
डिचोली: मराठी भाषेला मोठी परंपरा आहे. मात्र, ठराविक घटकांचे लाड पुरवण्यासाठी राजकारण्यांकडून मराठीचा गळा घोटण्याचे षडयंत्र सुरू आहे, अशी भीती मराठी राजभाषा निर्धार समितीचे निमंत्रक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी व्यक्त केली. मराठी राजभाषा होणारच या निर्धाराने सर्वांनी निर्णायक पेटून उठण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले.
मराठी हा गोमंतकीयांचा श्वास आणि ध्यास आहे. मराठीची पताका जगभर फडकली आहे. मराठीमुळेच संस्कृती टिकून आणि शाबूत राहिली आहे. मराठी भाषा नष्ट झाली, तर संस्कृतीबरोबर आजची युवा पिढी उद्धवस्त होईल, अशी भीतीही प्राचार्य वेलिंगकर यांनी व्यक्त केली. मराठी राजभाषा निर्धार समितीतर्फे (रविवारी) मये येथे पहिल्या पंचायत प्रखंड मेळाव्यात मराठीप्रेमीं कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करत होते.
केळबायवाडा-मये येथील रामवंश सभागृहात आयोजित मेळाव्याप्रसंगी डिचोली प्रखंडाचे प्रा. मुकुंद कवठणकर, प्रा. आत्माराम गावकर, लाडको किनळकर, अरविंद सायनेकर, निवृत्त शिक्षक मारुती पाटील, हरी नाईक, राजन नाईक, हरिश्चंद्र च्यारी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
हरी नाईक यांनी प्रास्ताविकपर भाषणात मराठी राजभाषा निर्धार समितीला स्थानिकांचा निश्चितच पाठिंबा मिळणार. असे सांगितले. प्रा. मुकुंद कवठणकर यांनी प्राचार्य वेलिंगकर यांचा परिचय केला. धनंजय मोने यांनी सूत्रसंचालन केले. शिवानंद नाईक यांनी आभार मानले. पसायदानाने मेळाव्याची सांगता झाली.
मराठीची अस्मिता टिकवून ठेवण्यासाठी तर मराठीप्रेमींची ‘व्होट बॅंक’ आवश्यक आहे. मराठीचा गळा घोटणाऱ्या गद्दार राजकारण्यांना मराठीप्रेमींकडून त्यांची जागा दाखवून द्यायची आता वेळ आली आहे, असे स्पष्ट मत प्राचार्य वेलिंगकर यांनी व्यक्त करुन मराठीप्रेमींनी संघटित व्हावे, असे आवाहनही केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.