Mahadayi Water Dispute: ‘म्‍हादई’ तरी सारखे म्‍हणा!

विधानसभा अधिवेशनात म्‍हादई विषयावर चर्चा घडून आली आणि चाळीसही आमदारांचा कस लागला.
Mahadayi Water Dispute
Mahadayi Water DisputeDainik Gomantak

Mahadayi Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या विषयावर सध्‍या राज्‍यात वातावरण तापले आहे. सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्‍याने काही पर्यावरणप्रेमी संस्‍था, समाजधुरीणांनी लढा हाती घेतला आहे. विरोधी पक्षांचा त्‍यांना पाठिंबा लाभत आहे.

कर्नाटकने आगळीक केल्‍याने सध्‍या ‘म्‍हादई’ हा शब्‍द आज परवलीचा बनला असून प्रत्‍येकाच्‍या मुखी दिसून येत आहे. परंतु, हा प्रश्‍‍न नेमका काय आहे, हे किती जणांना ठाऊक आहे, हा संशोधनाचाच विषय ठरेल.

परंतु, गुरूवारी विधानसभा अधिवेशनात याच विषयावर चर्चा घडून आली आणि चाळीसही आमदारांचा कस लागला. ‘डीपीआर’ मागे घेण्‍यास भाग पाडण्‍यापेक्षा सरकारला जलप्राधिकरण स्‍थापण्‍यात रस अधिक असताना सत्ताधारी आमदार दाजी साळकर यांनी ‘डीपीआर’वर चांगलाच भर दिला. अनेक आमदारांनी तेच तेच मुद्दे पुन्‍हा चघळले.यांच्‍याकडे सखोल माहिती नव्‍हती.

अपक्ष आमदार चंद्रकांत शेट्ये हे तर ‘म्‍हादवी’, असा उल्‍लेख करत होते. इतर काहींनीही असे भलतेच संबोधन केले. हे पाहून मुख्‍यमंत्री नक्‍कीच चक्रावले असतील; पण समाज माध्‍यमांवरूनही लोकांनी खिल्‍ली उडवली. आमदारांनी सखोल माहिती सोडा, किमान ‘म्‍हादई’ तरी सारखे म्‍हणावे!

Mahadayi Water Dispute
Mahadayi River: म्हादईप्रश्‍नी न्यायालयीन लढा बळकट करण्यावर भर -राजेंद्र केरकर

`डीपीआर` झाला सर्वपरिचित

एकेक शब्दाचे नशीब, असे असते, की तो सर्वतोमुखी होतो, तर काही शब्द रोज तोंडात येतात, पण तरीही परिचित होत नाहीत. सध्या गोव्यात जे म्हादईवरुन वादळ घोंगावत आहे. त्यामुळे ''डीपीआर'' हा शब्द असाच अल्पावधीत आबालवृद्धांच्या तोंडात बसला आहे.

खरे तर हा तांत्रिक शब्द असून त्याचा अर्थ तपशीलवार प्रकल्प अहवाल असा आहे. रोज तो उच्चारणाऱ्या किती जणांना त्याचा अर्थ माहीत आहे, हे त्यांनाच माहीत. एवढेच नव्हे, तर जलस्रोत खात्यांतील कित्येकजणही त्या अर्थाबद्दल अंधारात असणे जास्त शक्य आहे. अन्यथा हे इतके रामायण घडलेच नसते, असे बोलले जाते.

आणखी वर्षभर मागे जा ना!

म्हादईबाबत राजकारण नको, असे प्रत्येकजण दुसऱ्याला सांगतो. पण त्यांचे हे वक्तव्य ''पाद्रीले शर्मांव व्हनयेक न्हय'' असे असते. एकेकाळी म्हणजे 2017 मधील निवडणुकीनंतर मंत्रिमंडळात असलेले पण आता परस्परांविरुद्ध ठाकलेले नेते आता 2019चा हवाला देऊन सवाल करतात, पण 2017 मध्ये मंत्रिपदी असताना आपण काय केले?

त्याकडे कानाडोळा करतात. त्यामुळे खरे तर त्यांच्यावर कसा विश्वास ठेवायचा असे म्हादईप्रेमीना वाटणे साहजिक आहे. कारण सत्तेत असताना समर्थन आणि सत्तेबाहेर असताना विरोध, असहकार्य असते. हे असेच चालले तर एकत्र कधी येणार, असा सवाल जनता करीत आहे.

Mahadayi Water Dispute
Political Reservation: ‘गाकुवे’ ने घेतली आरक्षणासाठी राज्यपालांची भेट

...सत्ताधाऱ्यांची पसंती!

म्हापसा पालिकेत फेरबदल झाल्यानंतर आता नवीन नगराध्यक्षा कोण असेल? यावरून उत्सुकता व गोळाबेरीज केली जात आहे. सध्या या पदासाठी दोन नावे चर्चेत आहेत. यात प्रामुख्याने नगरसेविका प्रिया मिशाळ यांचे नाव आघाडीवर आहे.

मिशाळ या कमी बोलणाऱ्या असल्या तरी विकासकामात त्या चांगल्या आहेत, असे त्यांचे जवळचे कार्यकर्ते व सत्ताधारी नगरसेवक दावा करतात. मात्र काहीजण त्यांच्याविरोधात उगाचच अपप्रचार पसरवताहेत, असेही त्यांचे म्हणणे! दुसऱ्या बाजूने नवीन नगराध्यक्षपदी मिशाळ यांच्या नावास बहुतांश सत्ताधाऱ्यांची पसंती व पाठिंबा असल्याचे समजते.

यातील काही नगरसेवकांनी पक्षाच्या वरिष्ठांकडे तसे बोलूनही दाखविल्याचे समजते! आता सत्ताधाऱ्यांची बैठक झाल्यानंतर प्रिया मिशाळ यांच्या गळ्यात खरोखर नगराध्यक्षपदाची ही माळ पडते की इतर कुणाच्या? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईलच.

Mahadayi Water Dispute
Goa Drugs Case: अडीच लाखांचे हशिश तेल विदेशीकडून जप्त

‘त्या’ पुलाच्या कठड्याचे काम सुरू!

‘देर आए दुरुस्त आए’ असे हिंदीत एक बोध वाक्य आहे. कुंकळ्ळी उसकीणी बांद पुलाच्या तुटलेल्या कठड्याचे काम अखेर सुरू झाले. या पुलाची स्थिती जर्जर झाल्याचे उघड झाल्यावर लगेच काम सुरू करण्यात आले.

आमदार युरी यांनी वेळात वेळ काढून पुलाच्या कामाचा आढावा घेतला. मात्र केवळ साडे तीन लाखात हे काम पूर्ण कसे होणार व जर्जर झालेला पूल कसा दुरुस्त होणार? हे सरकारने व युरी यांनी एकदा स्पष्ट केल्यास बरे होईल, असे कुंकळ्ळीकार म्हणतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com