
Mapusa Municipal Council governance updates
म्हापसा: पालिका मंडळाच्या सलग तीनदा तहकूब केलेल्या सर्वसाधारण बैठकीला वीसपैकी १४ नगरसेवकांनी अनुपस्थित राहून अप्रत्यक्षपणे बहिष्कार घातला. दरम्यान, कोरमअभावी सदर बैठक पुढे चालू ठेवण्यास नगरसेवक आनंद भाईडकर यांनी तीव्र आक्षेप घेतला.
मात्र, कायद्याच्या चौकटीतच ही बैठक घेतली जात असल्याचे स्पष्टीकरण मुख्याधिकाऱ्यांनी दिले. मात्र, ही बैठक बेकायदा असून नगराध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असा आरोप विरोधी गटातील नगरसेवकांनी यावेळी केला.
सोमवारी २७ रोजी सकाळी नगराध्यक्षा डॉ. नूतन बिचोलकर यांच्या अध्यक्षतेखाली पालिका मंडळाची बैठक झाली. यावेळी उपनगराध्यक्ष सुशांत हरमलकर, नगरसेवक चंद्रशेखर बेनकर, आशीर्वाद खोजुर्वेकर, आनंद भाईडकर व केयल ब्रागांझा तसेच मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर व इतर अधिकारी उपस्थित होते.
नगराध्यक्षा या सत्ताधारी गट तसेच संपूर्ण पालिका मंडळाचा विश्वास संपादन करण्यास अपयशी ठरल्यात. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी नगरसेवक डॉ. तारक आरोलकर, अॅड. शशांक नार्वेकर व कमल डिसोझा यांनी केली. तसेच या तिघांनी पालिका कार्यालयात हजेरी लावूनही सभागृहाबाहेर राहणे पसंत केले. त्यांनी बैठकीत सहभाग घेतला नाही. तर उर्वरित ११ नगरसेवक पालिकेत आलेच नाहीत. ज्यात सत्ताधारी गटातील नगरसेवकांचा जास्त भरणा होता.
सकाळी ११ वा. आयोजित ही बैठक ११.१० वा. सुरू झाली व अवघ्या अर्धातासाच इतर विकासात्मक प्रस्तावांवर ठराव घेऊन ही बैठक आटोपती घेण्यात आली.
विद्यमान नगराध्यक्षांच्या कार्यकाळात बेकायदा प्रकारांना प्रोत्साहन देत, कायद्याचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. गोवा पालिका कायदा कलम ७८ उपकलम ९(ब) नुसार पालिका मंडळाच्या सर्वसाधारण बैठकीत एक तृतीयांश नगरसेवक उपस्थित हवेत. मुख्याधिकारी नगराध्यक्षांना चुकीचे सल्ले देताहेत, ही निषेधार्ह बाब आहे. सरकारने याची दक्षता घ्यावी. या प्रकाराला आम्ही पालिका संचालनालयाकडे आव्हान देणार आहोत. तसेच नगराध्यक्षांसमवेत आजच्या बैठकीत ज्यांनी सूचक आणि अनुमोदक म्हणून सही केली, त्या नगरसेवकांविरूध्दही अपात्रतेची याचिका दाखल करणार, अशी माहिती विरोधी गटातील नगरसेवकांनी दिली.
आजही बैठक ही कायद्याला अनुसरुन पडली. यात कुठलाही बेकायदेशीरपणा नव्हता. सध्या बेकायदा हा शब्द स्वस्त झाल्याने, या शब्दाचा वापर कुठेही होतोय. माझा नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ फेब्रुवारीपर्यंत आहे. वेळेनुसार मी स्वतःहून बाजूला होईन. अशावेळी मला कुणाच्या सूचनांची किंवा सल्ल्याची गरज नाही.
डॉ. नूतन बिचोलकर, नगराध्यक्ष म्हापसा
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.