

म्हापसा: शुक्रवारच्या आठवडी बाजाराची संधी साधत चोरट्यांनी म्हापसा शहरात धुमाकूळ घातला. मध्यवर्ती बाजारपेठेतील तब्बल आठ दुकाने तसेच गणेशपुरी येथील बहुमजली निवासी इमारतीतील बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी रोख रक्कम आणि सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर घडलेल्या या घटनांमुळे व्यापारी आणि रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांच्या रात्रगस्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री अंधाराचा फायदा घेत तीन अज्ञात चोरट्यांनी मध्यवर्ती बाजारपेठेत प्रवेश केला. उपाहारगृह, कपड्यांचे दुकान, मोबाईल शॉपी, लेडीज टेलर, चप्पल दुकान तसेच घाऊक व किरकोळ विक्रीच्या दुकानांसह एकूण आठ दुकानांची कुलपे तोडून त्यांनी आत प्रवेश केला. गल्ल्यातील रोख रक्कम आणि दुकानातील माल असा सुमारे एक ते दोन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. चोरी करताना त्यांनी दुकानांतील साहित्यही अस्ताव्यस्त केले.
दरम्यान, गणेशपुरी भागातील निवासी इमारतीतील एका बंद फ्लॅटचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ४ सप्टेंबरच्या रात्री ११.३० ते ५ सप्टेंबरच्या पहाटे १.४० या वेळेत राहुल शिरोडकर यांच्या फ्लॅटचे मुख्य कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. कपाटातून सुमारे ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, ६ ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या आणि ६ ग्रॅम वजनाची कानातली जोड असा एकूण ४२ ग्रॅम सोन्याचा ऐवज लंपास केला. शिरोडकर यांच्या तक्रारीवरून म्हापसा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
कार्यक्षेत्र कमी झाले, तरी पोलिसांचा प्रभाव कुठे?
१) म्हापसा शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन कडक पावले उचलण्याची गरज असल्याचे मत म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांनी व्यक्त केले.
२) इतर पोलिस ठाण्यांची निर्मिती झाल्यामुळे म्हापसा पोलिस ठाण्याचे कार्यक्षेत्र कमी झाले असले, तरी शहरात पोलिसांचा प्रभावी वावर जाणवत नाही. म्हापसा हे महत्त्वाचे व्यापारी शहर असल्याने वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी येथे अतिरिक्त पोलिस कर्मचाऱ्यांची तातडीने नियुक्ती करावी, अशी मागणी डिसोझा यांनी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.