

पणजी: म्हापसा येथील बारावीच्या परीक्षा केंद्रावर गणिताच्या विषयात काही विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी शिक्षकानेच मदत केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याविषयी गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे तक्रार करण्यात आली आहे.
गोवा विद्यापीठात एका विद्यार्थिनीला प्राध्यापकानेच प्रश्नपत्रिका सोडविण्यास मदत केल्याचा प्रकार उघडकीस येऊन तो विस्मृतीत जातो न जातो, तोच म्हापशातील हा प्रकार उघडकीस आला आहे. गणित व संख्याशास्त्र या विषयाच्या प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी ही मदत करण्यात आली आणि त्यावेळी त्या शिक्षकाला पर्यवेक्षकानेही अडविले नाही, असे ज्यांनी हा प्रकार अनुभवला, अशा विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
पालकांनी धीर दिल्याने त्यांनी धाडस करून या प्रकाराविषयी मंडळाकडे तक्रार करण्याचे धैर्य दाखविले. त्यांच्या म्हणण्यानुसार, मंडळाचे अध्यक्ष भगिरथ शेटये यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि चौकशीचे आश्वासन दिले आहे. तक्रारीत म्हटले आहे, की परीक्षेदरम्यान नियोजित पर्यवेक्षक कक्षात उपस्थित असतानाही गणित विषयाच्या शिक्षकाने वर्गात प्रवेश केला आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडे जाऊन केवळ बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरे सांगितली.
त्यानंतर त्यांनी काही निवडक विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे बोलावून त्यांच्या उत्तरपत्रिका तपासल्या. तसेच त्यांच्या उत्तरांमध्ये चुका असल्याचे सांगत इतर प्रश्नांसाठी सूत्रे आणि सोडविण्याची पद्धत समजावून सांगितली. ही सर्व घटना सुरू असताना कक्षात उपस्थित असलेल्या पर्यवेक्षकांनी कोणतीही कारवाई केली नाही.
काही विद्यार्थ्यांनी याबाबत शिक्षकाला विचारले असता, त्यांनी इतर प्रश्नांसाठी मदत केल्याचे नाकारले व फक्त बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरे सांगितल्याचे सांगितले. या चर्चेदरम्यान त्यांनी ‘तुम्हाला जे करायचे ते करा, माझ्याविरुद्ध तक्रार करा’ अशा अर्थाचे शब्दही उच्चारले. या घटनांमुळे परीक्षेचे वातावरण अन्यायकारक बनले असून पारदर्शकता, समता आणि मंडळाच्या परीक्षा नियमांचे पालन याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रकरणाची मंडळाने सखोल चौकशी करण्याची गरज आहे.
परीक्षा कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. मात्र, परीक्षेवेळी ते कार्यरत नव्हते. याबाबत मुख्याध्यापिकेला विचारले असता, कॅमेऱ्यांच्या देखभालीसाठी शासनाकडून निधी उपलब्ध न झाल्यामुळे ते बंद असल्याची माहिती देण्यात आली, असेही तक्रारीत नमूद केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.