Govind Gaude: आदर्श युवा पिढी निर्माण करण्याचे शिवधनुष्य आदर्श युवा संघाने बलराम शिक्षण संस्था व अन्य समविचारी युवक तसेच नागरिकांच्या सहकार्याने उचलले आहे. मनाने, विचार व आचारांनी श्रीमंत असलेली पिढी घडविण्याचे कार्य स्वयंपूर्ण भारत व गोवा घडविण्यासाठी लोकोत्सवासारखे कार्यक्रम होण्याची गरज आहे,
असे मत आयुष्यात संकटे प्रगती अडवून ठेवण्यासाठी येत नसतात, तर प्रगती पथाची नवी वाट दाखविण्यासाठी ती येतात, असे विचार कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी व्यक्त केले.
आदर्श युवा संघ व बलराम शिक्षण संस्थेने कला व संस्कृती खात्याच्या सहकार्याने आयोजित केलेल्या लोकोत्सव 2023 दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाला कृषिमंत्री रवी नाईक, कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे, कार्लुस फेरेरा, प्रेमेंद्र शेट, आंतोनियो वाझ, उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धेश नाईक, संघाचे सचिव अशोक गावकर, बलराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अंकुश गावकर लोलये सरपंच निशा च्यारी, सेजल गावकर, प्रिटल फर्नांडिस, आनंदू देसाई, कृष्णा वेळीप, सविता तवडकर, जिल्हा पंचायत सदस्य दिक्षा खानोलकर, मनीषा नाईक, अंजली नाईक, सानिषा तोरस्कर उपस्थित होत्या.
शनिवारी सकाळपासून कार्यक्रमांना अलोट गर्दी झाली. दुर्बल घटकांनापुढे नेण्यासाठी शैक्षणिक संस्था निर्माण करणे. सांस्कृतिक, सामाजिक व आर्थिक समृद्धी आणण्याचा प्रयत्न आदर्श युवा संघ प्रयत्न करीत असल्याबद्दल कृषी मंत्री रवी नाईक यांनी आयोजकांचे अभिनंदन केले. यावेळी मंत्री गावडे व सभापती यांच्या हस्ते शाल श्रीफळ, मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
त्यामध्ये शिवानंद आनंद नाईक, सर्वेश फडते बांदोडकर, पद्मनाभ हरी आमोणकर, अग्निशामक दलातील शैलेश एच. गावडे, फुटबॉलपटू गेवीन अराऊजो, सनदी अधिकारी रवी शेखर निपाणीकर, साहित्यिक रामनाथ गजानन गावडे, कारवारमधील डॉ. नितीन पिकळे, वकील नागराज नायक, गंगाधर हिरेगुढी, संजय बोरकर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे दत्त प्रसाद कामत यांचा समावेश होता.
साहसी खेळांना प्रतिसाद!
लोकोत्सव २०२३ उपक्रमात सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच साहसी खेळांना उपस्थितांकडून भरघोस प्रतिसाद लाभत आहे. धनुष्यबाण व बंदूक तिरंदाजी त्याचप्रमाणे ग्लायडिंग, बोट रायडींग, नदीच्या पात्रात बार क्रोसींग या सारखे उपक्रम या साहसी खेळात आहेत. या खेळाचा आनंद लुटण्यासाठी युवा पिढीची ‘म्हशीफोंड’ येथून वाहणाऱ्या कुशावती (तळपण) नदी किनारी गर्दी होत आहे. या खेळाव्यतिरिक्त कबड्डी, लंगडी, खोखो, विटी दांडू लगोरी या क्रीडा प्रकारच्या स्पर्धा या ठिकाणी घेण्यात आल्या. लोकोत्सवात प्रत्येकाला प्रत्येकाच्या आवडीचा उपक्रम देण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला आहे. शेतकरी व कष्टकऱ्यांना त्यांची उत्पादने योग्य भावात विकण्याची संधी व बाजारपेठ लोकोत्सवात तीन दिवस उपलब्ध करून दिली आहे.
पारंपरिक खाद्यपदार्थ!
जैवविविधता मंडळाच्या पारंपरिक खाद्यपदार्थ जत्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे, आमदार कार्लुस फेरेरा, जेनिफर मोन्सेरात, सभापती रमेश तवडकर, जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप सरमोकादम, श्रीस्थळ जैवविविधता समितीचे अध्यक्ष विनय तुबकी, सदस्य शिरीष पै, पैंगीण जैवविविधता समितीचे अध्यक्ष सुभाष महाले, आगोंद जैवविविधता समितीचे अध्यक्ष शाबा नाईक गावकर उपस्थित होते.
या खाद्यजत्रेत उकडलेली काटे कणंगा, झाड कणंगा, चिरको, दुधी भोबळ्याची पानांची भाजी, मुरलेले आवळे, पोळे, पल्ल्याची भाकरी, खेकड्याची व सुक्या बांगड्याची कुसमूर, कालवांचे तोडांक अशा तेल विरहीत आरोग्यदायी पारंपरिक खाद्यपदार्थांचा समावेश होता. उपस्थित मान्यवरांनी या पदार्थांचा आस्वाद घेतला.
आज समारोप
रविवारी सकाळी ११ वाजता आयोजित कार्यक्रमाला आसामचे सभापती बिस्वजित डायमरी, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, पर्यटन मंत्री रोहन खंवटे, आमदार विजय सरदेसाई, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, नीलेश काब्राल, एल्टन डिकॉस्टा, माजी खासदार नरेंद्र सावईकर उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी समारोप सत्राला ४ वाजता सुरवात होणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे सभापती राहुल नार्वेकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्याशिवाय केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक, महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात, माजी खासदार विनय तेंडुलकर, आमदार जेनिफर मोन्सेरात, उल्हास तुयेकर, माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांची उपस्थिती असेल.
...संस्कृती संवर्धनासाठी!
लोकोत्सव हा गोव्याची संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी सुरू केलेला महायज्ञ आहे. गावपण, ‘मनीसपण’ टिकवून ठेवण्यासाठी दोन तपे आदर्श युवा संघ ही तपश्चर्या करीत आहे. ३६५ दिवस या आदर्श ग्रामात ग्रामीण लोकसंस्कृतीचा जागर करत असतानाच रोजगार निर्मिती करण्यासाठी आमचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी सर्वांच्या मदतीने आणखी एक तप वाट पाहण्याची आमची तयारी आहे, असे सभापती व आदर्श युवा संघाचे अध्यक्ष रमेश तवडकर यांनी प्रास्ताविकात सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.