Former Goa Chief Minister Laxmikant Parsekar: भाजपच्या एका नेत्याने मांद्रे विधानसभा मतदारसंघातून १५ हजारांचे तर दुसऱ्या एका नेत्याने १२ हजारांचे मताधिक्य देतो असे श्रीपाद नाईक यांना सांगितले आहे. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी तर माझे समर्थक भाजपला मतदान करतील असे परस्पर जाहीर करून टाकले. त्यामुळे मला आता काम करायलाच नको, असा टोला माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी लगावला. मात्र कोणीही मांद्रेतील मतदारांना गृहीत धरू नये. मला फक्त साडेतीनशे मते पडत होती, तेव्हापासून मी या मतदारांना अनुभवतोय, असा इशाराही त्यांनी दिला.
आकडेवारी देणाऱ्यांनी मांद्रेतील जनता मूर्ख नाही हे लक्षात घ्यावे. श्रीपाद नाईक मला येऊन भेटले. ॲड. रमाकांत खलप यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मला फोन केला आणि भेटायला येतो असे सांगितले आहे. उमेदवारी मागे घेण्याचा दिवस झाल्यानंतर मी निर्णय घेणार आहे, असे पार्सेकर यांनी सांगितले. दहाजण विचारतात, त्यापैकी तिघेजण माझा अंदाज घेत असतात. उमेदवार कार्यक्षम हवा, व्यक्तिमत्त्व चांगले हवे आणि स्थैर्य देणारे सरकार हवे हा मुद्दा विचारात घेतला जावा. मी भाजपच्या घरातून निघालो तरी अंगणात आहे, दुसऱ्या घरात गेलो नाही हेसुद्धा तितकेच खरे आहे. गोव्याचे नाव वर काढणारा खासदार हवा असे मला वाटते. त्याच्यावर कोणताही आरोप असता कामा नये, असेही ते म्हणाले.
राजकाणात सक्रिय नाही म्हणजे राजकारण सोडले असे नाही. राजकारणात मी सर्वोच्च स्थानापर्यंत पोचलो. पराभवानंतर तीन तासांत मी घरी आलो होतो. आता नवा आमदार आहे. लोकप्रतिनिधी नसताना मतदारसंघात नाक खुपसणे मला बरे वाटत नाही. शैक्षणिक क्षेत्रात मी कार्यरत आहेत. सध्या राजकारणात सक्रिय नाही याचा अर्थ मी राजकारण सोडले आहे असा नाही. मी लोकशाही मानतो. आपल्याला हवा तसा उमेदवार मिळतोच असे नाही. असेल त्यांतून निवड करावी लागते. ही देशाची निवडणूक असल्याने विकास, स्थैर्य आदी मुद्दे विचारात घ्यावे लागतात, असे पार्सेकर म्हणाले.
गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर म्हणाले की, मी अनेक वर्षे भाजपमध्ये होतो. आश्वासन देऊनही उमेदवारी नाकारली हे मला सहन झाले नाही. मी जिंकू शकणार नाही असे काहींना वाटत होते. काही तयारी नसताना पक्ष सोडून मी निवडणूक लढवली व ५ हजार ८०० मते घेतली. पक्षाची साथ असती तर मला विजयी झालो असतो. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ झाला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.