Dangerous Building in Goa : मडगाव हे एक मॉडेल शहर बनविणार, असे जाहीर करून आमदार दिगंबर कामत यांनी शहरातील विविध प्रभागांत विकासकामांची सुरुवात करीत लोकांना खुश करण्याचा प्रयत्न चालविला असला तरी विकासकामांच्या नावे मडगावात सुरू केलेल्या प्रकल्पांची आजची स्थिती पाहिल्यास हाच का तो विकास? असे विचारण्याची वेळ आली आहे. देखभाली अभावी मडगाव येथील रवींद्र भवनसह अनेक प्रकल्प सध्या शेवटची घटका मोजत आहेत.
सध्या रवींद्र भवनवर अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष न नेमल्या कारणाने या प्रकल्पाची गत ‘आई बापाविना उघड्यावर पडलेले पोरग्यागत’ झाली आहे. या प्रकल्पात कित्येक ठिकाणी भिंतीला तडे गेले असून गळती होत आहे. या भवनातील ब्लॅक बॉक्स पूर्णपणे खराब झाले असून या कक्षात आता आत ओल येऊ लागल्याने कुणी त्यात तास दीड तास बसले तर आरोग्य धोक्यात, अशी स्थिती बनली आहे.
दिगंबर कामत हे मुख्यमंत्री असताना मडगाव येथे 60 लाख रुपये खर्चून डिजिटल स्टुडिओ स्थापन करण्यात आला होता. मात्र, कामत यांच्याच मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात इफ्फीचे आयोजन करण्यासाठी 11 कोटींचा खर्च करण्यात आला होता. त्यावेळी योग्य निविदा प्रक्रिया न राबविण्याच्या कारणावरून हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले. आणि त्यामुळे या स्टुडिओकडे संपूर्ण दुर्लक्ष झाले आणि आज तो पूर्णतः कुचकामी ठरला आहे. या भवनचे माजी उपाध्यक्ष साईश पाणंदीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकल्प मोडकळीस आला आहे.
जी परिस्थिती रवींद्र भवनची आहे, तशीच अवस्था मडगाव येथे बांधलेल्या अवाढव्य अशा जिल्हाधिकारी कार्यालयाची झाली आहे. दक्षिण गोव्यातील बहुतेक सर्व प्रशासकीय कार्यालये या इमारतीत आहेत. मात्र, या इमारतीतील बहुतेक शााैचालये नादुरुस्त अवस्थेत आहेत. त्यांचे दरवाजे तुटलेले आहेत. या प्रकल्पातील सांडपाणी व्यवस्थाही पुरेशी सक्षम नसल्याने घाण पाणी उघड्यावर पडून लोकांना दुर्गंधींचा त्रास सहन करावी लागत आहे. त्यामुळे डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर होते. याही प्रकल्पाच्या भिंतींना तडे गेले असून येथेही तातडीने दुरुस्तीची गरज आहे.
पालिका उद्यानाला अवकळा
मडगाव येथील पालिका उद्यान हे एकेकाळी मडगाव शहराचे भूषण मानले जायचे. आज या उद्यानाला अक्षरशः अवकळा आली असून तुटलेल्या अवस्थेत असलेले झोपाळे आणि न चालणारे फवारे ही या उद्यानाची ओळख बनली आहे. दिगंबर कामत हेच मुख्यमंत्री असताना या उद्यानाची 60 लाख रुपये खर्चून दुरुस्ती केली होती. येथील कारंजे पुन्हा सुरू करण्यात आल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. पण या करांज्यांतील पाणी मडगावकरांनी कधी पाहिलेच नाही.
हे प्रकल्प कधी अस्तित्वात आलेच नाहीत
1 मडगाव शहरातील पार्किंग समस्या लक्षात घेऊन तीन ठिकाणी बहुमजली पार्किंग प्रकल्प उभारण्याचे ठरविले होते. त्यापैकी जुन्या मासळी मार्केट जागेत जो प्रकल्प उभारायचा होता त्याला सिग्नेचर प्रकल्प निधीतून पैसेही मंजूर झाले होते; पण अजूनही हा प्रकल्प उभा झालेला नाही.
2 कामत मुख्यमंत्री असताना रवींद्र भवनच्या बाजूला असलेल्या जागेत सोलर एनर्जी पार्क उभे राहणार होते. याही प्रकल्पाचे पुढे काय झाले हे कळण्यास मार्ग नाही.
3 कामत मुख्यमंत्री असताना मडगाव शहरात कसले प्रकल्प राबविता येतात हे ठरविण्यासाठी तज्ज्ञांची प्रोजेक्ट आयडेंटीफिकेशन समिती नेमली होती. या समितीने कित्येक ठिकाणी फ्लायओव्हर्स बांधण्याची शिफारस केली होती. मात्र, हेही फ्लायओव्हर्स कधी उभे झाले नाहीत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.