Goa Politics: खरी कुजबुज; खंवटे दामूंच्या कानात काय कुजबुजले?

Khari Kujbuj Political Satire: काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे हे केवळ पदे अडवून बसलेल्या नेत्यांवर जाम भडकलेले दिसतात. त्यांनी कोणाची नावे घेतली नाहीत.
Goa Political Updates
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

खंवटे दामूंच्या कानात काय कुजबुजले?

गोव्यात नुकत्याच पार पडलेल्या आध्यात्मिक महोत्सवाच्या रंगात मांडवी नदीत गंगा आरती झाली, संत महात्म्यांची प्रवचने झाली, आणि हो, राजकीय कुजबुजीचे ''दिव्य''ही लागले. महोत्सवात पर्यटन मंत्री रोहन खंवटे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या गप्पांनी उपस्थितांचे कान टवकारले. रोहन खंवटे यांनी दामू नाईकांच्या कानात काहीतरी कुजबूजल्याचे दृश्य बघून, राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. काहींच्या मते, खंवटेसाहेबांनी मिश्किलपणे दामू नाईकांना म्हटले असेल की, आता हिंदू मतदार मते घालतील म्हणजे ही आमची आध्यात्मिक खेळी यशस्वी झाली! राजकीय चर्चांमध्ये आता याचेच कुतूहल आहे की, हा आध्यात्मिक महोत्सव फक्त अध्यात्मापुरता होता की त्यामागे झेडपीसाठी ‘मतां’ची जुळणी करण्याचाही काही अजेंडा होता? ∙∙∙

ठाकरेंचा सल्ला नेमका कोणाला?

काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे हे केवळ पदे अडवून बसलेल्या नेत्यांवर जाम भडकलेले दिसतात. त्यांनी कोणाची नावे घेतली नाहीत पण ते कोणावर घसरलेत त्याची चर्चा प्रदेश काँग्रेसमध्ये सुरू झालीय. पक्षाच्या गट समित्यांची-अध्यक्षांची हल्लीच नियुक्ती झाली आहे पण ती केवळ तोंडी आहे, कोणालाच अधिकृत नेमणूकपत्र दिले नाही, असे पत्र नसताना काम कसे करावयाचे, अशी पृच्छा अनेकांनी ठाकरेंकडे केली व त्यामुळे ठाकरेंनी पक्षासाठी काम करावयाचे नसेल तर खुर्च्या सोडा, असा इशारा म्हणे दिला. त्यातून म्हणे त्यांना संघटनेची पुनर्बांधणीची गरज पटली आहे. विधानसभा निवडणूक होऊन आता अडीच वर्षे उलटली या काळांत पक्षबांधणीचे कार्य कुठेच दिसत नाही. तुमचे कार्य जनतेला दिसण्याची गरज असल्याचेही म्हणे त्यांनी स्थानिक नेतृत्वाला खडसावले आहे. ∙∙∙

आध्यात्मिक महोत्सवाला ‘कमळाचा’ सुगंध?

गोव्यात नुकत्याच पार पडलेल्या आध्यात्मिक महोत्सवाने मांडवी नदीच्या तीरावर गंगा आरतीचे दिवे तर लावलेच, पण राजकीय चर्चांचेही दिवे पेटवलेत. पर्यटन मंत्रालयाचे सहकार्य महोत्सवाला आहे हे सर्वांनाच माहीत आहे, पण इथे तर बोट चक्क ‘कमळाच्या तळ्यात’ तरंगताना दिसली असे लोकच बोलतात. गोव्यात आध्यात्मिक पर्यटन वाढावे म्हणून महोत्सव झाला का, की ‘हिंदू मतदार’ वाढावेत म्हणून? गोव्यातील राजकीय वर्तुळात आता एक चर्चा सुरू झाली आहे. काहीजण म्हणत आहेत, आध्यात्मिक की भाजपचा ‘महोत्सव’? बोटीतून भक्तीच्या लाटांपेक्षा म्हणे राजकीय ''वेव्ह''च जास्त आल्या होत्या. मतांचे राजकारण यामागे लपलेले नाही ना! ∙∙∙

लोबोंचे म्हणणे

म्हादई नदीचे पाणी कर्नाटकाला वळवू न देण्यात गोवा सरकारला यश येईल, असा आशावाद आमदार मायकल लोबो यांनी व्यक्त केला आहे. यापूर्वी म्हादई खोऱ्‍याची कर्नाटकात पाहणी केल्यानंतर विधानसभेत लोबो यांनी व्यक्त केलेल्या भावना अजूनही अनेकांच्या स्मरणात आहेत. या विषयावर पोटतिडकीने बोलणाऱ्या नेत्यांत त्यांची गणना होते. आताही त्यांनी कर्नाटकाने म्हादईवरील कळसा भांडुरा प्रकल्पासाठी कंत्राटदार नेमल्याची घोषणा केल्यानंतर लोबो यांचे म्हादई प्रेम उफाळून आले आहे. त्यांनी हा प्रश्न केवळ सरकारचाच नव्हे तर तमाम जनतेचाही आहे अशी आठवण करून दिली आहे. मध्यंतरी या विषयावर लोकलढा निर्माण करण्याची घोषणा करणाऱ्यांनी हे ऐकले असेल का? ∙∙∙

पालेकर खूष होतील का?

