
Konkan Railway Margao Station cleanliness issues
सासष्टी: मडगाव कोकण रेल्वे स्थानकाचा परिसर मजूर, स्थलांतरितांनी भरलेला आहे. हे लोक तिथे बेकायदेशीर कृत्ये करतातच शिवाय अस्वच्छता, दुर्गंधीमुळे व फूटपाथवरील अतिक्रमणामुळे परिसरात सौंदर्यीकरण केले तरी त्याचा काहीच परिणाम होताना दिसत नाही.
मडगावचे कोकण रेल्वे स्थानक हे गोव्यातील प्रमुख जंक्शन आहे. या स्थानकात दरदिवशी शेकडो प्रवासी व इतर ट्रेनची ये-जा सुरू असते. त्यामुळे हजारो प्रवाशांची वर्दळ येथे असते. त्यात पर्यटकांचाही समावेश असतो. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन इतर रेल्वे स्थानकांप्रमाणे मडगावच्या रेल्वे स्थानकाच्या सौंदर्यीकरणास प्राधान्य देत आहे.
या रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सेवेसाठी अनेक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मडगावचे आमदार दिगंबर कामत तर कोकण रेल्वे स्थानक परिसर सुशोभीत करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची योजना राबवत आहेत. असे असतानाही परप्रांतीयांच्या बेशिस्त वर्तनामुळे येथील परिसर गलिच्छ बनला आहे.
समाजकार्यकर्ते दिनेश काकोडकर यांनी ‘गोमन्तक टीव्ही’चे प्रतिनिधी गौरांग प्रभू मळकर्णेकर यांच्याशी बोलताना कोकण रेल्वे प्रशासन व सरकारकडे कोकण रेल्वे स्थानक परिसरातील सर्व बेकायदेशीर कृत्ये व अतिक्रमणे थांबविण्याची व हटविण्याची मागणी केली आहे. कोकण रेल्वेने मडगाव रेल्वे स्थानकाचा चांगला विकास केला आहे; पण रेल्वे स्थानक परिसर पाहण्यासारखा व फिरण्यासारखा राहिलेला नाही, असे काकोडकर यानी सांगितले.
रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्यांवरील फूटपाथवर अतिक्रमणे वाढली आहेत. स्थलांतरित तिथेच राहतात, तिथेच जेवण, आंघोळ करणे, कपडे वाळत घालणे व इतर दिनचर्येची कामेही तिथेच करतात. रेल्वे स्थानक परिसरातील फूटपाथवरही लोक झोपतात, दुर्गंधी करतात. त्यामुळे प्रवाशांनाही तिथून जाणे असह्य होऊन बसले आहे.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशनबरोबरच सरकारनेही यावर त्वरित उपाययोजना करून हा परिसर स्वच्छ व सुशोभीत ठेवावा, अशी मागणी काकोडकर यांनी यावेळी केली. त्याचप्रमाणे या स्थलांतरितांना कोणाचे पाठबळ मिळते की ते परिसरात बेकायदेशीर कृत्ये करतात, त्याचा शोध घेण्याची मागणीही काकोडकर यांनी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.