Loksabha Election 2024 : मगोप-काँग्रेस जुंपली; ‘खलपांमुळेच ‘म्हापसा अर्बन’ची अधोगती

Loksabha Election 2024 : : ढवळीकरांची टीका खलपांकडून पलटवार, चर्चेची तयारी : युरींचेही सुदिनना प्रत्युत्तर
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024Dainik Gomantak

Loksabha Election 2024 :

पणजी, गेले अनेक दिवस मौन धारण केलेल्या मगोपला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अचानक कंठ फुटला आहे. मंत्री सुदिन ढवळीकर यांनी कॉंग्रेसचे उत्तर गोव्याचे उमेदवार ॲड. रमाकांत खलप यांना म्हापसा अर्बन’च्या मुद्यावरून लक्ष्य बनविले.

त्यांनी ‘म्हापसा अर्बन’मध्ये बेशिस्त कारभार केल्याचा आरोप केला. त्यावर खलपांनीही पलटवार केला. ‘म्हापसा अर्बन’प्रश्‍नी कोणत्याही व्यासपीठावर चर्चेस तयार असल्याचे सांगितले. शिवाय ढवळीकरांनी कॉंग्रेसवरही तोंडसुख घेतले, त्याचा युरींनी शेलक्या शब्दांत यथेच्छ समाचार घेतला.

ॲड. रमाकांत खलप हे जर उच्चशिक्षित असतील, तर म्हापसा अर्बन बॅंक डबघाईस का आली? खलप बॅंकेचे अध्यक्ष असताना बॅंकेत अत्यंत घाणेरडा कारभार झाल्याचे मी सिद्ध करू शकतो. ज्या पक्षाने खलपांना मोठे केले, ते आज त्याला विसरलेत. त्यांची सध्या ''ना घर का ना घाट का'' अशी स्थिती झाल्याची टीका वीजमंत्री तथा मगोपचे नेते सुदिन ढवळीकर यांनी केली.

मगोपच्या पणजीतील कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. ढवळीकर म्हणाले की, काँग्रेसने उत्तर गोव्यात जो उमेदवार दिला आहे, तो भरपूर शिकलेला आहे, असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. याचा धागा पकडून ढवळीकर यांनी खलप यांच्यावर निशाणा साधला.

ते म्हणाले की, जर तो उमेदवार भरपूर शिकलेला असेल, तर म्हापसा अर्बन बँक डबघाईला का आली, याचे उत्तर त्यांनी जनतेला द्यावे. त्या उमेदवाराने काय केले, हे मी म्हणत नाही; परंतु ती बँक डबघाईला का आली, ते मी सांगू शकतो. म्हापसा व मडगाव अर्बन बँकांनी ज्या पद्धतीने मोठमोठी कर्जे दिली, त्यात अत्यंत घाणेरडा कारभार झालेला दिसून येतो. मी ते सिद्ध करू शकतो; कारण त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत.

खलप यांनी मगोप सोडण्यावरही ढवळीकरांनी टीका केली. ज्या पक्षाने मोठे केले, त्या पक्षावर टीका करणाऱ्यांनी मगोपचे जहाज बुडणार असल्याचेही भाकित केले होते. त्याला मोठी छिद्रे पडली असल्याचा आरोप केला.

मग ती छिद्रे आता गेली कुठे? कारण अजूनही हा पक्ष विश्‍वासाने जीवंत आहे. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी स्थापन केलेल्या मगोपचे आजपर्यंत विधानसभेत सदस्यत्व आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

सोडून गेलेल्यांना पक्षाची दारे खुली

मगोप कार्यकारिणीची शनिवारी बैठक झाली. या बैठकीत जे मगोप सोडून गेले, त्यांना पुन्हा पक्षाची दारे खुली ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे ढवळीकर यांनी सांगितले. मागील विधानसभा निवडणुकीतील सहा उमेदवार जे निवडणुकीनंतर सोडून गेले, त्यांना आजही पक्षाबद्दल आदर आहे. त्यांनी पुन्हा पक्षात येण्याची इच्छाही व्यक्त केल्याने पक्ष सोडून गेलेल्यांना पक्षाची दारे खुली ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.

मगोपचा ‘तो’ आमदार कोणासोबत?

मगोपचा जो किंमत नसलेला आमदार आहे, तो मगोपसोबत आहे की, भाजपसोबत, हे ढवळीकरांनी प्रथम सांगावे, असा उपरोधिक टोला काँग्रेसचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी लगावला आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाचे तिन्ही आमदार दुसऱ्या पक्षात जातील, या ढवळीकरांनी केलेल्या भाकिताला उत्तर देताना आलेमाव म्हणाले, ढवळीकरांना आता काँग्रेस दक्षिण गोव्यात जिंकणार आहे आणि आपल्याला सत्तेबाहेर जावे लागणार, हे माहीत झाले आहे.

...तर काँग्रेसची ही अखेरची निवडणूक

जसा काँग्रेस पक्ष मडकई मतदारसंघातून पूर्णत: नेस्तनाबूत झाला, तसा तो राज्यातूनही होईल. काँग्रेसची गोव्यातली ही लोकसभेची शेवटची निवडणूक ठरेल, असे राजकीय भाकितही ढवळीकर यांनी यावेळी केले. शिवाय लोकसभेनंतर कॉंग्रेस पक्षाचे सध्याचे तीन आमदार दुसऱ्या पक्षात उडी मारतील, असेही सांगून त्यांनी राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली.

नानोस्कर यांची घरवापसी : मुरगावचे माजी उपनगराध्यक्ष प्रेमानंद (बाबू) नानोस्कर यांची मगोपमध्ये आज घरवापसी झाली. मागील विधानसभा निवडणुकीत नानोस्कर हे केवळ ५०० मतांनी दाबोळी मतदारसंघातून पराभूत झाले होते. नानोस्कर यांचे ढवळीकर यांनी मगोपमध्ये स्वागत केले.

मगो पक्षात काय घडत आहे, त्यांच्या पक्षाचा आमदार नक्की कोणाबरोबर आहे, ते ढवळीकरांनी सांगावे. दक्षिण गोव्यातून काँग्रेसला मोठे मताधिक्य मिळणार आहे. काही वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षाने सार्वमत घेतले, त्यामुळे ढवळीकर हे गोव्यात मंत्री म्हणून कार्यरत आहेत. नाही तर आज ते महाराष्ट्रात पंच म्हणून दिसले असते.

- युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते.

Loksabha Election 2024
British Citizen Arrest In Goa: टेरेसवर टोमॅटोसह गांजाची लागवड! गोव्यात ब्रिटीश नागरिकाला अटक

अाव्हान कोण स्वीकारणार ते सांगा : खलप

‘म्हापसा अर्बन बँकेसंदर्भात मी कोणत्याही विषयावर, कोणत्याही स्थळी आणि कोणाशीही चर्चेसाठी तयार आहे. पण हे आव्हान कोण स्वीकारणार, असा पलटवार करत काँग्रेस पक्षाचे उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रमाकांत खलप यांनी प्रतिआव्हान दिले.

साखळी येथे प्रचार फेरीदरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. मी श्रीपाद नाईक यांना माझ्या आणि त्यांच्या कार्यकाळातील विकासकामांसंदर्भात डिबेटसाठी आव्हान दिले होते. परंतु ते मला जर म्हापसा अर्बन बँकेसंदर्भात आव्हान देत असतील, तर मी तयार आहे, असे खलप यांनी म्हटले. (सविस्तर वृत्त पान/२)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com