पणजी: लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योग (MSME) निर्यात योजना व आत्मनिर्भर भारत उपक्रमात सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात परकीय गंगाजळीची बचत करण्यात व सर्वसमावेशक विकासात देशासाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात, असे मत आसोचाम या देशातील मुख्य उद्योग संघटनेच्या राष्ट्रीय एमएसएमई मंडळाचे चेअरमन मांगिरीश पै रायकर यांनी मांडले. (Mangirish Pai Raikar said that MSMEs have an important role to play in the self-reliant India initiative)
जागतिक एमएसएमई दिनानिमित्त उद्योजकांनी एकत्र येऊन ऑनलाईन आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. गोमंतकीय एमएसएमई व स्टार्ट अप वातावरण या विषयांवर हा कार्यक्रम केंद्रीत होता. कार्यक्रमात गोवा चेंबर ऑफ काॅमर्सचे (GCCI) अध्यक्ष राल्फ डिसोझा प्रमुख पाहुणे म्हणून तर माहिती-तंत्रज्ञान संचालक अंकिता आनंद सन्माननीय पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. एमएसएमईबाबत सकारात्मक स्थिती असल्याचे रायकर यांनी पुढे सांगितले. वस्तू व सेवांच्या उत्पादन क्षेत्रात प्रवेश करण्याची प्रचंड क्षमता एमएसएमईमध्ये आहे. अल्प वेळेच्या मर्यादेत व किमान खर्चात एमएसएमई व्यवसायात उतरू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सर्वसमावेशक विकासात एमएसएमई महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे डिसोझा यांनी सांगितले. एमएसएमई उद्योग क्षेत्राला प्रेरणा व कल्पकता देत असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. नीती आयोगाच्या शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये गोवा राज्याने सकारात्मक प्रगती दाखवलेली आहे. 2021 मध्ये अखिल भारतीय निर्देशांकांत गोव्याने सातव्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे, अशी माहिती डिसोझा यांनी दिली.राज्यातील पाच अग्रणी स्टार्ट ॲपचे संस्थापक व संचालक या कार्यक्रमात उपस्थित होते.
गोव्यात स्टार्ट अपसाठी प्रचंड वाव आहे, असे आनंद यांनी सांगितले. स्टार्ट अप योजनेखाली आतापर्यंत 1 कोटींचा निधी नवउद्योजकांना देण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
महिलांमध्ये स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची क्षमता व एमएसएमई योजना, आर्थिक साक्षरता याबाबत जाणीव निर्माण होण्याची गरज जीसीसीआयच्या महिला विभागाच्या सहअध्यक्ष पूनम सिरसाट यांनी व्यक्त केली.
बॅंक ऑफ बडोदाचे प्रमुख क्षेत्रीय अधिकारी दीपक कुमार सिंग यांनी भारतीय रिझर्व्ह बॅंकेने जाहीर केलेल्या एमएसएमईना दिलासादायक उपाययोजनांची माहिती दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.