Madkai Locals Gather At Mardol Police Station: मडकईतील विद्यार्थिनीच्या विनयभंगप्रकरणी पोलिसांनी वेळकाढू धोरण न अवलंबता दोषी शारीरिक शिक्षकावर त्वरित कारवाई करावी, कुणाच्याही दबावाखाली येऊ नये, अशी मागणी करत पोलिसांनी दिरंगाई केल्यास आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा मडकईतील ग्रामस्थांनी दिला.
मडकई येथील ग्रामस्थांनी आज (रविवारी) म्हार्दोळ पोलिस स्थानकात येऊन पोलिस निरीक्षक मोहन गावडे यांच्याशी चर्चा केली.
संशयितांनी जामिनासाठी न्यायालयात धाव घेतल्याने न्यायालयाच्या निर्णयानुसार पुढील कारवाई केली जाईल, अशी ग्वाही गावडे यांनी दिली.
मडकईतील एका विद्यालयातील विद्यार्थिनीच्या विनयभंगप्रकरणी म्हार्दोळ पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार म्हार्दोळ पोलिसांनी या शिक्षकाविरुद्ध गुन्हाही नोंदवला आहे.
पण कारवाईला विलंब होत असल्याने संतप्त झालेल्या मडकईवासीयांनी सकाळी म्हार्दोळ पोलिस स्थानकात येऊन संताप व्यक्त केला व दोषी शिक्षकावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली.
जामीन अर्जावर सुनावणी
याप्रकरणी शारीरिक शिक्षक, अन्य एक शिक्षिका तसेच मुख्याध्यापकाने जामिनासाठी पणजीतील बाल न्यायालयात अर्ज दाखल केला असून त्यावर मंगळवारी (५ सप्टेंबर) सुनावणी होणार आहे.
जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत ग्रामस्थ स्वस्थ बसणार नाहीत. प्रसंगी रस्त्यावरही उतरू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
...अन्यथा रस्त्यावर उतरणार
"मडकईतील ग्रामस्थांच्या भावनांशी खेळण्याचा हा प्रकार सुरू असून पोलिसांनी संबंधित दोषी शिक्षकावर त्वरित कारवाई करायला हवी. या प्रकरणात चालढकल झाल्यास ग्रामस्थ रस्त्यावर उतरतील."
राजेश नाईक, ग्रामस्थ, मडकई.
"मडकईतील एका विद्यार्थिनीचा विनयभंग करणे आणि याबाबत पोलिसांकडून कारवाईला दिरंगाई होणे, ही अक्षम्य अशी बाब असून पोलिसांनी दबावाखाली न येता चौकशी करून दोषी शिक्षकाला गजाआड करावे."
कृष्णा नाईक, ग्रामस्थ, मडकई.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.