

म्हापसा येथील एका बड्या व्यावसायिकाला हनीट्रॅपमध्ये अडकवून तब्बल ३० लाख रुपये उकळल्याच्या हाय-प्रोफाइल सेक्सटॉर्शन प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात पोलिसांना मोठं यश आलंय. गोवा पोलिसांनी उत्तराखंडच्या विशेष कृती दलाच्या (STF) मदतीनं संयुक्त कारवाई करत सलमान नावाच्या मुख्य आरोपीला डेहराडूनमधून बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या तीन वर्षांपासून पोलीस या आरोपीच्या शोधात होते.
हे संपूर्ण प्रकरण ऑगस्ट २०२३ मधील आहे. आरोपी सलमान आणि त्याच्या टोळीनं म्हापसा येथील एका नामांकित व्यावसायिकाच्या बंगल्यावर थेट छापा टाकला होता. यावेळी या टोळीनं आपण 'दिल्ली नार्कोटिक्स ब्युरो'चे (अमली पदार्थ नियंत्रण कक्ष) वरिष्ठ अधिकारी असल्याचं भासवलं.
या बनावट छाप्यादरम्यान आरोपींनी संबंधित व्यावसायिकाला केवळ धमकावलेच नाही, तर मारहाणही केली. त्यानंतर त्याचे काही आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवून त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. बदनामीच्या भीतीनं व्यावसायिकानं या टोळीला ३० लाख रुपये दिले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही टोळी अत्यंत पद्धतशीरपणे श्रीमंत आणि बड्या व्यावसायिकांना आपले लक्ष्य बनवत असे. सुरुवातीला सुंदर महिलांच्या माध्यमातून व्यावसायिकांना हनीट्रॅपमध्ये ओढले जायचे.
त्यानंतर छुप्या कॅमेऱ्यांच्या मदतीनं त्यांचे खाजगी क्षण आणि आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड केले जात असत. हे व्हिडिओ सोशल मीडियावर किंवा कुटुंबियांसमोर व्हायरल करण्याची धमकी देऊन कोट्यवधी रुपयांची खंडणी उकळली जायची.
म्हापसा येथील या मोठ्या खंडणीप्रकरणानंतर गोवा पोलीस सातत्याने आरोपींचा माग काढत होते. अखेर तीन वर्षांनंतर मुख्य सूत्रधार सलमान हा डेहराडूनमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गोवा पोलीस आणि उत्तराखंड एसटीएफनं सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. या अटकेमुळे देशातील एका मोठ्या आंतरराज्यीय सेक्सटॉर्शन नेटवर्कचा (Interstate Sextortion Racket) पर्दाफाश होण्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केली असून, या टोळीने इतरही अनेक राज्यांत अशाच प्रकारे लोकांना लुटल्याचा संशय आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.