
आगोंद: काणकोण येथील प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून शुक्रवारी काणकोण भागशिक्षणाधिकारी कार्यालयात तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी काढलेल्या प्रश्नपत्रिकेसंदर्भात निवेदन सादर करून मुख्याध्यापक व शिक्षकांचा सल्ला घेऊन पेपर तयार करावेत व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समजण्याची संधी द्यावी, अशी विनंती केली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नुसार आता परीक्षा घेतल्या जात आहेत. आम्ही एनइपीचे स्वागत करतो, परंतु पालकांना वाटते की, या नवीन धोरणाचा सामना करण्यासाठी, विद्यार्थ्यांना त्यांचे कौशल्य विकसित करण्यासाठी, स्वतःला शोधण्यासाठी काही वेळ दिला पाहिजे.
पालकांच्या असे लक्षात आले आहे की, यावेळी दिलेल्या प्रश्नपत्रिका मुलांच्या विचार क्षमतेच्या पलीकडल्या होत्या. विशेषतः गणिताची प्रश्नपत्रिका, जी मराठी किंवा परिसर अभ्यासाच्या प्रश्नपत्रिके सारखी वाटत होती व ती विद्यार्थ्यांच्या आकलन शक्ती बाहेरची होती. प्रश्नपत्रिकेत वापरलेले शब्द मुलांसाठी खूप कठीण होते.
शिक्षण विभागाने दिलेला नमुना प्रश्नपत्रिका आणि परीक्षेसाठी आलेला पेपर यात खूप फरक होता, ज्यामुळे पालक आणि शिक्षकांच्या मनात गोंधळ निर्माण झाला आहे. शिक्षकांनी नमुना प्रश्नपत्रिकेनुसार अभ्यासक्रम पूर्ण केला होता, पण परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांना मिळालेला पेपर खूप वेगळा होता, त्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिकधक्का बसला आहे, असे निवेदनात नमूद केले आहे.
ही समस्या फक्त काणकोणातच नाही, तर गोव्याच्या इतर भागातही आहे. सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. आम्ही ही समस्या आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो जेणेकरून एससीइआरटी आणि शिक्षण संचालनालय यावर विचार करेल.
पेपर सेट करणाऱ्या टीमने विद्यार्थ्यांच्या पातळीचा विचार करून चुकांची दुरुस्ती करावी. मुख्याध्यापक व शिक्षकांचा सल्ला घेऊन पेपर तयार करावेत आणि विद्यार्थ्यांना एनइपी समजण्याची संधी द्यावी.
प्रियांका नाईक गांवकर, सौरभ गायक, पंकज नाईक गावकर आदी पालक उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.