

पणजी: देशाच्या पर्यटन नकाशावर ‘भारताचे हृदय’ म्हणून ओळखला जाणारा मध्यप्रदेश आता नव्या उंचीवर पोहोचला आहे. २०२५ मधील आकडेवारीनुसार, देशांतर्गत पर्यटकांच्या बाबतीत मध्यप्रदेशने गोवा आणि हिमाचलप्रदेशसारख्या पारंपरिक पर्यटनस्थळांना मोठ्या फरकाने मागे टाकले आहे.
धार्मिक पर्यटन, ऐतिहासिक वारसा, वन्यजीव अभयारण्ये आणि परवडणारा प्रवास यामुळे मध्यप्रदेश देशातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या पर्यटन राज्यांपैकी एक ठरला आहे. राज्यसभेत केंद्रीय पर्यटनमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी सादर केलेल्या आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये मध्यप्रदेशात तब्बल १३ कोटी ९५ लाख ९६ हजार ४९ देशांतर्गत पर्यटक दाखल झाले. तसेच १ लाख ८१ हजार ७४३ परदेशी पर्यटकांनी राज्याला भेट दिली.
याचा अर्थ दररोज सरासरी ३ लाख ८२ हजार ४५५ देशांतर्गत आणि जवळपास ४९८ परदेशी पर्यटक मध्यप्रदेशात पोहोचत होते. या कामगिरीमुळे पर्यटन क्षेत्रात मध्यप्रदेशने देशात नववे स्थान मिळवले आहे. याउलट हिमाचल प्रदेशमध्ये पर्यटकांची संख्या घटल्याचे चित्र आहे. २०२४ मध्ये १ कोटी ८० लाख देशांतर्गत पर्यटक आले होते, तर २०२५ मध्ये ही संख्या १ कोटी ४४ लाखांवर घसरली.
अवघ्या एका वर्षात जवळपास ३६ लाख पर्यटकांची घट झाली. नैसर्गिक आपत्ती, भूस्खलन आणि बदलते हवामान ही यामागील प्रमुख कारणे मानली जात आहेत. मात्र, परदेशी पर्यटकांच्या संख्येत किरकोळ वाढ होऊन ती ८४ हजार ८२८ इतकी झाली. विशेष म्हणजे, मध्य प्रदेशने गेल्या पाच वर्षांत पर्यटन क्षेत्रात अभूतपूर्व झेप घेतली आहे. २०२१ मध्ये राज्यात २ कोटी ५५ लाख देशांतर्गत पर्यटक आले होते. ही संख्या २०२५ मध्ये वाढून जवळपास १४ कोटींवर पोहोचली आहे.
१३ पटीने साधली प्रगती
गोव्यालाही देशांतर्गत पर्यटनात अपेक्षित वाढ साधता आलेली नाही. २०२५ मध्ये राज्यात १ कोटी ३ लाख देशांतर्गत पर्यटक आले. परदेशी पर्यटकांच्या बाबतीत गोवा अजूनही मजबूत असून ५ लाख ५१ हजार परदेशी पर्यटकांनी राज्याला भेट दिली. मात्र, एकूण पर्यटकसंख्येच्या बाबतीत मध्यप्रदेशने गोव्याला तब्बल १३ पट मागे टाकल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
पर्यटक नवीन पर्यायांच्या शोधात
पर्यटन तज्ज्ञांच्या मते, वाढते प्रवासखर्च, मर्यादित भौगोलिक विस्तार आणि गर्दीमुळे अनेक पर्यटक आता गोवा किंवा पारंपरिक पर्यटनस्थळांऐवजी नवीन पर्याय शोधत आहेत. कमी खर्चात धार्मिक, ऐतिहासिक आणि निसर्ग पर्यटनाचा अनुभव देणारा मध्यप्रदेश पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. उज्जैन, महाकालेश्वर, सांची, खजुराहो, कान्हा, बांधवगड आणि पेंचसारखी स्थळे देशभरातील पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.