

म्हापसा: ‘बर्च बाय रोमियो लेन’ या क्लबसाठी आरोग्य खात्याचे बनावट ‘ना हरकत’ प्रमाणपत्र (एनओसी) तयार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. दुसऱ्या गुन्ह्यातही न्यायालयाने त्यांचा सशर्त जामीन मंजूर केल्याने त्यांचा कारागृहातून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तब्बल साडेतीन महिन्यांनंतर ते कोठडीतून बाहेर येणार आहेत.
मद्यविक्रीचा परवाना मिळवण्यासाठी आरोग्य खात्याची बनावट कागदपत्रे आणि खोटा ‘एनओसी’ तयार केल्याचा आरोप लुथरा बंधूंवर ठेवण्यात आला होता. या प्रकरणामुळे व्यावसायिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. जामीन अर्जावरील सुनावणीनंतर न्यायालयाने आरोपींना प्रत्येकी १ लाख रुपयांचा वैयक्तिक रोखा आणि ५० हजार रुपयांचे दोन स्थानिक हमीदार सादर करण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला.
राज्याबाहेर जाण्यास मनाई
म्हापसा न्यायालयाने जामीन देताना कडक अटी घातल्या आहेत. आरोपींना न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय राज्याबाहेर किंवा देशाबाहेर जाता येणार नाही. तसेच तपासात पूर्ण सहकार्य करणे, पुराव्यांशी छेडछाड न करणे आणि साक्षीदारांना धमकावू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. तपास अधिकाऱ्यांकडे कायमस्वरूपी पत्ता व संपर्क क्रमांक जमा करण्याचे आदेश देतानाच, जामिनावर असताना पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा करू नये, अशी तंबीही न्यायालयाने दिली आहे.
न्यायालयाचे निरीक्षण
जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने नमूद केले की, केवळ भागीदारी संस्थेचा भागीदार असल्यामुळे संबंधित व्यक्तीने बनावट कागदपत्रे तयार केली, असे गृहीत धरता येत नाही. यासंदर्भात ठोस पुरावे अद्याप समोर आलेले नाहीत.
पोलिसांनी लावलेले कलम ४६७ (मौल्यवान सुरक्षा दस्तऐवज बनावट करणे) संदर्भात न्यायालयाने स्पष्ट केले की, आरोग्य विभागाचा ‘एनओसी’ हा तांत्रिक दस्तऐवज असून तो थेट कोणताही कायदेशीर हक्क निर्माण करत नाही. त्यामुळे तो ‘मौल्यवान सुरक्षा’ या श्रेणीत बसत नाही. तसेच, संशयित आधीच न्यायालयीन कोठडीत असल्याने पुढील तपासासाठी त्यांना अधिक काळ तुरुंगात ठेवण्याची आवश्यकता नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.
बाहेर येताच भूमातेचे दर्शन : बुधवारी, सायंकाळी पाच वाजता सौरभ आणि गौरव लुथरा हे दोघेही कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आले. कारागृहाबाहेर पाऊल टाकताच गौरवने मागे वळून जमिनीला स्पर्श करून नमस्कार केला. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या प्रसारमाध्यमांनी दोघांशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी एकही शब्द न बोलता थेट गाडीत बसून नातेवाईकांसह तिथून प्रस्थान केले. यावेळी त्यांचे वकिलांची टीम सोबत होती.
तब्बल १७.४५ कोटींची मालमत्ता ‘ईडी’कडून जप्त
हडफडे येथील ‘बर्च बाय रोमियो लेन’ या रेस्टॉरंटमध्ये झालेल्या भीषण अग्निकांडप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) १७ कोटी ४५ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता ‘पीएमएलए’ कायद्यांतर्गत जप्त केली आहे. ६ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या या आगीत २५ जणांचा मृत्यू झाला होता. ईडीच्या माहितीनुसार, ‘बीईंग जीएस हॉस्पिटॅलिटी गोवा अर्णोद एलएलपी’ या कंपनीमार्फत हे रेस्टॉरंट चालवले जात होते. हणजूण व म्हापसा पोलीस स्थानकात नोंदवलेल्या गुन्ह्यांच्या आधारे या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.