
Panaji News: भूबळकाव प्रकरणी अटक केल्यानंतर पोलिसांकडून बेदम मारहाण करण्यात आली. या जमीन हडप घोटाळ्याचा पर्दाफाश होईल म्हणूनच सुमारे १० ते १२ पोलिसांनीच मला हुबळीपर्यंत पोहचवले व वाच्यता न करण्याची धमकी दिली होती. माझा एन्काऊंटर करण्याचाही इशारा पोलिसांनी दिला होता, असा गौप्यस्फोट फरार सुलेमान खान उर्फ सिद्दीकीने कथित व्हिडिओद्वारे केला आहे.
मी कोठडीतून पळून गेलो, हा पोलिसांनी केलेला आरोप खोटा आहे. हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवल्यास मी शरण येण्यास तयार आहे, असे सुलेमानने स्वतःच काढलेल्या कथित व्हिडिओमध्ये माहिती देत पोलिसांची पोलखोल केली आहे. त्यामुळे सुलेमानच्या या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मी कोठडीत होतो तेव्हापासून माझ्यावर पोलिसांनी दबाव आणला होता. माझ्या नावावर असलेली जमीन उपसभापतींच्या नावे करण्यास पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता आणि एका पोलिस महानिरीक्षकाने माझी सतावणूक सुरू केली होती. मात्र, मी त्याला तयार नसल्याने मला जाणूनबुजून पोलिस कोठडीतून जाण्यास भाग पाडले. माझी कोणाशीही दुश्मनी नाही. उपसभापतींच्या वडिलांनी माझ्या नावावर कोणतीही जमीन केलेली नाही. मी माझ्या मेहनतीने काही जमिनी खरेदी केल्या आहेत, असा दावा सुलेमानने कथित व्हिडिओत केला आहे.
सुलेमानने म्हटले की, मला हुबळीला पोचवण्यासाठी रात्रीच्यावेळी मला पोलिस कोठडीतून बाहेर काढले. काही पोलिस अगोदर पुढे गेले होते, तर काहीजण माझ्या मागे होते. सुमारे १२ पोलिसांची पलटण माझ्या मागे-पुढे हुबळीपर्यंत होती. माझ्या जीवाला धोका असल्याने मी त्यांचे ऐकण्यास तयार झालो.
संशयित सुलेमानने स्वतःच काढलेल्या कथित व्हिडिओमध्ये सध्या पोलिस करत असलेल्या जमीन हडप प्रकरणाची माहिती उघड केली आहे. या कथित व्हिडिओत तो म्हणतो की, मी पोलिस कोठडीत असताना उपसभापती ज्योशुआ डिसोझा आणि एक सत्ताधारी आमदार क्राईम ब्रँचमध्ये आला होता. त्याच्यासोबत पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता हे सुद्धा होते.
पोलिसांचे लक्ष विचलित करण्यासाठी असे आरोप केले जात आहेत. सुलेमानचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरूच राहणार आहेत. एका कणखर आणि हुशार गुन्हेगाराची ही युक्ती दिसते. आमच्या तपासात बडतर्फ पोलिस कॉन्स्टेबल अमित नाईक वगळता इतर कोणत्याही पोलिस कर्मचाऱ्याचा हात असल्याचे दिसून आलेले नाही, अशी माहिती पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी दिली.
सिद्दिकी सुलेमान पलायन प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू आहे. या कटातील ‘आयआरबी’चा पोलिस कॉन्स्टेबल अमित नाईक याला तत्काळ सेवेतून बडतर्फ केले आहे. गुन्हे शाखेने यापूर्वी सुलेमान खानला अटक केली होती आणि त्याला पुन्हा लवकरच अटक होईल, असे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
एका आमदाराच्या वडिलांनी माझ्या नावावर केलेली जमीन त्याच्या नावावर करण्यासाठी मला धमकी दिली होती. यावेळी गुप्ता यांनीही माझा एन्काऊंटर करण्याची भीती घातली होती. गेले तीन महिने माझी सतावणूक सुरू होती. माझे घरही पाडण्यात आले आहे. पोलिस कोठडीतून मी स्वतः गेलो नाही तर पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता, उपअधीक्षक सूरज हळर्णकर तसेच एसआयटीच्या एका निरीक्षकाने मला तेथून पसार होण्यास भाग पाडले. त्यापूर्वी मला अधीक्षकांच्या केबिनमध्ये मारण्यात आले होते. पोलिसांचे देशभर संबंध असल्याने माझा कुठेही गेम केला जाऊ शकतो, असे अधीक्षक गुप्ता यांनी धमकावले होते. त्यामुळेच भीतीने कोठडीतून तेथून जाण्यास तयार झालो, असे सुलेमानने व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
भूबळकाव प्रकरणातील मुख्य संशयित सुलेमानने दिलेल्या पेनड्राईव्हमधील कथित व्हिडिओमध्ये पलायनामागील घटनाच कथन केली आहे. त्यामुळे सुलेमान पलायन प्रकरण व पोलिस कॉन्स्टेबल अमित नाईकने केलेल्या आत्महत्येचा प्रयत्न ही लाजीरवाणी बाब आहे. या प्रकरणात उपसभापती ज्योशुआ डिसोझा आणि पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांची नावे काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी घेतली आहेत.
कवठणकर यांनी रविवारी रात्री पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले की, ॲड. अमित पालेकर यांच्याकडे सुलेमानने पेनड्राईव्ह पाठविला. ॲड. पालेकर बाहेर असल्याने त्यांनी मला घरून तो पेनड्राईव्ह आणून पहावा, असे सांगितले होते. त्यानुसार मी तो पाहिला. त्यामध्ये जमीन हडप प्रकरणातील मुख्य संशयित सिद्दीकीचे तीन व्हिडिओ आहेत. त्याने पलायन प्रकरणातील घटनाच कथन केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.