
माझे वडील पुंडलिक मुळवी बांदोडकर मूळचे बांदोडा या गावातील. तिथं ते गणेशमूर्ती बनवायचे. नंतर ते कामाच्या निमित्ताने कुळे गावात येऊन स्थायिक झाले. ते गणेश मूर्ती बनवतात हे कळल्यानंतर कुळे गावातील लोकांनी त्यांना त्यांच्यासाठी गणेशमूर्ती बनवायची विनंती केली. अशाप्रकारे कुळे गावात गणेशमूर्ती तयार करण्याचा त्यांचा व्यवसाय 1967 या वर्षी सुरु झाला.
ते तयार करत असलेल्या गणेशमूर्तीची संख्या दरवर्षी वाढत राहीली. मात्र 1989 यावर्षी जेव्हा त्यांना पॅरॅलिसिसचा अटॅक आला तेव्हा त्यावर्षी गणेशमूर्ती बनवायच्या की नाही या संभ्रमात असताना माझ्या मोठ्या बहिणीने, सुनिताने, धैर्याने ती जबाबदारी स्वीकारली. सुनिता त्यावेळी लहानच होती परंतु वडिलांबरोबर बसून मूर्ती बनवण्यात ती त्यांना मदत करायची. तिला आम्ही दोघी बहिणीनींही त्यावेळी साथ दिली आणि अशाप्रकारे आमचा व्यवसाय चालू ठेवला.
पुढे काही वर्षांनी वडिलांचे निधन झाल्यानंतर गणेशमूर्ती संबंधात येणाऱ्या अनेक व्यावहारिक गोष्टी आम्हाला शिकाव्या लागल्या- उदाहरणार्थ माती कोठून आणावी यासारख्या देखील. त्यावेळी आम्ही बनवत असलेल्या गणेश मूर्तींची संख्या कमी करावी हाच आमच्या समोरचा एक उपाय होता, जो आम्ही स्वीकारला. दूरवरून गणेशमूर्ती नेण्यास येणाऱ्या ग्राहकांना आमची समस्या आम्ही समजावून सांगितली. गावातील ग्राहकांना मात्र आम्ही गणेशमूर्ती तयार करून पुरवल्या.
खरे तर लग्न होऊन मी जांबावली येथे गेले होते परंतु गणेशमूर्ती बनवायच्या व्यवसायामुळे मी नंतर पुन्हा कुळे येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. या निर्णयात माझे पती हरीश यांनीही मला पाठिंबा दिला. आम्हा तिन्ही बहिणींची लग्ने झाली असली तरी कुळे येथील घर सांभाळण्याची जबाबदारी माझ्याकडे सोपवली गेली आणि गणेशमूर्ती बनवण्याचा व्यवसायही मी स्वतंत्रपणे सांभाळायला सुरुवात केली. अर्थात, माझ्या दोघी बहिणी सुनिता आणि वनिता अजूनही या कामात मला मदत करण्यासाठी आपल्या सासरहून कुळे गावात अजूनही येतात.
मी हा व्यवसाय पुढे नेण्याचा निर्णय घेतला त्याला आता अनेक वर्षे उलटून गेली आहेत. माझ्या वडिलांच्या काळी, काही घरात आम्ही केलेली गणेश मूर्ती जात होती त्याच घरात आजही ती जाते, यात परंपरा जपण्याचा आनंद आहेच. माती मळण्यापासून ते गणेशमूर्ती रंगवण्यापर्यंत सारी कामे मी स्वतः करते. अर्थात माझ्या मुलांची मदतही मला होत असते.
खरं म्हणजे हा व्यवसाय मोठा होईल याची मी कल्पना केली नव्हती. वडिलांचे काम पुढे घेऊन जाणे इतपतच माझा सुरुवातीचा हेतू होता. ते हयात असताना आम्ही मुली त्यांचा व्यवसाय सांभाळत आहोत याचा आनंदही त्यांना असायचा. आता लग्न झाल्यानंतरही आम्हा तिन्ही बहिणींचे पती आम्हाला गणेशमूर्ती तयार करण्याच्या कामाला पाठिंबा देतात हेही आमचे भाग्यच आहे. -बबीता हरीश गुरव.
गणेश मूर्तिकारांसमोर दरवर्षी उभी राहणारी सर्वात मोठी अडचण म्हणजे चांगल्या दर्जाची माती मिळणे. चांगली माती आम्हाला मांद्रे गावातून आणावी लागते. अनेक ठिकाणची माती वापरण्याचा प्रयोग आम्ही केला आहे परंतु बहुतेक वेळी तो अयशस्वीच झाला आहे. मूर्तिकारांना माती मिळण्याची ही समस्या पुढे पुढे वाढत जाणार आहे असे मला वाटते. शेतातील मातीचा वरचा स्तर मूर्तीकामासाठी उपयोगी नसतो. पुरुषभर खड्डा खणल्यानंतर जी माती मिळते ती मूर्तींसाठी चांगली असते. मातीत खडे असून उपयोगाचे नाही, त्यामुळे मूर्तीची सुबकता हरवू शकते. सरकार अनुदान देऊन आम्हाला खूप मदत करतच असते परंतु त्याचबरोबर जर चांगल्या दर्जाच्या मातीच्या जागा (अशा अनेक जागा पडीक आहेत) त्यांनी हेरून मूर्तिकारांना कळवल्या तर ती एक अत्यंत चांगली मदत असू शकेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.