Loksabha Election : मुरगाव तालुक्यावर भाजपचाच वरचष्मा ! कॉंग्रेसपुढे प्रतिष्ठेचे आव्हान

Loksabha Election : सलग तिसऱ्यांदा तालुका भाजपसोबत राहण्‍याची शक्‍यता
Loksabha Election
Loksabha Election Dainik Gomantak

प्रदीप नाईक

Loksabha Election :

वास्‍को, मुरगाव तालुक्‍यात मुरगाव, वास्‍को, दाबोळी आणि कुठ्ठाळी या चार मतदारसंघाचा समावेश असून काही वर्षांपूर्वी हा तालुका पूर्णत: काँग्रेसला पाठिंबा देणारा होता.

मात्र मागच्‍या दोन लोकसभा निवडणुकांत हे चित्र बदललेले असून हा तालुका भाजपकडे झुकू लागला असून या निवडणुकीतही हा तालुका भाजपच्याच पाठिशी राहणार असे वाटते.

कारण मुरगाव, वास्‍को व दाबोळी या तिन्‍ही मतदारसंघातील आमदार हे भाजपचे असून कुठ्ठाळीत जरी अपक्ष उमेदवार जिंकून आला असला तरी याही आमदाराचा पाठिंबा भाजप सरकारलाच आहे.

यंदा या तालुक्‍यात भाजपच्‍या बाजूने माविन गुदिन्‍हो, दाजी साळकर यांच्‍याबरोबर काँग्रेसमधून फुटून भाजपात आलेले संकल्‍प आमोणकर या तीन आमदारांचा भक्‍कम पाठिंबा मिळणार आहे. कुठ्ठाळी मतदारसंघ हा जरी भाजपधार्जिणा मतदारसंघ नसला तरी अपक्ष आमदार आंताेनियो वाझ हेही आपल्‍यापरीने भाजपसाठी प्रयत्‍न करणार आहेत.

अशा स्‍थितीत काँग्रेस उमेदवारांबरोबर काम करण्‍यासाठी कोण असेल हा प्रश्‍न उभा रहातो. दाबोळीत काँग्रेस कार्याची धुरा कॅप्‍टन विरियातो फर्नांडिस हे काही प्रमाणात उचलू शकतील. मात्र इतर मतदारसंघात काँग्रेसला तारुन नेण्‍यासाठी खंबीर असा नेता मुरगावात उपलब्‍ध नाही, ही सध्‍याची या तालुक्‍यातील स्‍थिती आहे.

मागच्‍या तीन निवडणुकांचा आढावा घेतल्यास २००९ च्‍या लोकसभा निवडणुकीत या तालुक्‍यात काँग्रेस उमेदवाराने शेवटची आघाडी घेतली हाेती. मात्र २०१४ पासून या तालुक्‍याचे चित्र बदलत आहे. २०१४ च्‍या निवडणुकीत भाजपला या तालुक्‍याने घसघशीत अशी आघाडी मिळवून दिली हाेती. २०१९ च्‍या निवडणुकीत भाजप उमेदवार नरेंद्र सावईकर यांची इतर तालुक्‍यातील कामगिरी फिकी ठरली होती. मात्र, अशा स्‍थितीतही मुरगाव तालुका सावईकर यांच्‍याच बाजूने खंबीरपणे उभा राहिला होता.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजप आणि काँग्रेस हेच दोन पक्ष पुन्‍हा प्रामुख्‍याने एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. सध्‍या या तालुक्‍याचा रागरंग पहाता, सतत तिसऱ्या वेळीही हा तालुका भाजपाबरोबरच उभा रहाण्‍याची अधिक शक्‍यता आहे.

२०१९ च्‍या निवडणुकीत काँग्रेसचे फ्रान्‍सिस सार्दिन यांनी भाजपचे नरेंद्र सावईकर यांचा साडे नऊ हजार मतांच्‍या आघाडीने पराभव केला होता. असे असले तरी सावईकर यांना मुरगाव तालुक्‍यात चारही मतदारसंघातून एकत्रित अशी तीन हजार मतांची आघाडी मिळाली होती.

सध्‍याची स्‍थिती पाहता, मुरगाव मतदारसंघाची धुरा हल्लीच काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेले आमदार संकल्प आमोणकर वहात आहेत. वास्को मतदारसंघाची धुरा

भाजपचेच आमदार कृष्णा (दाजी) साळकर यांच्याकडे आहे. दाबोळी मतदारसंघाची जबाबदारी काँग्रेसमधून भाजप प्रवेश करून दोनवेळा दाबोळी मतदारसंघात निवडून आलेले भाजपचे माविन गुदिन्हो सांभाळत आहेत.

तर कुठ्ठाळी मतदारसंघाचा आमदार आंतोन वाझ जे अपक्ष म्हणून गेल्या विधानसभेत निवडून आले आणि अजूनही अपक्ष म्हणून वावरत आहेत, आणि ज्याची संपूर्ण कुठ्ठाळी मतदारसंघावर मक्तेदारी आहे. या चार आमदारांपैकी दाबोळीचे आमदार माविन गुदिन्हो पालकमंत्री आहेत.

त्यांच्यावर लोकसभा निवडणुकीसाठी मुरगाव तालुक्याच्या चारही मतदारसंघांची भिस्त असेल. तसेच मुरगाव मतदारसंघात पहिल्या प्रथम निवडून आलेले आमदार संकल्प आमोणकर ज्यांनी भाजपचे मिलिंद नाईक यांचा पराभव केला होता व हल्लीच भाजपात प्रवेश केला होता. यांची मुरगाव मतदार संघावर पकड घट्ट असून त्यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी भाजपासाठी विजय संपादन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे छातीठोकपणे सांगितले आहे.

