
फोंडा: मडकईतील बार आम्रेखाजन शेतीत खारे पाणी भरल्यामुळे उभ्या पिकाची नासाडी झाल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेल्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत. या शेतीचा बांध गेल्या शुक्रवारी रात्रीच्या सुमारास फुटल्यामुळे नदीचे खारे पाणी शेतीत घुसल्यामुळे ही मोठी नुकसानी झाली आहे. मात्र, नुकसानीचा आकडा स्पष्ट होऊ शकला नाही.
मडकई भागातील बार आम्रेखाजन शेतीतील बांध दोन ठिकाणी फुटला आहे. अचानकपणे बांध फुटल्यामुळे नदीचे खारे पाणी शेतीत भरले. या शेतीत मिरची, कांदा, तांबडी भाजी, मुळा, मिरची तसेच इतर भाज्यांची लागवड करण्यात आली होती.
खारे पाणी शेतीत भरल्यामुळे या भाजीपाल्याची अतोनात नुकसानी झाली आहे. काही जुजबी भाजी काढायला मिळाली असली तरी मोठ्या प्रमाणात भाजी खारट पाण्यात गेल्याने आता ही भाजीही काढणे मुश्किलीचे ठरले आहे.
एवढे दिवस मशागत करून आता विकण्यासाठी तयार झालेली भाजी अचानकपणे हातची निसटल्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत. सुमारे पस्तीस ते चाळीस शेतकऱ्यांची उपजीविका या शेतीवर चालते. या शेतीत भाजीपाला लागवड करून हे शेतकरी उदरनिर्वाह करतात. मात्र दोन दिवसांपूर्वी अचानक आलेल्या अस्मानी संकटामुळे हातातोंडाशी आलेला घास अचानकपणे हिरावून घेतल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
आम्रेखाजन येथील शेतीत सुमारे वीस ते पंचवीस लाख चौ.मी.क्षेत्रात पसरली आहे. या शेतीत पारंपरिकरित्या भाजीपाल्याची लागवड गेली अनेक वर्षे केली जाते. पण या शेतीत नदीचे खारे पाणी घुसून उभ्या पिकाची नासाडी होण्याचा कायम धोका असतो.
आताही खारे पाणी आत घुसल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी हानी झाली आहे. समितीने आपल्यापरीने सहकार्यासाठी कार्यवाही केली असली तरी शेतकऱ्यांचे झालेले नुकसान मोठे आहे, असे येथील शेतकऱ्यांनी सांगितले. सध्या तरी मेहनतही गेली आणि पीकही गेले, अशा विमनस्क स्थितीत येथील शेतकरी आहेत.
आम्रेखाजन याच शेतीत भातपीक घेतले जाते. पण आता खारे पाणी शेतीत घुसल्यामुळे हे भातपीक घेणेही मुश्किलीचे ठरले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. खारे पाणी शेतीत घुसल्यामुळे जमिनीत क्षार तर वाढले आहेच, पण पाण्यामुळे शेती कसणेही मुश्किलीचे ठरले आहे. त्यामुळे भाजीपाला तर गेलाच पण आता शेतीही कसणे मुश्किलीचे झाल्याने आता दाद मागायची कुणाकडे, असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.