Mapusa Garbage Issue: म्हापसा पालिका ॲक्शन मोडवर! कचरा फेकणाऱ्या ४५ लोकांना दंड

Mapusa Municipal Council: पालिकेने मध्यरात्रीपर्यंत ४५ लोकांवर दंडात्मक कारवाई करून प्रत्येकी पाच हजाराचा दंड ठोठावला
Mapusa Municipal Council:  पालिकेने मध्यरात्रीपर्यंत ४५ लोकांवर दंडात्मक कारवाई करून प्रत्येकी पाच हजाराचा दंड ठोठावला
Mapusa Waste IssueDainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa Garbage Issue

बार्देश: म्हापसा पालिका क्षेत्रात उघड्यावर कचरा फेकणाऱ्यांवर पालिकेने धडक कारवाई आरंभली आहे. अनेकजण रात्रीच्या वेळी कुठेही कचरा आणून फेकतात, अशा लोकांवर पाळत ठेवून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. हल्लीच पालिकेने ४५ लोकांवर दंडात्मक कारवाई करून प्रत्येकी पाच हजाराचा दंड ठोठावण्यात आला. मध्यरात्रीपर्यंत ही मोहीम चालली, अशी माहिती नगराध्यक्षा डॉ. नूतन बिचोलकर यांनी दिली.

रात्रीच्या वेळी पालिका क्षेत्रात कुठेही उघड्यावर कचरा फेकणाऱ्यांवर पाळत ठेवण्यासाठी तसेच कारवाई करण्यासाठी पालिकेने खास पथक तैनात केले आहे. हल्लीच शुक्रवारी आठवडी बाजाराच्या दिवशी कचरा फेकणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी खास मोहीम राबवण्यात आली. मध्यरात्रीपर्यंत ही मोहीम चालली.

यावेळी ४५ लोकांना रंगेहात पकडण्यात आले व त्यांना प्रत्येकी पाच हजार दंड ठोठावण्यात आला. या कारवाईत तत्कालीन नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगरसेवक तसेच इतर कर्मचारी सहभागी झाले होते, असे नगराध्यक्ष बिचोलकर यांनी सांगितले.

जिल्हा रुग्णालय परिसर, एकतानगर, आसगाव या भागात सर्वात जास्त १ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. एका रिक्षाचालकाला २५ हजार रुपयाचा दंड देण्यात आला, असे बिचोलकर यांनी सांगितले. उघड्यावर फेकण्यात येणाऱ्या कचऱ्यात चिकन सेंटरमधील कचऱ्याचे प्रमाण अधिक असते. पिशव्यांत भरून तो कुठेही फेकला जातो. कचरा टाकण्यासाठी दुचाकी किंवा चारचाकीतून आणला जातो, असे नगराध्यक्ष बिचोलकर यांनी सांगितले.

म्हापशातील केवळ दोनच व्यक्ती

विशेष म्हणजे दंडात्मक कारवाई करण्यात आलेल्यांपैकी म्हापसा पालिका क्षेत्रातील फक्त दोनच व्यक्तींचा समावेश होता. इतर सर्व शेजारील पंचायत क्षेत्रातील लोक होते, असे बिचोलकर यांनी सांगितले.

म्हापसा पालिकेकडे कचरा उचल करणारे कायमस्वरूपी ८० तर हंगामी १७९ मिळून एकूण २५९ कामगार आहेत. तरी पालिका क्षेत्रात जागोजागी कचऱ्याचा ढीग दिसून येतो.

२० दिवसांत ५ लाखांचा दंड वसूल

पालिकेने गेल्या २० दिवसांत उघड्यावर कचरा फेकणाऱ्यांकडून ५ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. अनेकांनी दंड देणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत वादही घातल्याची माहिती बिचोलकर यांनी दिली.

पालिका क्षेत्रात कचऱ्याचे ढीग

म्हापसा पालिका क्षेत्रात दिवसेंदिवस कचऱ्याचे ढीग वाढत चालले आहेत. पालिकेत कायम स्वरूपी व हंगामी मिळून सुमारे २५९ कचरा उचल करणारे कामगार आहेत. हे कामगार नेमके करतात तरी काय, असा प्रश्न सध्या म्हापसावासियांना पडलेला आहे.

कारवाई सुरूच राहणार

पालिकेची ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार आहे. उघड्यावर कचरा फेकणाऱ्यांवर पालिकेचे पथक पाळत ठेवणार आहे. रात्रीही ही मोहीम सुरू राहील. उघड्यावर कचरा फेकताना आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे नगराध्यक्षा बिचोलकर यांनी सांगितले. दरम्यान, पालिकेच्या या धडक मोहिमेमुळे रात्रीच्या वेळी काळोखाचा फायदा घेत कुठेही कचरा फेकणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Mapusa Municipal Council:  पालिकेने मध्यरात्रीपर्यंत ४५ लोकांवर दंडात्मक कारवाई करून प्रत्येकी पाच हजाराचा दंड ठोठावला
Mapusa Crime: म्हापशात युगांडाच्या दोघांना अटक; 20 लाखांचा अमली पदार्थ जप्त

कचरा शेजारील पंचायत क्षेत्रातील !

नगराध्यक्षा बिचोलकर यांच्या म्हणण्यानुसार, आजूबाजूच्या पंचायत क्षेत्रातील अनेक लोक आपल्या घरातील किंवा आस्थापनांतील कचरा आणून पालिका क्षेत्रात टाकतात. त्यामुळे अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसतात. यासाठी पालिकेने खास कारवाईची मोहीम उघडली असून रात्रीही पाळत ठेवून दंडात्मक कारवाई करण्यात येते, असे त्यांनी सांगितले.

म्हापसा पालिकेला लागून असलेल्या पंचायत क्षेत्रातील लोकांकडून मोठ्या प्रमाणात कचरा पालिका क्षेत्रात आणून टाकला जातो. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सर्व पंचायतींना सरकारकडून अनुदान मिळते, तरीही काही पंचायती आपली जबाबदारी पार पाडत नाही. संबंधित पंचायतींनी आपल्या कचऱ्याची जबाबदारी स्वीकारून त्याची योग्य विल्हेवाट लावावी.

डॉ. नूतन बिचोलकर, नगराध्यक्षा, म्हापसा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com