
Bicholim chairperson Kundan Falari Resignation
डिचोली: डिचोली पालिकेतील अविश्वास ठरावाच्या राजकारणावर पडदा पडलेला असतानाच आता पालिकेत पुन्हा सत्तासंघर्षाच्या नाट्याने उचल खाल्ली आहे. एका नाट्यमय घडामोडीत नगराध्यक्ष पुंडलिक (कुंदन) फळारी यांनी आज अचानक तडकाफडफी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
आज (मंगळवारी) त्यांनी पालिका प्रशासन खात्याच्या संचालकांकडे राजीनामा दिल्याची माहिती आहे. फळारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. उलटसुलट चर्चाही सुरू झाल्या आहेत. महिन्यापूर्वी डिचोली पालिकेत नगराध्यक्ष बदलाच्या हालचालींनी उचल खाल्ली होती. पालिकेच्या चौदापैकी आठ नगरसेवकांनी गेल्या ९ डिसेंबर रोजी नगराध्यक्ष फळारी यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला होता.
मात्र, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या राजकारणाची गंभीर दखल घेतली. त्यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत डिचोली पालिकेच्या चौदाही नगरसेवकांची एक बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मध्यस्थी करताना अविश्वास ठरावावरील चर्चेसाठी बोलाविण्यात आलेल्या बैठकीला उपस्थित राहू नका, अशी सूचना नगरसेवकांना केली होती.
मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून अविश्वास ठरावावरील बैठकीला उपस्थित राहू नका अशी सूचना नगरसेवकांना केली होती. मुखमंत्र्यांच्या या सुचनेचे नगरसेवकांनी पालन करताना गेल्या १७ डिसेंबर रोजी अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या बैठकीला नगरसेवक उपस्थित राहिले नव्हते. त्यामुळे नगराध्यक्ष कुंदन फळारी यांच्यावरील अविश्वास ठराव अखेर अपेक्षेप्रमाणे बारगळला होता, तरीही फळारींनी राजीनामा दिल्याने उलटसुलट चर्चांना ऊत आला आहे.
अविश्वास ठराव बारगळल्यानंतर डिचोली पालिकेतील सत्ता नाट्यावर पडदा पडला असे वाटत असतानाच आता पुन्हा एकदा पालिकेत सत्तानाट्य सुरू झाले आहे. नगराध्यक्ष फळारी यांनी अचानक राजीनामा दिल्याने पालिकेत सत्तानाट्य धुमसत होते हे स्पष्ट झाले आहे. कुंदन फळारी यांनी तडकाफडफी राजीनामा दिल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तर भाजप पक्षनेत्यांनी दिलेल्या आदेशानुसार आपण नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे, असे नगराध्यक्ष कुंदन फळारी यांनी स्पष्ट केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.