म्हापसा मार्केटला 'चोर बाझार' असे संबोधणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. मार्केटची बदनामी केल्याबद्दल व्हिडिओ प्रकाशित करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी म्हापसा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीपाद सावंत आणि सचिव सिद्धेश राऊत यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी म्हापसा पोलीस स्थानकात सादर केले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, कळंगुटमधील अशोक भाटी नावाच्या एका व्यक्तीचे यूट्यूब (Youtube) या व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर 'ASHOK BHATI' या नावाने YouTube चॅनेल आहे. त्यावर सदर इसमाने म्हापसा मार्केटबद्दल चुकीची माहिती देणारा व्हिडिओ अपलोड केला आहे.
या व्हिडिओमध्ये त्याने अनेक वेळा म्हापसा मार्केट हे 'चोर बाझार' असल्याचे नमूद केले आहे. म्हापसा मार्केट हे गोव्यातील महत्वाच्या बाजारपेठांपैकी एक आहे. त्यामुळे इथले व्यापारी आणि जनतेसाठी अशी माहिती पसरणे अतिशय आक्षेपार्ह आणि अपमानकारक आहे.
युवकाने हा व्हिडिओ दोन महिन्यांपूर्वी आपल्या चॅनेलवर पोस्ट केला होता. व्हिडिओमध्ये तो मार्केटचा परिसर दाखवत असून वेगवेगळ्या स्टॉल्सवरील वस्तू आणि त्यांच्या किमती सांगत आहे. तसेच हे गोव्याचे चोर बाझार असल्यामुळे इथे तुम्हाला स्वस्त दरात वस्तू मिळतात, अशी खोटी माहिती देताना दिसत आहे. या व्हिडिओबाबत अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
तसेच पर्यटक हे इंटरनेटवर माहिती वाचून आणि व्हिडिओ पाहून गोव्यात फिरण्यासाठी येत असतात. त्यामुळे हा व्हिडिओ चुकीची माहिती देऊन लोकांची दिशाभूल करत असून मार्केटच्या प्रतिष्ठेला गालबोट लावत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
सदर प्रकरणात त्वरित लक्ष घालून या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करावा. तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून या व अशा आक्षेपार्ह आणि दिशाभूल करणार्या पोस्ट काढून टाकण्यास भाटी याला सांगावे, असे अध्यक्ष आणि सचिवांनी निवेदनाद्वारे सांगितले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.