वास्को मतदार संघ म्हणजेच भाजपचाच बालेकिल्ला असलेला मतदारसंघ मानला जातो. विद्यमान आमदार कृष्णा साळकर हे भाजपचेच आमदार असून त्यांनी काँग्रेसचे उमेदवार तथा भाजपचे माजी आमदार कार्लोस आल्मेदा यांचा पराभव करुन वास्को मतदारसंघात भाजपचा झेंडा फडकावला होता.

त्यामुळे आमदार साळकर यांच्याकडे भाजप मतदारांचा साचा अबाधीत आहे. दाबोळी मतदार संघात मंत्री माविन गुदिन्हो हे दोन वेळा विजयी उमेदवार आहेत. तसेच दाबोळी संघाचे आमदार मुरगाव तालुक्याचे पालकमंत्री आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी चारही मतदार संघाची भिस्त त्यांच्यावर आहे. कारण त्यांना पालकमंत्री या नात्याने भूमिका साकारावी लागेल व लोकसभा निवडणुकीसाठी भाजपप्रणित उमेदवाराला मुरगाव तालुक्यातून जास्तीत जास्त मते मिळतील याची दक्षता घ्यावी लागेल.

कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वाझ हे अपक्ष म्हणून निवडून आलेले उमेदवार, तसेच आजही ते अपक्ष आमदार म्हणून कार्यरत आहेत. मात्र, ते सरकारबराेबर असल्‍याने कुठ्ठाळी मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत ते भाजप उमेदवाराला किती मते मिळवून देतील, यावर या तालुक्‍याचे गणित ठरणार आहे.

लोकसभेसाठी दक्षिण गोवा उमेदवार अजून ठरला नसला तरी चारही मतदारसंघातील आमदारांनी आपापल्या परीने काम सुरू केले आहे.

संकल्‍प सोबत नसल्‍याचा काँग्रेसला फटका बसणार ?

मागच्‍या वीस वर्षांत आधीचा काँग्रेसधार्जिणा असलेला मुरगाव तालुका भाजपच्‍या बाजूने झुकत चालला हाेता, ही गोष्‍ट जरी खरी असली तरी युवा काँग्रेसचे माजी अध्‍यक्ष असलेले संकल्‍प आमोणकर यांनी कार्यकर्त्‍यांसह काँग्रेससाठी काम करून या तालुक्‍यातील काँग्रेसची लाज काही प्रमाणात राखली हाेती. मात्र आता तेच भाजपात गेल्‍याने काँग्रेसला या तालुक्‍यात कोणीच वाली राहिला नाही,अशी स्थिती झाली आहे.

विधानसभा निवडणुकीत काय झाले !

वास्को हा मुरगाव तालुक्यातील सर्वांत मोठा मतदारसंघ आहे. भाजपचे कृष्णा साळकर यांना गतनिवडणुकीत १३,११८ मते प्राप्त झाली. त्यांनी ५३.४३ टक्के मते मिळवली होती. काँग्रेसचे कार्लोस आल्मेदा यांना ९४६१ मते, एकूण ३७.०९ टक्के मते प्राप्त झाली होती.

दाबोळीत गतनिवडणुकीत विजयी उमेदवार माविन गुदिन्हो यांना ७,५९४ मते म्हणजेच ४०.५१ टक्के मते प्राप्त झाली होती. तर काँग्रेसचे विरीयातो फर्नाडिस यांना ६०२४ मते प्राप्त झाली होती. टक्केवाटी ३२.१४ एवढी होती.

कुठ्ठाळी मतदार संघात गतनिवडणुकीत आंतोन वास यांना २३.०८ टक्के मते म्हणजेच ५५२२ मते प्राप्त झाली होती. तर काँग्रेसचे ओलेन्सियो सिमॉईश यांना ४३४४ मते प्राप्त झाली होती. तर २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत मुरगावातून संकल्प आमोणकर यांनी ९०६७ मते मिळवून विजय मिळविला.

आमोणकर यांची एकूण टक्केवारी ५३.६८ एवढी होती. ते काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. तर भाजपचे उमेदवार मिलींद नाईक यांना ७१२६ मते मिळाली होती. त्याची ४१.१९ एवढी टक्केवारी होती.

Loksabha Election
Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील पेट्रोल-डिझेलच्या दरात किरकोळ बदल; वाचा आजच्या किमती

मुरगाव तालुका हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. परंतु अलीकडे मुरगाव, वास्‍को, दाबोळी आणि कुठ्ठाळी या चार मतदारसंघात परिस्थिती बदललेली आहे. मागील दोन लोकसभा निवडणुकांत हे चित्र बदललेले असून हा तालुका भाजपकडे झुकला आहे.

मुरगाव, वास्‍को व दाबोळी या तिन्‍ही मतदारसंघातील आमदार हे भाजपचे आहेत. यंदा या तालुक्‍यात भाजपच्‍या बाजूने माविन गुदिन्‍हो, दाजी साळकर यांच्‍याबरोबर काँग्रेसमधून फुटून भाजपात आलेले संकल्‍प आमोणकर या तीन आमदारांचा भक्‍कम पाठिंबा राहील, हे विशेष आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com