

म्हापसा : सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आणि जबरदस्त मानसिक धक्का बसलेल्या अवघ्या २२ वर्षांच्या एका चुणचुणीत तरुणाने आपले आयुष्य कायमचे संपविले.
म्हापसा येथे कॉलेजच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या सॅम्युअल गार्विन डी ब्रागांझा (रा. गावसावाडो, म्हापसा) या विद्यार्थ्याने बदनामीच्या भीतीने आणि असह्य मानसिक त्रासाला कंटाळून राहत्या घरी देशी कट्ट्याने स्वत:वर झाडली गोळी.
मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारले असता, त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यास सांगितल्याचे नमूद केले.
नेमके काय घडले?
सॅम्युअलच्या घरात विजेचे काही काम होते. म्हापसा पालिकेकडून वेळेवर कचरा गोळा केला जात नसल्याने सॅम्युअलने तो जमा झालेला कचरा रस्त्याच्या कडेला टाकला.
कचरा उघड्यावर टाकणे, ही त्याची चूक नक्कीच होती आणि त्यावर कायद्यानुसार कारवाई होणे अपेक्षितही होते. मात्र, कायदा आपले काम करण्याआधीच सोशल मीडियावरील लोकांनी आपला क्रूर खेळ सुरू केला.
कोणीतरी या घटनेचा व्हिडिओ बनवून इंटरनेटवर अपलोड केला आणि तो वाऱ्यासारखा पसरला. म्हापसा पोलिसांनीही या व्हिडिओची तातडीने दखल घेत सॅम्युअलवर गुन्हा दाखल केला.
अडचण पोलिसांच्या कायदेशीर कारवाईची नव्हती, तर त्यासोबत सुरू झालेल्या भयानक डिजिटल छळाची होती. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेला हा तरुण अचानक हजारो अनोळखी लोकांच्या निशाण्यावर आला.
सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये त्याच्यावर टीका, टोमणे आणि ट्रोलिंगचा निर्दयी खेळ सुरू झाला. परिणामी तो कोवळा तरुण एका रात्रीत मानसिकदृष्ट्या कोलमडून गेला आणि त्याने स्वत:वर गोळी झाडली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.