Canacona : काणकोण रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना थांबा न दिल्यास सरकार व रेल्वे प्रशासनाची झोप उडविण्याचा इशारा आंदोलकांनी आज दिला आहे. आज सकाळी जेष्ठ नागरिक व समविचारी संघटनेच्या सदस्यांनी रेल्वे स्थानकावर धडक देऊन उपोषणाला सुरुवात केली. रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
जेष्ठ नागरिकांनी उपोषणाचा बडगा उचलल्यानंतर काणकोणचे मामलेदार मनोज कोरगावकर यांनी त्याची गंभीर दखल घेत काणकोण रेल्वे स्थानकावर कोकण रेल्वेचे जेष्ठ वाहतूक अधिकारी सुनील नारकर यांना पाचारण केले. यावेळी नारकर यांनी काणकोण वासियांच्या भावना मी जाणत आहे. वेळोवेळी त्या मागण्या रेल्वेच्या उच्च अधिकाऱ्यांकडे पोचविल्या आहेत. आजही भविष्य काळात आंदोलनाचा उद्रेक होऊ नये यासाठी आंदोलकांच्या उपस्थितीत त्यांनी रेल्वेच्या उच्च अधिकाऱ्यांकडे दूरध्वनीवर संवाद साधला. त्या प्रमाणे येत्या आठवड्यात रेल्वेचे उच्च अधिकारी व जेष्ठ नागरिक यांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक काणकोण मामलेदार कक्षांत घेण्याचे ठरविण्यात आले.
सभापती रमेश तवडकर यांनी कोकण रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकांना ३० एप्रिल २०२२ला पत्र पाठवून काणकोण रेल्वे स्थानकावर मत्स्यगंधा, नेत्रावती व गांधीधाम नागरकोयल या लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देण्याची सूचना केली होती. मात्र कोकण रेल्वे प्रशासनाने २६ मे २०२२ रोजी सभापती रमेश तवडकर यांच्या पत्राला प्रतिसाद देत त्यांना उत्तर पाठविले.
पत्रात भारतीय रेल्वेने झीरो बेज टाईम टेबलचा अवलंब केला आहे. ती प्रणाली कोकण रेल्वेलाही लागू पडते त्यासाठी या मार्गावरील काही रेल्वे स्थानकावरील थांबे रद्द करण्यात आले आहेत. त्यांत काणकोण रेल्वे स्थानकाचाही समावेश असल्याचे कोकण रेल्वेचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी सभापतींना पत्र पाठवून कळविले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.