Mapusa City Problems: म्हापसा शहर समस्यांच्या विळख्यात, वाहतूक कोंडीपासून सांडपाण्यापर्यंत प्रश्नच प्रश्न; पुनरुज्जीवनाची मागणी

Mapusa : उत्तर गोव्याची सांस्कृतिक ओळख, प्रमुख व्यापारी केंद्र आणि बार्देश तालुक्याचा ‘मुकुटमणी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या म्हापसा शहराची गेल्या तीन दशकांत नियोजनशून्य विकासामुळे दुरवस्था झाली आहे.
Mapusa City Problems
Mapusa City ProblemsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

म्हापसा: उत्तर गोव्याची सांस्कृतिक ओळख, प्रमुख व्यापारी केंद्र आणि बार्देश तालुक्याचा ‘मुकुटमणी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या म्हापसा शहराची गेल्या तीन दशकांत नियोजनशून्य विकासामुळे दुरवस्था झाली आहे.

टेकडीभोवती निसर्गाच्या कुशीत वसलेले देखणे आणि शांत शहर अशी ओळख असलेल्या म्हापशाला आज अनियंत्रित काँक्रीटीकरण, वाहतूक कोंडी, उघडी गटारे आणि कचऱ्याच्या समस्यांनी वेढले आहे. मूलभूत सुविधांचा अभाव कायम असताना ‘स्मार्ट सिटी’सारख्या आधुनिक विकासाच्या घोषणा केवळ कागदावरच राहिल्याची नागरिकांची तक्रार आहे.

१९९० च्या दशकानंतर शहरात वेगाने अनियोजित शहरीकरण झाले. खोर्ली टेकडी, एकतानगर तसेच सेंट झेवियर्स कॉलेज परिसरात मोठ्या प्रमाणावर दाट वस्ती वाढली. कुचेली आणि पेडेपासून राष्ट्रीय महामार्ग ६६च्या दिशेने व्यापारी संकुले व बहुमजली इमारती उभ्या राहिल्या; मात्र त्यानुसार रस्ते, पाणीपुरवठा आणि मलनिःसारणाची सुविधा निर्माण झाली नाही.

Mapusa City Problems
Goa Politics: फक्त निवडणुका आल्यावर यात्रा काढून उपयोग नाही! 'भाजप जनतेसोबत' म्हणत दामू नाईकांचा काँग्रेसला सणसणीत टोला

भूमिगत सांडपाणी वाहिनीचे जाळे वेळेत उभारले न गेल्याने अनेक संकुले आजही सोकपिटवर अवलंबून आहेत. पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक निचरा बाधित झाल्याने गांधी चौकासह सखल भागांत पावसाळ्यात पाणी साचते. म्हापसा तार नदीत सांडपाणी मिसळत असल्याने मरड परिसरात दुर्गंधीची समस्या निर्माण झाली आहे.

कचरा व्यवस्थापनाचाही प्रश्न गंभीर आहे. गणेशपुरी येथील वर्गीकरण केंद्र बंद असल्याने कुचेली प्रकल्पावरील भार वाढला आहे. सणासुदीच्या काळात विविध भागांत कचऱ्याचे ढीग साचत असल्याने स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर येतो.

मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच थिवी, कोलवाळ आणि पिळर्ण औद्योगिक वसाहतींमुळे शहरातील वाहतुकीचा ताण वाढला आहे. गांधी चौक, कोर्ट जंक्शन आणि टेकडीकडे जाणाऱ्या मार्गांवर सकाळ-संध्याकाळ वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. मध्यवर्ती बसस्थानक व अलंकार चित्रपटगृह परिसरात सीसीटीव्ही व्यवस्थेचा अभाव आणि इतर समस्यांमुळे सुरक्षिततेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

म्हापशाचा कायापालट करून शहराला प्रगतीपथावर नेण्यासाठी आज एका दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाची नितांत गरज निर्माण झाली आहे. सुमारे १५० कोटी रुपये खर्चाचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प गेली तब्बल १३ वर्षे केवळ कागदावरच रखडला आहे, तर दुसरीकडे शहरातील मूलभूत कचरा व्यवस्थापनाचे अक्षरशः धिंडवडे निघाले असून संपूर्ण यंत्रणा कोलमडली आहे.

- रायन ब्रागांझा, माजी नगराध्यक्ष, म्हापसा पालिका

म्हापशात भाजपचा आमदार आणि पालिकेतही भाजपची सत्ता असूनही म्हापशेकरांच्या हितासाठी कोणतीही मोठी पायाभूत, औद्योगिक, व्यावसायिक, सांस्कृतिक अथवा मनोरंजनाची सुविधा निर्माण करण्यात आलेली नाही. गेल्या ३० वर्षांपासून चालत आलेला हा ‘कट, कॉपी आणि पेस्ट’ जाहीरनामा आता भाजपसोबतच कचऱ्यात फेकून देण्याची वेळ आली आहे.

- ॲड. शशांक नार्वेकर, माजी नगरसेवक.

म्हापशाचा हा बकालपणा नैसर्गिक नसून राजकीय निष्काळजीपणा आणि प्रशासकीय भ्रष्टाचाराचा परिणाम आहे. सांडपाणी वाहिनी, कचरा व्यवस्थापन आणि वाहतूक नियोजन यांसारख्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करून शहर वेठीस धरले गेले आहे. आता म्हापशेकरांनी निष्क्रिय लोकप्रतिनिधींना जाब विचारून आपल्या शहराच्या अस्तित्वासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे.- शितेश मोरे सामाजिक कार्यकर्ते.

Mapusa City Problems
Goa Politics: युतीच्या गोष्टी केवळ वाऱ्यावर, वेणुगोपाल यांच्या बैठकीत 'गोवा राखण यात्रे'वरच चर्चा

कृती आराखडा राबविण्याची नागरिकांची मागणी

दरम्यान, १९६१ मध्ये सुरू झालेली म्हापसा बाजारपेठ आज मोडकळीस आलेल्या इमारती, आगीचा धोका आणि अरुंद गल्ल्यांमुळे अडचणीत आहे. बाजाराच्या आधुनिकीकरणासाठी विविध आराखडे आणि निधीच्या घोषणा झाल्या; मात्र त्यांची अपेक्षित अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे म्हापशाच्या सर्वांगीण पुनरुज्जीवनासाठी ठोस आणि दीर्घकालीन कृती आराखडा राबविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com