पणजी: वन खात्यातर्फे दोनापावला येथील गोवा (Goa) इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित पाचव्या गोवा पक्षी महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी ‘मलबार ट्री निम्फ’ (Malabar Tree Nymph) हे राज्य फुलपाखरू म्हणून जाहीर केले.
सह्याद्री पर्वत रांग अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. जैवविविधतेच्या दृष्टीने तर या भूभागाला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने इथल्या अनेक ठिकाणांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे. प्राणी, पक्षी, फुलपाखरू, झाडे - वेली, सरपटणारे प्राणी यांच्या हजारो जाती - प्रजाती या भागात आढळतात. या सर्वांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी जैवविविधतेत वेगळेपण असणाऱ्या जिवांना त्या त्या राज्यामार्फत विशेष दर्जा देऊन मानांकित केले जाते.
यापूर्वी राज्याचा राज्य पक्षी (Bird) म्हणून रुबी थ्रोटेड बुलबुल, राज्य प्राणी म्हणून गवा, तर राज्य वनस्पती म्हणून माठ्ठीला मान्यता देण्यात आली आहे. राज्य फुलपाखरू जाहीर करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची मदत घेतली होती. या समितीने दिलेल्या सूचनेनुसार राज्यातील 5 फुलपाखरांना (Butterflies) नामांकन मिळाले होते.
हे पश्चिम घाटातील प्रदेशनिष्ठ (इंडेमिक) फुलपाखरू असून साधारणपणे एक हजार फुटाच्यावर डोंगर रंगांमध्ये दिसते. पांढऱ्या पंखांवर काळे ठिपके आणि रेषांच्या सुंदर मांडणीमुळे वनराईत ते नजरेत भरते. डोंगर वाटा आणि ओढ्याच्या काठांवर त्यांचे गुंजी घालणे सर्वांना आकर्षित करते. आता याला राज्य फुलपाखराचा दर्जा मिळाला आहे.
- पराग रांगणेकर, फुलपाखरू अभ्यासक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.