Mapusa Crime: बाप-लेकापाठोपाठ मातेचाही मृत्‍यू; विष प्राशनाचा संशय, पोलिसांसमोर गूढ उकलण्याचे मोठे आव्हान

Suspected Poisoning Case: इंदिरानगर-करासवाडा येथे भाड्याच्या खोलीत शनिवारी बाप-लेकाचे मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळले.
Mapusa Crime
Mapusa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: इंदिरानगर-करासवाडा येथे भाड्याच्या खोलीत शनिवारी बाप-लेकाचे मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळले. त्यानंतर या प्रकरणातील एकमेव प्रत्यक्षदर्शी आणि गंभीर अवस्थेत असलेल्या सुवर्णा जाधव (वय ३० वर्षे) यांचेही रविवारी सायंकाळी गोमेकॉत उपचार सुरू असताना निधन झाले. त्यामुळे या सामूहिक मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

शनिवारी सकाळी अजय जाधव (वय ३८ वर्षे) आणि त्यांचा ७ वर्षांचा मुलगा अथर्व या दोघांचे मृतदेह खोलीत आढळून आले होते, तर सुवर्णा या अत्यंत गंभीर आणि बेशुद्धावस्थेत सापडल्या. नाडी सुरू असल्याचे लक्षात येताच त्यांना तातडीने गोमेकॉत दाखल केले होते.

मात्र, उपचार सुरू असतानाच रविवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. सोमवारी सुवर्णा यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात येणार आहे.

Mapusa Crime
Goa Congress: शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात काँग्रेसची 'छात्रों की गुंज' मोहीम; पेपरफुटी, बेरोजगारीविरोधात राज्यात जनजागृती

मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सोनुर्ली येथील रहिवासी असलेले हे जाधव कुटुंब गेल्या वर्षभरापासून करासवाडा येथे भाड्याच्या खोलीत राहात होते. पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अजय यांना मधुमेहाचा त्रास होता. मात्र, तो फारसा गंभीर नव्हता. सुवर्णा आणि अथर्व यांना कोणतीही जुनी वैद्यकीय पार्श्वभूमी किंवा आजारपण नव्हते.

आर्थिक विवंचना किंवा इतर कोणत्या कारणामुळे या कुटुंबाने टोकाचे पाऊल उचलले, की यामागे काही वेगळे कारण आहे, याचा शोध म्हापसा पोलिस घेत आहेत. ही सामूहिक आत्महत्या की आणखी काही, याचे गूढ उकलण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

दोघांवर अंत्यसंस्कार

घटनास्थळी ज्या ठिकाणी हे तिघेही आढळले, त्याजवळच उलट्या झाल्याचे दिसून आले होते. न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेच्या (फॉरेन्सिक) पथकाने घटनास्थळावरून हे सर्व नमुने गोळा केले. या तिघांनीही एखादे विषारी द्रव्य प्राशन केले असावे, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, त्यांनी नेमके काय खाल्ले किंवा प्राशन केले, हे अद्याप रासायनिक अहवालाशिवाय स्पष्ट होऊ शकलेले नाही. मृत बाप-लेकावर अंत्यसंस्कार झाले.

Mapusa Crime
Goa Heavy Rain: काळ आला होता पण वेळ आली नव्हती! धावत्या कारवर कोसळले झाड; आई अन् दोन मुले सुखरूप

प्रभावी विष कोठून मिळाले?

जाधव कुटुंबीयांनी विष प्राशन करून जीवन संपविल्याचा संशय बळावला आहे. मात्र, त्यांनी नेमके कोणते विष प्राशन केले आणि इतके प्रभावी विष त्यांना कुठून मिळाले, याविषयी पोलिसांसमोर सध्या मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या विषाच्या स्रोताचा शोध घेण्यासाठी उद्या, (ता. २९) म्हापसा पोलिस फॉरेन्सिक टीमला (न्यायवैद्यक पथक) पाचारण करणार असून, जाधव यांच्या भाडोत्री घराची आणि परिसराची पुन्हा तपासणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

व्हिसेरा नमुने ठेवले राखून

रविवारी गोमेकॉत अजय आणि अथर्व यांच्या मृतदेहांची उत्तरीय तपासणी करण्यात आली. मात्र, डॉक्टरांनी मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट केलेले नाही. शवविच्छेदन अहवालात दोघांच्या आतड्यांचा रंग बदलल्याचे नमूद केले असून, त्यांचे व्हिसेरा नमुने पुढील रासायनिक चाचणीसाठी राखून ठेवले आहेत. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पोलिसांनी आज दुपारी दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com