बार्देश: गणेश चतुर्थी अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपली आहे, त्यामुळे म्हापसा पालिकेने साफसफाईच्या कामावर भर दिला आहे. ठिकठिकाणी विखरून असलेल्या कचऱ्याची राशी तसेच अस्ताव्यस्त पडलेले इतर साहित्य हटविले जात आहे.
स्थानिक नगरसेवकांच्या उपस्थितीत प्रभागनिहाय ही कामे केली जात आहेत. नुकतीच प्रभाग १२ मध्ये ही मोहीम राबवण्यात आली. यावेळी नगरसेवक आशीर्वाद ऊर्फ परेश खोर्जुवेकर उपस्थित होते. पालिकेच्या कचरावाहू वाहनासह पालिका कामगार या मोहिमेत सहभागी झाले होते.
प्रभाग १२ मध्ये एकतानगर ते दत्तवाडीपर्यंतचा परिसर मोडतो. एकतानगर हाउसिंगबोर्ड भागात नेहमी कचऱ्याच्या राशी दिसून येतात. पालिका दिवसातून दोन वेळा हा कचरा उचलते. नगरसेवक खोर्जुवेकर स्वतः त्या ठिकाणी हजर राहून कामावर देखरेख ठेवतात. दत्तवाडी हा परिसरही याच प्रभागात मोडतो. गुरुवारपासून या परिसरातील कचरा हटविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. काही लोक कचरा उघड्यावर किंवा गटारात फेकतात, हा कचरा गोळा करताना कामगारांना बराच त्रास सहन करावा लागतो.
नगरसेवक आशीर्वाद खोर्जुवेकर यांनी सांगितले की, पालिका क्षेत्रात जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसून येतात, परंतु हा कचरा म्हापशातील लोकांचा नसून बाहेरील लोक हा कचरा आणून टाकतात. मात्र त्याची जबाबदारी पालिकेवर येते. लोक नगरसेवकांना धारेवर धरतात. तसेच काही लोक उघड्यावर तसेच गटारातही कचरा फेकतात, त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास अडचणी येतात, असे ते म्हणाले.
म्हापसा पालिकेकडे सध्या एकच कचरावाहू वाहन असल्याने सर्व प्रभागांमध्ये ती वाहन पोहोचू शकत नाही. त्यामुळे कचऱ्याची उचल वेळेवर करता येत नाही. ही समस्या सुटण्यासाठी आणखी काही दिवस कळ सोसावी लागणार आहे. आज प्रभाग १२ साठी वाहन तसेच कामगारही उपलब्ध झाल्याने येथील कचरा हटवण्यात आला
आशीर्वाद खोर्जुवेकर, नगरसेवक, प्रभाग १२
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.