बहुसंख्य सदस्यांची प्रमोद सावंत यांनाच पसंती

असंतोष मावळला: राणेंना महत्त्वाच्या खात्याची शक्यता
 Pramod Sawant
Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांनी विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदासाठी डॉ. प्रमोद सावंत यांना पसंती दर्शविली आहे. पक्षाच्या अंतर्गत भेटीगाठीतून पुढे आलेला हा निष्कर्ष आहे. नवी दिल्लीमध्ये हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी या पदासाठी स्वतःचे नाव पुढे दामटले होते. दुसरीकडे गोव्यात विश्वजीत राणे अजूनही मुख्यमंत्री पदासाठी उत्सुक आहेत. परंतु सर्वांच्या पसंतीने येत्या 20 किंवा 21 मार्चला विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीत प्रमोद सावंत यांची निवड मुख्यमंत्रिपदी होईल, हे आता निश्चित झाले आहे.

होळी उत्सवानंतर गोव्यात नेतेपद निवडीची प्रक्रिया रितसर सुरू होईल, असे संकेत दिल्लीहून पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत. दिल्ली भेटीनंतर आत्मविश्वास वाढलेले मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या निवडीचे आता केवळ सोपस्कार बाकी राहिले आहेत. यापूर्वी मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर नेता निवडीचे जे राजकारण घडले, तशीच काहीशी परिस्थिती

 Pramod Sawant
Canacona Murder Case : अंकीताच्या अपघाती मृत्यूची पोलिसांकडून चौकशी सुरू

सध्या पुन्हा निर्माण झाली आहे. त्यावेळीही केवळ तीन सदस्यांनी विश्वजीत राणे यांना नेतेपदासाठी पाठिंबा दिला होता. त्यात ते स्वतः, मायकल लोबो आणि ग्लेन टिकलो यांचा समावेश होता. लोबो आणि टिकलो यांनी सावंत यांच्याबरोबरच राणे हेसुद्धा नेतेपदी आपल्याला चालू शकतात, असा निर्वाळा दिला होता. या पार्श्वभूमीवर 2022 चा नवा नेता निवडण्याची प्रक्रियाही सुरू झाली असून, सावंत यांच्या बाजूने बहुसंख्य सदस्य उभे राहिले आहेत. उलट ज्या पद्धतीने गतसरकारमध्ये नोकऱ्या वाटल्या, त्याबद्दल सत्ताधाऱ्यांमधीलच बहुसंख्य सदस्य नाराज असून, यापुढे मंत्र्यांकडे हा विषय न ठेवता राज्य लोकसेवा आयोगामार्फत सरकारी नोकर भरती करण्यात यावी, असा त्यांचा आग्रह आहे.

विश्वजीत राणे यांनी बहुसंख्य नोकऱ्या सत्तरीतील आपल्या मर्जीतील लोकांना वाटल्या असल्याचाही त्यांच्यामध्ये राग आहे. होळीनंतर राजकीय घडामोडींना वेग येणे स्वाभाविक असून, 20 किंवा 21 मार्च रोजी भाजपचे निरीक्षक गोव्यात दाखल होऊन त्याच काळात विधिमंडळ नेत्याची निवड होणे अपेक्षित आहे.

मुख्यमंत्र्यांसाठी ‘टर्निंग पॉईंट’

‘इंडिया टुडे’ व इतर काही वृत्तवाहिन्यांच्या ‘एक्झिट पोल’मध्ये मुख्यमंत्री पदासाठी डॉ. प्रमोद सावंत यांना केवळ 20 टक्केच पसंती आहे, असा निष्कर्ष काढण्यात आला होता. त्यामुळे पक्षश्रेष्ठी नवीन नेत्याच्या शोधात आहेत काय? अशी शक्यता निर्माण झाली होती. परंतु सावंत यांच्या नशिबाने ते साखळीमध्ये जिंकून आले. निवडणूकपूर्व बहुसंख्य सर्वेक्षणांमध्ये भाजपला केवळ 14 ते 16 जागा मिळू शकतात, असा निष्कर्ष आला असतानाही पक्षाने ३३ टक्के मते मिळूनही तब्बल 20 जागा पटकावत राज्यातील सर्वांत मोठा पक्ष बनण्याची किमया केली. त्यामुळे प्रमोद सावंत यांचे राज्यातील राजकीय वजन वाढले आहे.

विलंबाबद्दल विरोधकांची संतप्त प्रतिक्रिया

निवडणुकांचा निकाल जाहीर होऊन आठ दिवस उलटले असले तरी सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू न झाल्याने राजकीय असंतोष आकार घेऊ लागला आहे. कॉंग्रेस पक्षानेही त्यासंदर्भात तिखट प्रतिक्रिया व्यक्त करताना सरकार स्थापनेचा दावा करू शकतो, अशी स्पष्टोक्ती दिली आहे. दुसऱ्या बाजूला शपथविधी सोहळा शानदार पद्धतीने करण्याचा मानस भाजप नेतृत्वाने व्यक्त केला आहे.

 Pramod Sawant
धनगर समाजातील मुलींनी सांस्कृतिक परंपरेचा वारसा पुढे चालवावा

चार दिवसांत भाजपचे सरकार

भाजप येत्या चार दिवसांत प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करणार आहे. काँग्रेस पक्ष सरकार स्थापनेच्या मुद्द्यावरून लोकांना भडकावत असून आम्ही त्यांचा निषेध करतो, अशी प्रतिक्रिया भाजप प्रवक्ते सुभाष फळदेसाई यांनी व्यक्त केली. भाजपने चार राज्यांमध्ये ऐतिहासिक विजय प्राप्त केला आहे. सध्या होळीचे दिवस आहेत. त्यामुळे थोडा उशीर होत असला तरी स्थिर, भ्रष्टाचारमुक्त सरकार येत्या चार दिवसांमध्ये स्थापन करण्यात येईल, अशी ग्वाही फळदेसाई यांनी दिली.

आर्लेकरांची महत्त्वाकांक्षा फोल

दिल्लीत गोव्याचे भाजप नेते दाखल होण्याच्या काळातच हिमाचलचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर तेथे दाखल झाले आणि त्यांनी पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. परंतु तो विषय आता मागे पडला आहे. माजी मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या निधनानंतर आर्लेकर यांना मुख्यमंत्री म्हणून निवडले जाण्याची शक्यता होती. परंतु ती शक्यता मागे पडल्यानंतर आता त्यांचा विचार होणे कठीण असल्याची माहिती मिळाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com