Mapusa Extortion : कळंगुटमध्ये गैरप्रकार चालतात, असा आरोप नुकताच पर्यटनमंत्र्यांनी केला होता. याच पार्श्वभूमीवर, उत्तर गोवा पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी मंगळवारी (ता.२८) कळंगुटमधील पर्यटन भागधारकांसोबत संवाद साधला.
दरम्यान, या भागधारकांनी गैरप्रकारांबद्दल आरोप किंवा तक्रार केली नाही.
कळंगुटमध्ये खंडणी मागितली जातेय, असे कथित आरोप होत असले तरी हा बोलबाला फक्त सोशल मीडियापुरताच दिसतो. मुळात पोलिसांकडे एकही लेखी तक्रार आलेली नाही, असे स्पष्टीकरण उत्तर गोवा पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना दिले.
तत्पूर्वी, कळंगुट पोलिस स्थानकाच्या आवारात अधीक्षक वाल्सन यांनी पर्यटन भागधारकांसोबत बैठक घेत त्यांची गाऱ्हाणी ऐकली.
यावेळी हॉटेलवाले, रेस्टॉरंट, शॅक व्यावसायिक तसेच स्थानिकांचा समावेश होता. यावेळी काही भागधारकांनी अधीक्षकांच्या नजरेस आणून दिले की, पर्यटन हंगामात विविध भागांतून फेरीवाले व भिकारी वर्ग गोव्याकडे विशेषतः कळंगुटकडे वळतात. त्यांची संख्या वाढल्याने पर्यटकांना इथे चालण्यास पुरेशी जागा नसते.
त्यामुळे संबंधितांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी भागधारकांनी केली. त्याचप्रमाणे, टिटोज लेन व अन्यत्र पहाटेपर्यंत कर्णकर्कश संगीत वाजविले जातात.
त्यामुळे उल्लंघनकर्त्यांवर सक्त कारवाई करावी. तसेच बागा परिसरात पोलिस आउटपोस्ट उभारण्याची मागणी भागधारकांनी अधीक्षकांसमोर केली.
लेखी तक्रार नाही
कळंगुटमधील हॉटेलवाल्यांकडून कथित खंडणी मागितली गेली, अशा आशयाचे एक पत्र व्हायरल झाले. मात्र, हे पत्र एका व्हिएतनाम व्हॉट्सअॅप नंबरवरून पाठविले होते. ज्यावर स्थानिकांच्या फर्जी स्वाक्षऱ्या होत्या.
याशिवाय कुणीही याप्रश्नी लेखी तक्रार दिली नव्हती. दरम्यान, या हॉटेलवाल्यांना घेऊन पणजीत बैठक झाली होती का? असे विचारले असता अधीक्षकांनी आपल्याला कल्पना नाही. तरीही याप्रकरणी चौकशी करू, असे सांगितले.
तपासात पूर्ण सहकार्य
गोवा पोलिस अन्य राज्यांतील पोलिस यंत्रणा किंवा अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करते. त्यामुळे गोवा पोलिस असहकार्य करतात, हे हैदराबाद पोलिसांचे आरोप निराधार आहेत. मुळात त्यांनी आपले दावे पुराव्यांशी सिद्ध करावेत.
जेव्हा कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, हैदराबाद आदी राज्याबाहेरून पोलिस यंत्रणा योग्य चॅनेलच्या माध्यमांतून गोवा पोलिसांकडे संपर्क साधते, तेव्हा आम्ही त्यांना मदत करतोच, असेही वाल्सन म्हणाले. उत्तर गोव्यात २५ प्रकरणे आहेत, जिथे गोवा पोलिसांनी राज्याबाहेरील पोलिस यंत्रणेस अलीकडे तपासात मदत केली आहे.
ग्राहकांची लूट नको
काही हॉटेल्स व रेस्टॉरंट्समध्ये येणाऱ्या ग्राहकांकडून ड्रींक्ससाठी अवाजवी पैसे उकळले जातात. त्यांना महागडी ड्रींक्स दिली जातात. असे गैरप्रकार कुठलेही आस्थापन करीत असल्यास त्यांनी ते ताबडतोब बंद करावेत.
अन्यथा दोषींवर सक्त कारवाई केली जाईल, असेही वाल्सन म्हणाले. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी मांडलेल्या प्रश्नांबाबत मी त्यांच्याशी चर्चा करीन. त्यांचे काही विषय असल्यास त्याची दखल घेऊन ते सोडविण्याचे प्रयत्न केले जातील.
निधीन वाल्सन, उत्तर गोवा पोलिस अधीक्षक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.