गोव्‍यात काँग्रेस आणि ‘आप’ युती भाजपसाठी डोकेदुखी ठरली होतीच; शिवाय ती कायम राहावी, अशी सर्वाधिक अपेक्षा ‘आप’चे नेते अमित पालेकर यांना होती. पालेकर २०२७च्‍या विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून काँग्रेसशी घरोबा राखून होते. लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्‍यात काँग्रेसचे उमेदवार कॅप्‍टन विरियातो यांच्‍यासाठीही काँग्रेस नेत्‍यांपेक्षा ‘आप’ने अधिक ताकद लावली होती. बाणावलीत काँग्रेसच्‍या स्‍थानिक नेत्‍यांनी ‘आप’ला दर्पोक्‍ती दिली तरी, युतीत मिठाचा खडा पडणार नाही, याची दक्षता पालेकर घेत होते. पालेकरांना जे सांताक्रूझ मतदारसंघातून निवडणूक लढवतात, तेथे काँग्रेसच्‍या साथीनेच विजय शक्‍य होता. आता वरिष्‍ठ नेत्‍या आतिषी यांनी ‘एकला चलो रे’ची घोषणा केली आहे. त्‍यामुळे पालेकर मनातून नक्‍कीच नाराज होतील; तर काही काँग्रेसचे नेते सुखावतील. पण तोटा दोन्‍ही पक्षांचा दिसतो. स्‍थित्‍यंतरातून फायदा दिसतो तो भाजपचा. कारण एकीचे बळ संपुष्‍टात आलेय, नाही का?∙∙∙

तानावडे-सूद भेट

राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे यांनी भाजपचे राज्य प्रभारी आशिष सूद यांची सोमवारी भेट घेतली. सूद हे आता दिल्ली सरकारमधील तिसऱ्या क्रमांकाचे गृह, ऊर्जा, नगरविकास, शिक्षण खात्याचे मंत्री आहेत. तानावडे हे प्रदेशाध्यक्ष असताना सूद हे प्रभारी होते, ते आजही आहेत. त्यामुळे तानावडे यांच्याशी त्यांचा स्नेह असणे साहजिक आहे. तरीही मुद्दामहून सूद हे मंत्री झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करण्यासाठी तानावडे यांनी त्यांची भेट घेणे चर्चेचे ठरले आहे. तानावडे राष्ट्रीय पातळीवर आपली प्रतिमा बनवत चालले आहेत. बंगळूर येथे भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठीही ते गेले होते. ∙∙∙

Goa Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; विरियातोंचा एल्गार, रेजिनाल्डला आव्हान

पाणी समस्येचं आव्हान

पाण्याची समस्या राज्यासमोरील मोठे आव्हान असणार आहे, हे पर्यावरणतज्ज्ञ सांगत आहेत. दुसरीकडे राज्याला पाणी पुरवठा यंत्रणेत राज्य स्वयंपूर्ण करण्यासाठी ठिकठिकाणी बंधारे उभारले जाताहेत, ही चांगली बाब आहे. परंतु राज्यात देशातील विविध राज्यांतील मोठमोठ्या बिल्डर लॉबीचे आगमन झालेले आहे. त्यांच्याकडून मोठमोठी गृहप्रकल्पांची निर्मिती होऊ लागली आहे. कोणाचे गृहप्रकल्प एक हजार, तर कोणाचे दोनशे-चारशे फ्लॅटचे प्रकल्प उभारले जाताहेत. त्यांच्यासाठी लागणाऱ्या पाण्याची सोय सध्याच्या उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यातूनच केली जाणार आहे. शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो या सध्या त्यांच्या मतदारसंघात होत असलेल्या इमारतींविरोधात आवाज उठवला आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांनाच त्याविषयी साद घातली आहे. या बिल्डरांकडून कूपनलिकांच्या माध्यमातून त्याचबरोबर सार्वजनिक नळपुरठ्याच्या माध्यमातून पाणी उपसा होणार आहे. त्यामुळे त्यांना लागणारे पाणी पाहता इतर ठिकाणी त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे गृहनिर्माण प्रकल्पांना मंजुरी दिली जाऊ नये, असे दिलायला यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता तरी ग्रामस्थांनी येऊ घातलेल्या प्रकल्पांबाबत जागृत होणे आवश्यक आहे, असेच यातून स्पष्ट होते. ∙∙∙

Goa Political Updates
Goa Politics: आता गोव्यातही ‘आप’चे ‘एकला चलो रे’! निवडणुकांत स्वबळावर उतरणार; माजी मुख्यमंत्री आतिषी यांची घोषणा

सगळा भार देवावर!

दिगंबर कामत यांना त्‍यांच्‍या वाढदिनी मंत्रिपदाचे ‘बर्थ डे गिफ्‍ट’ मिळणार अशी अटकळ त्‍यांच्‍या सर्व कार्यकर्त्यांची होती, मात्र ती खरी झाली नाही. मात्र त्‍यामुळे या बाबांचे कार्यकर्ते जरी नाखूष असले तरी स्‍वत: बाबांना त्‍याचा काहीही फरक पडलेला नाही, असे त्‍यांनी आपल्‍या वाढदिवसाच्‍या निमित्ताने आयोजित केलेल्‍या कार्यक्रमात जाहीर केले. देव नागेश व दामबाब यांच्‍यावर आपला सर्व भार असून त्‍यांच्‍या मनात असेल तर आपल्‍याला कोणतेही पद मिळू शकते, असे त्‍यांनी त्‍यावेळी जाहीर केले. १ एप्रिलपासून आपण मडगावात नेटाने काम करणार, असेही त्‍यांनी यावेळी जाहीर केले. बाबांना म्‍हणे, मडगावची नगरपालिका गोव्‍यातली आदर्श नगरपालिका करायला पाहिजे. मात्र त्‍यासाठी त्‍यांना नगरसेवकांनी पाठिंबा देण्‍याची गरज आहे. बाबांची ही घाेषणा सुफळ होईल की, तिचा एप्रिलफूल होईल हे एप्रिलनंतर कळणार आहेच म्‍हणा. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com