

म्हापसा: शहरात मॉडीफाइड सायलेन्सर वापरून आवाजाचे प्रदूषण करणाऱ्या बुलेटस्वारांविरुद्ध म्हापसा वाहतूक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कानठळ्या बसवणारा आवाज काढणाऱ्या सहा ‘रॉयल एनफील्ड बुलेट’ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या असून, न्यायालयाने संबंधित वाहनचालकांना चांगलाच दणका दिला आहे.
जप्त केलेल्या सहाही बुलेटस्वारांना म्हापसा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर, न्यायालयाने प्रत्येक उल्लंघनकर्त्याला १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. केवळ दंड आकारून न थांबता, न्यायालयाने संबंधितांना तातडीने सुधारित सायलेन्सर काढून त्या जागी कंपनीचे मूळ सायलेन्सर बसवण्याचे आदेश दिले आहेत.
जर हेच चालक पुन्हा एकदा अशाच प्रकारचे नियम उल्लंघन करताना आढळले, तर त्यांच्या दुचाकीची नोंदणी कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल, असा इशारा न्यायालयाने दिला आहे. या उल्लंघनकर्त्यांमध्ये पाचजण स्थानिक तर एका महाराष्ट्रातील चालकाचा समावेश होता. दरम्यान, नुकतीच पणजीत अशाचप्रकारची कारवाई केली होती. त्याचे नागरिकांतून स्वागत करण्यात आले होते. आता म्हापशातही कारवाई करण्यात आली आहे, ती अशीच सुरू राहील, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मोहीम सुरूच राहणार!
गेल्या काही दिवसांपासून म्हापसा आणि परिसरात मॉडिफाइड सायलेन्सरमुळे नागरिक, विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि रुग्ण त्रस्त होते. वाहतूक पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे आणि न्यायालयाच्या कठोर भूमिकेमुळे अशा बेशिस्त चालकांवर वचक बसेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. वाहतूक पोलिसांनी यापुढेही अशाप्रकारची मोहीम सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.