर करणारे प्रवासीही याच रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे हा परिसर कायमच वर्दळीचा असतो. मात्र रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून वाहनचालकांना मोठी कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचत असल्याने त्यांची खोली वाहनचालकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे अचानक वाहन खड्ड्यात गेल्याने दुचाकीस्वारांचा तोल जात असून, अनेक वेळा किरकोळ अपघात घडत आहेत. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली आहे. संबंधित विभागाने वेळेत दखल न घेतल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
पाणीपुरवठा जलवाहिनी टाकण्यासाठी हा रस्ता खोदण्यात आला होता. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता योग्य पद्धतीने पूर्ववत करण्यात आला नाही. त्यामुळे सुमारे एक फूट रुंदीचा चर तयार झाला असून त्याच्या कडेला मोठमोठे खड्डे पडले आहेत. सततच्या पावसामुळे या खड्ड्यांचा आकार वाढत असून रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे.
सुरक्षिततेचा प्रश्न!
विशेष म्हणजे, हा रस्ता खांडोळा, आमोण्याकडे जाण्यासाठी प्रमुख वाहतूक मार्गांपैकी एक असून बाजारपेठ, बसस्थानक आणि आसपासच्या गावांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाने तसेच संबंधित यंत्रणांनी या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असतानाही दुरुस्तीचे कोणतेही काम हाती घेण्यात आले नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.